
दुसऱया सामन्यात दोनशेपार धाव मारण्यासाठी गंपू गंभीरने तिसऱया क्रमांकावर अक्षरला पाठवलं. अक्षरचा सुंदर झाला!आजच्या सामन्यात गंपू कुठली नवी क्लृप्ती लढवणार? कदाचित एखादा शिवम बदलून कुलदीप येईल, वाईडकुमार अर्शदीपऐवजी हर्षित खेळेल, किंवा संजू आणि जितेश दोघंही खेळतील! पण, त्यासाठी शुभमनला नारळ द्यावा लागेल. तिलकने धावा केल्यात. त्याचाही क्रमांक बदलू शकतो…
गंपू असं का वागतोय? गंपू पक्षपाती, अहंकारी आहे का? त्याला नेमपं काय साधायचंय?
थोडा ऊहापोह… पक्षपात आणि कारस्थान अशा संज्ञा गंपूच्या बाबतीत लागू पडत नाहीत. दोन कारणं. पहिलं, त्याची देशभक्ती. दुसरं, 2018मध्ये त्याने आय.पी.एल. स्पर्धेदरम्यान धावा होत नाहीत म्हणून दिल्ली संघाच्या कप्तानपदाचा राजीनामा दिला होता. काही कोटी रुपयांचं मानधन नाकारलं होतं! काही कोटींवर पाणी सोडण्यासाठी कमालीचा प्रामाणिकपणा लागतो. गंपू पक्षपात करतो असं म्हणावं तर ‘आवडतं-नावडत’ प्रत्येकाचं असतं. राणाचीच प्रगती पहा!
गंपू अहंकारी आहे का अन् त्याला नेमपं काय साधायचंय? गंभीर अति-स्वाभिमानी आहे असं मी म्हणेन. त्यातूनच प्रामाणिकपणा मनात, डोक्यात भिनतो. बोलण्यापूर्वी तो दोन वेळा विचार करत नाही. तसा विचार करणारे एक तर घाबरट असतात किंवा त्यांना काही गमावण्याची भीती असते किंवा ते कपटी असतात! गंपू अति प्रामाणिक आहे.
आता अति महत्त्वाचं. गंपू दोन विश्वचषक विजयाचा साक्षीदार. पण जनता दोन्ही उत्सव फक्त धोनीशी निगडीत मानते असा त्याचा भ्रम आहे. माझ्या मते, 2026चा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी आवश्यक असा जबरदस्त संघ मिळाल्याची जाणीव त्याला आहे अन् तो जिंकल्यावरचा उत्सव केवळ आपल्या नावाशी जोडला जावा अशी त्याची इच्छा असावी. त्यासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नात ‘टोटल फुटबॉल’ची संकल्पना त्याच्या डोक्यात घर करून गेली असावी! टोटल फुटबॉल म्हणजे संघातला प्रत्येक खेळाडू कुठल्याही स्थानावर अप्रतिम प्रदर्शन करता झाला पाहिजे. 1970च्या दशकात प्रसिद्ध डच प्रशिक्षक रायनस मिशेल्सने स्टार फुटबॉलपटू योहान क्रायफच्या साथीने ही संकल्पना काही प्रमाणात यशस्वीपणे प्रत्यक्षात आणली होती. 1974 आणि 1978 अशा लागोपाठच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत हॉलंडने धडकही मारली होती. मग, गंभीर शुभमनला क्रायफ बनवून स्वतः मिशेल्स बनू पाहतोय का? गंभीर फुटबॉल अन् मॅन-यूचा मोठा चाहता आहे, म्हणून हा विचार मनात आला इतपंच!
अनेक वर्षांपूर्वी मी गंपूला भेटलो होतो. अर्थात, गंपूला आधीच्या सामन्यात कोण कुठल्या क्रमांकावर खेळला होता हे लक्षात राहत नाही. त्याला आमची भेट आठवणीत असेलशी अपेक्षा नाही! आज तो काय अन् कसा विचार करतो माझ्या ठावकी नाही. माझं म्हणणं एकच, टोटल क्रिकेटची अंमलबजावणी करण्याच्या नादात आणि स्वतःची आगळीवेगळी प्रतिमा उभी करण्याच्या नादात त्याने खेळाडूंचा एकूण आत्मविश्वास बिघडवलाय. त्याचं प्रामाणिकपणे बेबाक बोलणं खेळाडूंना संभ्रमात टाकतंय. त्याच्यासारखंच प्रामाणिकपणे सांगायचं तर, शुभमन काही क्रायफ नाही अन् तो स्वतः मिशेल्स नाही. अधिक महत्त्वाचं, टोटल फुटबॉलच्या संकल्पनेने हॉलंडला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेलं होतं, पण त्यांना विजय मिळाला नव्हता!
























































