प्रासंगिक – पद्मजा फेणाणी

>> नागेश शेवाळकर

(प्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्यास्वरचंद्रिकाएक सांगीतिक प्रवास’  हा गौरवग्रंथ 13 जुलै 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय सभागृह, वीर सावरकर मार्ग, दादर प. येथे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने हा लेख.)

देवीची आराधना केल्यानंतर जन्मलेल्या मुलीचे नाव देवीच्या नावावरून शंकर आणि शैलजा फेणाणी यांनी पद्मजा ठेवले. फेणाणी यांच्या घरातील वातावरण संगीतमय होते. शंकरराव तबला खूप छान वाजवत. घरात पं. पलुस्कर, उस्ताद अब्दुल करीम खाँ, बडे गुलाम अली खाँ, मा. दीनानाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांच्या रचना सातत्याने ऐकल्या जात. पद्मजा तीन वर्षांची असताना आईने तिच्याकडून ’शुभं करोती’, ’शब्दावाचून कळले सारे’ अशा गाण्यांचा सराव करून घ्यायला सुरुवात केली. पद्मजाला आठ वर्षांची असताना एका स्पर्धेत रचना सादर करण्याची संधी मिळाली. तेव्हा तिने ‘सजणा का धरीला परदेस’ या गीताची सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. उस्ताद हालीम जाफर खान फेणाणी यांच्या घरी आले असताना पद्मजाची रचना ऐकून खाँसाहेब म्हणाले, ‘‘इसे अल्लाहने लाखों करोडो में एक ऐसी आवाज़ बक्शी है! आप इसे शास्त्रीय संगीत सिखाइए. यह लड़की बहुत अच्छा नाम कमाएगी!’’

पद्मजा यांनी पद्मविभूषण पंडित जसराज, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांचा प्रवास यशोशिखराकडे सुरू झाला. गोड गळा ही नैसर्गिक देणगी लाभलेल्या पद्मजा फेणाणी यांचे नाव सर्वतोमुखी होत असताना अनेक कलाकारांनी त्यांच्या गायनाचे कौतुक केले… कुसुमाग्रजांच्या शब्दांत ‘स्वरचंद्रिका’, सुधीर फडपेंचा आशीर्वाद. पंडित भीमसेन जोशींचे कौतुकोद्गार, ‘माझी वारसदार’ लतादींदीचा विश्वास, ‘माझी संगीतातील लेक’ असे हृदयनाथ मंगेशकरांचे शब्द, ‘तुमच्यातल्या सरस्वतीला माझा नमस्कार’ असं यशवंत देवांचे उद्गार, ‘पाकिस्तानातील एकही गायिका तुमच्या तोडीची नाही.’ शायर निदा फाज़ली यांची अशी पावती पद्मजा यांना मिळाली.

कॅनडातील टोरांटो येथील कार्यक्रमात रसिकांनी गदिमांची ‘सांग तू माझा होशील का?’ ही भैरवी ऐकविण्याची मागणी केली. पद्मजा यांनी ती लगोलग मान्य केली. त्यांनी ‘माझा होशील का?’ असे रसिकांकडे पाहून विचारले. तो मधाळ नि खट्याळ आवाज ऐकताच रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली…‘‘हो…हो!’’

स्वरचंद्रिका पद्मजा यांच्या गायनाने आतापर्यंत लाखो रसिकांना मंत्रमुग्ध, मोहित केले आहे. स्वामी समर्थांच्या पुणे येथील मठात पद्मजाताईंनी स्वामींचे दर्शन घेतले आणि चमत्कार घडला. अचानक पद्मजा यांना तारक मंत्राची चाल सुचली. रचना स्वामी रामदासांची आणि चाल सुचवली ती स्वामी समर्थांनी! किती मोठा आशीर्वाद आहे हा! पद्मजा यांच्या आवाजातील मंत्र अनेकांच्या जीवनात ‘अमृतमय’ ठरला. पद्मजा फेणाणींना गौरवाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आदरणीय व्यक्तींनी मनापासून दिलेली थाप अविस्मरणीय असते. एकदा पद्मजा यांनी अटलजींसमोर त्यांच्या काही कविता गायल्या. त्या अटलजींना खूप आवडल्या. अटलजींनी अत्यंत कौैतुकाने टाळय़ांनी दाद दिली होती. पद्मजाताईंचा हा सांगितीक प्रवास यापुढेही असाच सुरू राहो!