
घराघरांत आज ज्या टूथपेस्ट आणि सौंदर्य प्रसाधनांनी जी अत्यंत सहज जागा मिळविली आहे, अनेकांसाठी जी बाब अतिशय मोलाची आहे, अशामध्येच जर काही घातक घटक असतील तर? ही काही शंका नाही तर ही वस्तुस्थिती आहे. घातक असलेल्या या घटकांवर बंदी नसल्यानेच या उत्पादनांच्या वेष्टनावर तो घटक असल्याचे नमूदही केलेले आहे. तो घटक आहे मायक्रोबीडस्. अर्थात कृत्रिम सूक्ष्म जिवाणू. अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचा हा घटक चेहरा, त्वचा किंवा दातांवरील मृत पेशींना काढून टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळेच त्याचा वापर वाढला आहे. मात्र हा घटक अतिशय घातक असल्याची बाब विविध संशोधनांमधून सिद्ध झाली आहे.
टूथपेस्टची उलाढाल भारतामध्ये हजारो कोटी रुपये आहे. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांचे मार्केट गेल्या काही वर्षांत तर लक्षणीयरीत्या फोफावले आहे. आदिवासी आणि दुर्गम भागातही त्वचेसाठी लागणारी अनेक सौंदर्य प्रसाधने पोहोचली आहेत.
घातक मायक्रोबीडस्वर अनेक देशांनी बंदी घातली आहे, पण भारतात अजूनही त्यावर बंदी नाही. पॉलिइथिलिनपासून बनलेले हे मायक्रोबीडस् म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडेच. त्वचा, दात, चेहरा धुतल्यानंतर मायक्रोबीडस् पाण्यात जातात. तेथूनच ते सांडपाण्यात मिसळतात. हेच सांडपाणी अनेक शहरांमधील नद्या, नाले यांच्यात सोडले जाते. मायक्रोबीडस्चे विघटन होत नसल्याने ते पाण्यात किंवा वातावरणात तसेच राहतात. हेच दूषित पाणी शेतीसह अन्य ठिकाणी वापरले जाते. मायक्रोबीडस्मुळे नदीपात्राचेही अतोनात प्रदूषण होते.
मायक्रोबीडस्विषयी अनेकानेक प्रकारे संशोधन झाले आहे आणि होत आहे. अनेक संशोधनांतून मायक्रोबीडस् हे घातक असल्याचाच निष्कर्ष निघाला आहे. याचाच आधार घेत अमेरिकेन सिनेटमध्ये ठराव करून मायक्रोबीडस्वर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे, तर आमचा देश हा मायक्रोबीडस्ने मुक्त असल्याचा दावा नेदरलँडने केला आहे. त्यासाठी अत्याधुनिक आणि व्यापक अशा सर्वेक्षणाचा आधार देण्यात आला. ही बाब पाहून जगातील अनेक देशांनी मायक्रोबीडस्कडे मोर्चा विळविला आहे. मायक्रोबीडस् अतिशय हानीकारक असल्याच्या सहज प्रतिक्रिया त्वचाविकार तज्ञांकडून ऐकायला मिळतात. असे असतानाही केवळ बंदी नसल्यानेच मायक्रोबीडस्चा विस्तार झाला आहे.