अभिप्राय – विचारविश्वाला समृद्ध करणारे पुस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. पूजा कुलकर्णी

‘द कोड ब्रेकर’ हे पुस्तक वाचकांच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे असून ज्ञान, अनुभव आणि समज यांचा सुंदर संगम यात आढळतो. हे पुस्तक आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा उलगडून दाखवते. ही चरित्रवजा गाथा लिहून वॉल्टरआयझॅक्सन यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वज्ञात असे मानवी जीवन कसे बदलत जाणार आहे याचे सखोल विवेचन केले आहे. 2012 या वर्षाची नोबेल पुरस्कार विजेती संशोधक जेनिफर डोडना या बुद्धिमान स्त्राrच्या चरित्रातून लेखक आपल्यासमोर जणू तिचे वेधक शब्दचित्रच उभे करतात.

प्रस्तुत पुस्तकात लेखकाने जटिल वैज्ञानिक संकल्पना अतिशय सोप्या, ओघवत्या आणि कथनात्मक शैलीत मांडल्या आहेत. प्रा. माधुरी शानभाग यांनी अतिशय समर्पक भाषेत हा अनुवाद केला आहे. त्यामुळे विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या वाचकालासुद्धा हा गुंतागुंतीचा विषय सहज समजू शकतो. ही कथा अनेक मोठय़ा मूलभूत प्रश्नांकडे तुम्हाला नेते. अगदी सजीवाचे मूळ आणि मानवी प्रजातीचे भविष्य इथवर त्याचा आवाका आहे. याची सुरुवात सहावीत शिकणाऱया, हवाई प्रदेशात लाव्हाने बनलेल्या खडकामधे स्लीपिंग ग्रास अन् तत्सम अनेक नव्या गोष्टी शोधायचा थरार अनुभवणाऱया मुलीपासून होते. एक दिवस ती शाळेतून येते अन् बिछान्यावर तिला एक डिटेक्टिव्ह पुस्तक सापडते. त्यामध्ये अनेक नव्या गोष्टी शोधलेल्या लोकांच्या कहाण्या आहेत. त्यातून तिला आपणही काहीतरी शोधायला हवे अशी प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा म्हणजे सजीवत्वाचे गुपित… सीक्रेट ऑफ लाइफ…

संपूर्ण मानवी इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला असे दिसते की, विषाणूजन्य (व्हायरल) आणि जीवाणूंच्या (बॅक्टेरिअल) प्रसाराने साथीच्या रोगांच्या लाटा अनेकदा उद्भवलेल्या आहेत.सगळ्यात पहिली नोंद झालेली साथबॅबिलोन फ्लू या नावाने इसवी सनापूर्वी 1200 वर्षे आलेली आहे. अथेन्स येथे इ. स. पू. 429 साली आलेल्या प्लेगच्या साथीने 100, 000 लोक मरण पावल्याची नोंद आहे. ब्लॅक डेथनावाच्या 14 व्या शतकात आलेल्या महामारीने 20 कोटी लोक यमसदनाला धाडले गेले. 2020 साली आलेल्या कोविड-19 साथीच्या दुष्परिणामातून आपण अजूनही सावरलेलो नाही. 2020 पर्यंत क्रिस्पर हे तंत्र जनुक संपादनासाठी विकसित झालेले होते. त्यामुळे या पुस्तकाची नायिका संशोधक जेनिफर डोडना हिने मानवावर हेच तंत्र वापरून कोरोना व्हायरल नष्ट करता यायला हवा असा विचार सर्वप्रथम केला.

सन 2020 ची साथ ही लस निर्माण करण्याच्या संदर्भात एक मैलाचा दगड मानला जाईल. कारण पारंपरिक दृष्टिकोनच इथे बदलला गेला. जनुकीय लस निर्माण करणे हा एक मोठा ऐतिहासिक बदल होता.शक्तिहीन व्हायरस अथवा त्याचा एक तुकडा मानवी शरीरात घालण्याऐवजी व्हायरसचे एक जनुक अथवा कोडिंग करू शकणारा तुकडा वापरून मानवी जनुकांकडूनच व्हायरसचे घटक निर्माण करण्यात आले. हेच घटक मग आपल्या प्रतिकारशक्तीला उद्युक्त करतील अशी संकल्पना होती. कोविडची लस ही इतर लसींपेक्षा वेगळी आहे. ती आरएनए वापरून केलेली आहे.

त्यामुळे ‘द कोड ब्रेकर’ या पुस्तकात केवळ वैद्यकीय संशोधनाची माहिती नसून त्या मागील संघर्ष, जिद्द, स्पर्धा आणि नैतिक प्रश्नही प्रभावीपणे मांडले आहेत. डीएनए, जनुके आणि क्रिस्पर तंत्रज्ञानाची सोप्या भाषेत ओळख, आधुनिक विज्ञान आणि मानवी जीवन यांचा प्रभावी संबंध, खऱया शास्त्रज्ञांच्या जीवनकथा व संशोधनावर आधारित लेखन, विज्ञानातील नैतिकता, जबाबदारी आणि भविष्यातील शक्यता यांचा सखोल वेध, सामान्य वाचकांनाही समजेल अशा शैलीत मांडलेले विषय ही या पुस्तकाची ठळक वैशिष्टय़े आहेत. हे पुस्तक वाचताना विज्ञान केवळ प्रयोगशाळेत मर्यादित नसून ते समाज, आरोग्य, भविष्यातील मानवजातीचे स्वरूप आणि नैतिक जबाबदाऱया यांच्याशी किती घट्ट जोडलेले आहे, हे प्रकर्षाने जाणवते. ‘द कोड ब्रेकर’ हे आधुनिक वैद्यकीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी भविष्य यामध्ये रस असलेल्या प्रत्येक वाचकाला आवडेल.

द कोड ब्रेकर

लेखक ः वॉल्टर आयझॅक्सन

अनुवादिका ः प्रा. माधुरी शानभाग

प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर

पृष्ठे ः 543 n किंमत ः 599