लेख – भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी…

>> डॉ. प्रीतम भी. गेडाम

भ्रष्टाचारात संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची ताकद असते. जर भ्रष्टाचाराला सत्तेची ताकद मिळाली तर अशा देशाला विनाशापासून कोणीही वाचवू शकत नाही. भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वतः घेतली पाहिजे. देशासाठी आपल्याला काही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण भ्रष्टाचारमुक्त वातावरण आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करेल आणि भावी पिढय़ांना त्यांचे हक्क मिळतील.

जेव्हा एखादी व्यक्ती भ्रष्टाचारात गुंतते तेव्हा ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच काम करत नाही, तर इतरांचे हक्कही वाईट मार्गाने हिरावून घेते. ती देशाच्या विकासात आणि सुव्यवस्थेत अडथळे निर्माण करते, समाजात गुन्हेगारीची बीजे पेरते आणि अन्याय करून पीडितांच्या स्वप्नांना चिरडते. त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजाला दशकानुदशके त्रास सहन करावा लागतो. भ्रष्टाचारामुळे असंख्य निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि जीवनातील संघर्षाचे चक्र अधिक तीव्र होते.

सरकार समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. सर्व नागरिकांना विकासाची संधी मिळते. कायदा आणि सुव्यवस्था हे त्याचे मजबूत आधारस्तंभ आहेत. नागरिकांचे हक्क, सरकारी कामे योग्य रीत्या अमलात आणून आणि प्रत्येक स्तरावर विविध उपक्रमांच्या कार्यक्षम अंमलबजावणीद्वारे शासन दररोज विकासाची कहाणी लिहिते. जर या सुशासनातील एकाही घटकाने आपली जबाबदारी टाळली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काम करायला सुरुवात केली तर ते अनेकांसाठी घातक बनते आणि हळूहळू संपूर्ण व्यवस्था पोकळ करते.

आधुनिकतेचा अभिमान बाळगणारा आपला समाज आणि हीन विचारसरणी असलेले लोक कोणत्या पातळीवर विश्वासार्हतेला पोहोचले आहेत? मौलिकता, नैतिकता, सहजता, जागरूकता, नीतिमत्ता, निःस्वार्थीपणा, परोपकार, सुसंस्पृतपणा आणि प्रामाणिकपणा बाजूला ठेवून लोक वेगाने वाईट, कपट आणि स्वार्थी प्रवृत्ती स्वीकारत आहेत. लोकांची विचारसरणी अशी बनली आहे की, जेव्हा एखादे अन्याय्य पृत्य किंवा गुन्हा घडतो तेव्हाही लोक गुन्हेगाराची बाजू घेण्यास तयार असतात. काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटलो, त्या व्यक्तीने मला पैशांबद्दल स्वतःचे विचार सांगितले. ते म्हणाले की, पैसा हा देव आहे, पैसाच सर्वस्व आहे. तो कोणत्याही स्रोतातून आला तरी पैसा आदर, प्रसिद्धी, नाव आणतो. त्याद्वारे आपण सगळं काही विकत घेऊ शकतो. प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो. मग आपण प्रामाणिक का असायला हवं? आपण पैसे कसे कमावले हे कोणी विचारत नाही. पैशांसाठी गुन्हे करा, तुरुंगात जा, शिक्षा भोगा, पण एकदा पैसे मिळाले की, लोक आपले गुन्हेदेखील विसरतात. त्यांना फक्त आपला पैसा दिसतो. लोकांच्या अशा निपृष्ट दर्जाच्या वाईट विचारसरणीमुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडून गुन्हेगारीकरणाला थेट चालना मिळेल. अशा परिस्थितीत सर्वत्र जंगल राज स्थापित होईल. आज देशात अशा घातक विचारसरणीच्या लोकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आपण अनेकदा पाहतो की, निवडणुकीत जनता गंभीर गुह्यांसाठी दोषी उमेदवारांना निवडून देते. दुसरीकडे उच्चशिक्षित, निष्पाप आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याची अनामत रक्कमसुद्धा जप्त होते.

आपल्या आजूबाजूला खूप समस्या आहेत. आपल्याला अनेकदा भ्रष्टाचार आणि अनियमितता दिसते. बहुतेक लोक वाईटाविरुद्ध आवाज उठवणे टाळतात. सरकारी अधिकारी आणि पंत्राटदारांच्या बेजबाबदार पृतींमुळे अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानीदेखील होते. दरवर्षी पहिल्या पावसात रस्ते सरकारी दावे उघडे पाडतात. अब्जावधी रुपये खर्चाचे प्रकल्प काही वेळातच बंद पडतात. काम निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही आणि प्रकल्पाचे बजेट वाढत जाते. देशातील आर्थिक विषमता सतत वाढत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणारे राजकीय नेते इतरांना दोष देतात. सरकारकडून एकही महत्त्वाचा निर्णय घेण्यास उशीर केल्याने अनेकदा निष्पाप लोकांचे प्राण जातात. मृत्यूनंतर मृताच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत दिली जाते, परंतु मृताचे जीवन तर परत येत नाही. आपल्या देशात आत्महत्या करणाऱ्या गरीब शेतकऱयांची संख्या इतर कोणत्याही देशात होणाऱ्या आत्महत्यांपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत इतर कोणताही व्यावसायिक इतक्या मोठय़ा संख्येने आत्महत्या करत नाही. नेत्यांची नावे कितीही घोटाळे किंवा गुन्हेगारी कारवायांमध्ये असली तरी नेते तणावात राहत नाहीत.

प्रामाणिक व्यक्तीने नकळत केलेली छोटीशी चूकदेखील त्याला खोलवर पश्चात्तापाने भरून देते, पण अन्यायाने फायदे मिळवणारे भ्रष्ट लोक शांततेत कसे जगतात? ते कसे स्वाभिमानाने राहतात? ते त्यांच्या कुटुंबासाठी, नातेसंबंधांसाठी आणि प्रियजनांसाठी कसे ‘आदर्श’ मांडतात? वस्तू, सेवा आणि नातेसंबंधांमध्येसुद्धा आता भेसळ दिसून येते. आपला कोण विश्वासघात करेल हे आपण कधीच सांगू शकत नाही. स्वाभिमान, मानवता, प्रामाणिकपणा, कर्तव्य, सामाजिक जबाबदारी आणि नैतिकता यांचे काहीच मूल्य राहिले नाही का? आपण इतरांना दुखवून आनंद विकत घेऊ शकत नाही. जीवनात निरागस आनंद, निःस्वार्थ प्रेम, मानसिक शांती, शांत झोप आणि समाधानी मन यापेक्षा जास्त कशाचीही गरज नाही. हेच खरे सुख आहे, जे आपल्याला आपल्या आचरणातून मिळते. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर दररोज भ्रष्टाचाराच्या बातम्यांचा वर्षाव होतो. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी भ्रष्टाचाराचा सामना केला आहे. भ्रष्टाचारात संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची ताकद असते. जर भ्रष्टाचाराला सत्तेची ताकद मिळाली तर अशा देशाला विनाशापासून कोणीही वाचवू शकत नाही.

लोकांनी जागरूक व्हावे, हक्क आणि कर्तव्ये समजून घ्यावीत. आपण माणूस म्हणून जन्मलो तर मानवतेप्रती असलेले आपले कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायलाच हवे. एखाद्याने इतरांचे हक्क हिसकावून न घेता प्रामाणिक व्यक्तीची भूमिका बजावली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे जितके उच्च जबाबदारीचे पद असेल तितकेच तो जनतेला उत्तर देण्यास जास्त जबाबदार असतो. जनतेने त्याला घाबरू नये, पण जर त्याने काही चूक केली तर त्याला जनतेची भीती वाटली पाहिजे. गुन्हेगार आणि चुकीचे काम करणाऱ्या लोकांनी भीतीने जगावे, सुसंस्पृत आणि प्रामाणिक लोकांनी नाही. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी फायदे शोधते, पण फायदे देणारी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते. जर फायदे देणे बंद झाले तर भ्रष्ट माणूस फायदे मागणार कोणाला? भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वतः घेतली पाहिजे. देशासाठी आपल्याला काही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण भ्रष्टाचारमुक्त वातावरण आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करेल आणि भावी पिढय़ांना त्यांचे हक्क मिळतील.

[email protected]