ठसा – डॉ. दादा परुळेकर

>> पंढरीनाथ तामोरे

सातपाटी-पालघर परिसरामध्ये प्रदीर्घकाळ वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे डॉ. विनायक रघुनाथ परुळेकर ऊर्फ दादा परुळेकर यांचे नुकतेच वयाच्या 101 व्या वर्षी पालघर येथे निधन झाले. त्यांना इंजेक्शन न देणारे डॉक्टर म्हणून ओळखत असत. दादांच्या जडणघडणीत त्यांच्या काैटुंबिक पार्श्वभूमीचा फार मोठा वाटा आहे. घरात आणि आजूबाजूला स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण असल्याने आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही आई-वडिलांची इच्छा आणि ज्या गावात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, त्या सातपाटी गावाला असलेला स्वातंत्र्यलढय़ाचा देदीप्यमान इतिहास. सेवादल, समाजवादी पुरोगामी चळवळीत अग्रगण्य असलेले हे गाव. या साऱयांचा दादांच्या जडणघडणीत फार मोठा वाटा राहिला. शिक्षणानंतर पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत असताना दादा व त्यांच्या मित्रांनी समाजवादी मित्र मंडळ स्थापन करून सदर मंडळाद्वारे अभ्यास वर्ग सुरू केले होते. दर रविवारी समाजवादी नेत्यांचे त्यांना मार्गदर्शन होत असे. त्यामध्ये ना. ग. गोरे, सदाशिव बागाईतकर, आचार्य केळकर, विनायक कुलकर्णी, प्रा. ग. प्र. प्रधान आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या समाजवादी विचारांची बैठक पक्की झाली. त्या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेडय़ाकडे चला’ अशी हाक दिली होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून दादा पुन्हा पालघरमध्ये आले आणि दवाखाना सुरू करण्यासाठी त्यांनी हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातपाटी गावाची निवड केली. त्या वेळच्या पालघर येथील डॉ. जी. जी. जोशी, डॉ. कुलकर्णी, केळव्याचे डॉ. भाई जोशी, बोईसरचे डॉ. स. दा. वर्तक या काही मोजक्याच डॉक्टरांच्या पंक्तीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून दादा सर्वश्रुत होते. दादांच्या विवाहानंतर दादांच्या पत्नीसुद्धा सातपाटी येथे खेडय़ात येऊन स्थायिक झाल्या.

दादा सातपाटी येथे वैद्यकीय सेवा करीत असताना सातपाटीत मुलांची माध्यमिक शिक्षणाची गरज ओळखून सातपाटीतील सहकाऱयांसोबत त्यांनी ‘आदी जनता’ या नावाने हायस्कूल सुरू केले. या शिक्षण संस्थेचे संस्थापक व सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. 1974 मध्ये शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याकडे ही शाळा सुपूर्द करेपर्यंत दादा या संस्थेचे सचिव म्हणून विनावेतन या पदावर काम करीत होते. सातपाटी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यामागे दादांचा मोठा वाटा आहे. या कामासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर दादा घरोघरी फिरले होते. जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, नानासाहेब गोरे, नवनीतभाई शहा ही दादांची प्रेरणास्थाने होती. एकदा सातपाटी येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या पुस्तिकेच्या प्रकाशनाला गेलो असताना मी त्यांना ‘दर्याचा राजा’ अंक पाठविला. त्यांनी तो अंक पाहिला आणि मला लगेच व्यासपीठावर बोलावून म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले कार्य करीत आहात.’’ असे म्हणून त्यांनी मला पुष्पगुच्छ आणि वर्गणी देऊन व्यासपीठावर माझा सत्कार केला. सतत कोणत्या ना कोणत्या कामात ते व्यग्र राहायचे आणि इतरांनाही ठेवायचे हा त्यांचा आवडता छंद होता.

दादा काठीची सोबत घेऊन करारी बाण्याने आणि जिव्हाळय़ाने आपल्या प्रेमाच्या माणसांना हक्काने काम सांगत असत. दादांनी अनेक संस्था चालवल्या, वाढवल्या. अखेरपर्यंत ते मार्गदर्शकाच्या भुमिकेतून संस्थांना मदत करीत असत. वैद्यकसेवा, समाजसेवा क्षेत्रात स्वतःची ओळख उमटविणारे हसतमुख, सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाने भारलेले डॉ. दादा परुळेकर शक्तीच्या जोरावर वय आणि व्याधीचा विसर पडून कार्य करीत होते.

सातपाटी येथे दादा, वि. र. परुळेकर (दादा) स्फूर्तिस्थान समितीतर्फे त्यांचा अर्धपुतळा, गौरवग्रंथ आणि स्मरणिका प्रकाशित केलेली पाहताना ‘अजि सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनु’ असं म्हणावसे वाटते.