
>> श्रीरंग काटेकर
सातारच्या भूमीतील धैर्या कुलकर्णी हिने पूर्व आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेले किलीमांजारो त्याचप्रमाणे युरोपातील माऊंट एलब्रस शिखर अवघ्या बाराव्या वर्षात सर करून इतिहास घडविला आहे.
धैर्य आणि साहसी वृत्ती ही उपजतच अंगी असावी लागते तरच जीवनात पाहिलेले स्वप्न हे खऱया अर्थाने सत्यात उतरते याची प्रचीती सातारा येथील धैर्य विनोद कुलकर्णी हिच्या गिर्यारोहण क्षेत्रातील उत्तुंग कार्यातून येते. अवघ्या बाराव्या वर्षात तिने पूर्व आफ्रिकेतील किलीमांजारो हे तब्बल 5 हजार 895 मीटर उंच शिखर प्रतिकूलतेशी झगडत सर केले. भल्याभल्या गिर्यारोहकांना जे नेहमीच आव्हानात्मक वाटत आले आहे, ते धैर्या कुलकर्णी हिने प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर करून दाखविले.
घरापासून हजारो किलोमीटर दूर व पालकांच्या आधाराशिवाय तिने येणाऱया प्रत्येक संकटाशी मुकाबला करीत जे धैर्य दाखविले त्याची कल्पनाच करता येत नाही. तिने उचललेले हे शिवधनुष्य सोपे नव्हते. यासाठी तिने घेतलेली मेहनत, दिवस दिवस केलेला सराव खऱया अर्थाने कामी आला. मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा समतोल साधताना घेतलेले कठोर परिश्रम तिला प्रत्यक्ष मोहिमेत उपयोगी पडले. गिर्यारोहण हा जिवावर बेतणारा खेळ आहे. यामध्ये सुरक्षिततेची काळजी न घेतल्यास हे साहस जिवावर बेतू शकते. विशेषत एव्हरेस्ट व किलीमांजारो शिखर सर करताना अनेक गिर्यारोहकांची दमछाक होते. अनेक जण ही चढाई अर्धवट सोडून देतात. अशा खडतर असलेल्या शिखरावर अवघ्या बारा वर्षांच्या धैर्याने ज्या आत्मविश्वासाने चढाई करून हे शिखर सर केले ते खूप कौतुकास्पद आहे. तिच्या अतुलनीय कामगिरीसाठी एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते हिने दिलेली अनमोल साथ ही तितकीच मोलाची ठरली आहे.
स्वप्नांना आत्मविश्वासरुपी पंख लाभले तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उंच उंच भरारी सहजपणे घेता येते हे धैर्या कुलकर्णी या मुलीने सिद्ध करून दाखविले आहे. किलीमांजारो व युरोपातील माऊंट एलब्रस शिखरावर तिने अखेर तिरंगा झेंडा फडकवून सर्व देशवासीयांना अभिमान वाटावा असे कर्तृत्व करून दाखवले आहे.





























































