परीक्षण- गुन्हेगारी विश्वाचा थरारक इतिहास

>> श्रीकांत आंब्रे

दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर आणि गुन्हेगारी विश्वातील ताज्या घटनांचा वेध घेणाऱ्या ‘पोलीस डायरी’ या वाचकप्रिय सदराचे लेखक प्रभाकर पवार यांचे ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक. गेल्या तीस-पस्तीस वर्षांतील प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील काही जिह्यांत गुन्हेगारीने घातलेला धुमाकूळ आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मुंबईतील गुन्हेगारी जगताचे त्यांनी घेतलेले थरारक अनुभव याचे कुणालाही अस्वस्थ करून सोडतील असे पडसाद या पुस्तकात उमटलेले पाहावयास मिळतील. मुंबईने गेल्या तीस-पस्तीस वर्षांत गुन्हेगारी विश्वाचे अक्राळविक्राळ आणि काळजाचा थरकाप उडवणारे भयानक रूप जितके पाहिले असेल तितके देशातील कोणत्याही शहराने क्वचितच पाहिले असेल. गुन्हेगारी ही तर गेली तीन दशके मुंबईच्या पाचवीलाच पुजलेली आहे. गँगवार, गुंड टोळय़ांच्या आपापसातील वैमनस्यातून झालेली खूनबाजी, घातपात, धाडसी पोलीस अधिकाऱयांनी शेकडो गुंडांचे केलेले एन्काऊंटर, पाकिस्तानी अतिरेक्यांनी घडवलेल्या बाम्बस्फोटांत बळी गेलेले निष्पाप जीव, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील नेत्यांच्या झालेल्या हत्या, खंडणीखोरांची चलती, पोलीस खात्यातील हेवेदावे आणि भ्रष्टाचार यांसारख्या मुंबई, महाराष्ट्राला बदनाम करणाऱया एक नव्हे, शेकडो घटना प्रभाकर पवार यांनी प्रत्यक्ष पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. कोणाचीही भीडभाड न ठेवता अगदी स्वच्छपणे त्या या पुस्तकात त्यांनी सहजशैलीत मांडल्या आहेत. प्रामाणिक, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱयांच्या कर्तबगारीचे, त्यांच्या त्यांना भावलेल्या गुणांचे ते भरभरून कौतुक करतात, तर त्या खात्यातील गैरव्यवहारांबद्दलही सडेतोडपणे लिहितात. लेखनातील ही पारदर्शकता हा त्यांचा सर्वात मोठा गुण या पुस्तकात अनुभवायला मिळतो. ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे आघाडीचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रभाकर पवार यांना क्राइम रिपोर्टिंगची संधी दिली आणि या संधीचे पवार यांनी सोने केले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत सुरू झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचे रिपोर्टिंग करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि ती त्यांनी जिवाची पर्वा न करता कशी पार पाडली हे त्यांच्या शब्दांतच वाचायला हवे. त्यावेळी मुंबईतील मुस्लिमबहुल संवेदनक्षम भागातील रिपोर्टिंग करताना प्रचंड थ्रिल त्यांना अनुभवायला मिळाले. संजय राऊत यांनी पवार यांचे ‘क्राइम डायरी’ हे साप्ताहिक सदर ‘सामना’त सुरू केले, ते खूप लोकप्रिय झाले. आज 32 वर्षांनंतरही ते सुरू आहे. यावरून त्यांच्या लिखाणाची मातब्बरी लक्षात येईल.

त्यांचे आताचे ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गेल्या तीस-पस्तीस वर्षांतील गुन्हेगारीचा थरारक इतिहास आहे. एखाद्या गुन्हेगारी घटनेबद्दल लिहिताना पवार यांनी पाळलेला संयम, कुठेही भडक वा सनसनाटी अतिरंजितपणा येऊ न देता त्या घटनेशी संबंधित सर्व बाबींकडे, प्रामुख्याने अंडरवर्ल्डकडे ते तटस्थपणे पाहत हे या लेखनातून जाणवते. बोलीभाषेतील शब्द वापरून सहज, सोप्या शैलीत लिहिणे हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. ओघवती भाषा, मोजके तपशील, चपखल शब्दप्रयोग आणि गुन्हेगारी विश्वातील एखादा घडलेला प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा डोळय़ासमोर उभा करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लिखाणातून दिसते.

या पुस्तकात बाबरी मशीद विध्वंसानंतर मुंबईत पेटलेल्या दंगलीपासून आजच्या बीड जिह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर, पाशवी, निर्दय पद्धतीने करण्यात आलेल्या निर्घृण हत्येपर्यंत मुंबई-महाराष्ट्रातील बहुतेक सर्व गुन्हेगारी घटनांचा विस्तृतपणे वेध घेताना तो प्रसंग ते अक्षरशः डोळय़ासमोर उभा करतात. या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रांतून त्या-त्या वेळी वाचल्या असल्या तरी त्यातील थरार लेखकाच्या शब्दाशब्दांतून अनुभवायला मिळतो. मात्र तो अतिरंजित वा भडक नसतो. मुंबई-महाराष्ट्राने या गुन्हेगारीमुळे किती वेगवेगळय़ा प्रकारचा ताप भोगला असेल हे इथे प्रत्ययकारीपणे पाहायला मिळते. त्याचे तारीखवार अधिकृत तपशील पवार देतात आणि ती घटना डोळय़ासमोर उभी करतात. मुंबईत तीस-पस्तीस वर्षांपूर्वी गुंड टोळय़ांनी घातलेला हैदोस अनेकांनी अनुभवला असेल. मुंबई-महाराष्ट्रावर राज्य कुणाचे आहे, सरकारचे की गुंड टोळय़ांचे? असा प्रश्न पडावा इतके थैमान या गुंड टोळय़ांनी मुंबईत घातले होते. दाऊदपासून छोटा शकील, छोटा राजन, अमर नाईक, अरुण गवळीपर्यंत अनेक गुंडांचे साम्राज्य पोलीस खात्याने कसे संपुष्टात आणले, याच्या थरारक हकिगती व या गुंडगिरीला, खंडणी वसुलीला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने ठरवून केलेले शेकडो गुंडांच्या एन्काऊंटरचे प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात.

1993 ची हिंदू-मुस्लिम दंगल म्हणजे एक काळे पर्व असे त्याचे वर्णन ते करतात. त्या दंगलीत 800 च्यावर मारले गेलेले निरपराध लोक आणि निष्पापांना भोगाव्या लागलेल्या यातना, जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीतील अग्निकांड, 2003 मध्ये अतिरेक्यांनी मुंबईच्या अनेक भागांत घडवून आणलेले बाम्बस्फोट, अतिरेक्यांनी मुंबई लोकलमध्ये केलेले बाम्बस्फोट, त्यात 76 प्रवाशांचे गेलेले बळी, 2008 ला समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या पाकिस्तानी अतिरेकी कसाब आणि त्याच्या दहा सहकाऱयांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह ताज, ओबेराय, नरीमन हाऊस येथे पाडलेला रक्ताचा सडा, शेकडो निरपराध्यांसह मुंबई पोलीस अधिकारी हेमंत करकरे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे यांचे घेतलेले बळी, शेकडो निरपराध्यांना गमवावे लागलेले जीव हे सारे थरारक प्रसंग या कसाब करणीतील भयानक हत्याकांडाचे पुरावे म्हणून अस्वस्थ करून जातात.

तेलगी प्रकरणात तसेच दिल्लीतील महाराष्ट्र भवन घोटाळय़ात दोषी ठरलेल्या छगन भुजबळांची तुरुंगयात्राही त्यांचा भंपकपणा दाखवणारी आहे. शिवसेना आमदार विठ्ठल चव्हाण, नगरसेवक के. टी. थापा, शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर, भाजप नेते प्रमोद महाजन, पासेट किंग गुलशन कुमार, कामगार नेते डा. दत्ता सामंत यांच्या झालेल्या निर्घृण हत्या आणि त्यामागील कारणांची मीमांसाही प्रभाकर पवार करतात. शक्ती मिलमधील छायाचित्रकार तरुणीवरील गँगरेप, वाकोला पोलीस ठाण्यात एका पोलीस शिपायाने आपल्या वरिष्ठांची त्यांच्याच पिस्तुलाने केलेली हत्या व त्यानंतर तिथेच स्वतःवर गोळी झाडून केलेली आत्महत्या, बँका लुटून परदेशी पलायन केलेले विजय  मल्ल्या, नीरव मोदी, कुर्ल्याला नेहरूनगर येथील एका पोलीस ठाण्यात रांग लावून लाच घेताना सापडलेल्या 37 पोलीस शिपायांना झालेली अटक व त्यांचे सेवेतून झालेले निलंबन, 2020 मध्ये कोरोनाने मुंबईसह महाराष्ट्रात घेतलेले दहा हजारांवर बळी, कोरोना काळात बनावट लस विकून प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे महाभाग, याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीरोदत्तपणे हजारो मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या तत्पर सेवेची देशभरात झालेली प्रशंसा, हे सारे संकटातही दिलासा देणारे ठरते.

शिक्षक भरती घोटाळय़ातील प्रमुख आरोपी नामदेव सुपे याच्या अवैध संपत्तीवर पडलेली धाड, अभिनेता सुशांतसिंग व त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती यांच्या आत्महत्येचे गूढ, पाकिस्तानी हनी ट्रापमध्ये सापडलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला पुरवलेल्या गुप्त माहितीबद्दल झालेली अटक, अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील घरावर बिष्णोई गँगने केलेला गोळीबार, पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मलबार हिल येथील घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कार्पियो गाडी ठेवून केलेला त्यांच्या खुनाचा वा खंडणी वसुलीचा संभाव्य डाव कसा फसला व त्याच्यासह दहा पोलीस अधिकाऱयांना तुरंगाची हवा कशी खावी लागली याची हकीकत रहस्यमय कथेसारखी आहे.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबांनी हाटेलमध्ये चालणाऱया डान्स बारवर घातलेली बंदी व तिचे परिणाम, एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आमदारांसह सत्तालोभाने भाजप महायुतीत प्रवेश करून मिळवलेले मुख्यमंत्रीपद यांसारख्या अनेक राजकीय प्रसंगांचे मुंबई-महाराष्ट्रावर झालेले परिणाम या पुस्तकात वाचायला मिळतात. विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांना तुरंगात टाकण्यासाठी सरकारने केलेल्या ‘ईडी’च्या गैरवापरामुळे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना तीन महिने भोगावा लागलेला तुरंगवास व नंतर त्यांची जामिनावर झालेली सुटका ही सरकारची सूड घेण्याची पद्धत अमानुष होती. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक विरोधकांना सूडबुद्धीने तुरंगात डांबण्यात आले होते. हा ‘ईडी’चा गैरवापर होता. त्याचे दाखलेही प्रभाकर पवार यांनी दिले आहेत. त्यातून मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचे तसेच राजकारणातील, समाजकारणातील सत्तापिपासूंचे विदारक चित्र पाहायला मिळते. प्रभाकर पवार यांचे हे पुस्तक गुन्हेगारी फोफावण्यास जबाबदार असलेल्या अनेक राजकारण्यांचा व ढोंगी समाजसेवकांचा नक्कीच पर्दाफाश करील. तन्मय राजन शेलार याचे मुखपृष्ठही आकर्षक आहे. कोणत्याही प्रकारच्या वाचकाला समाधान देणारे हे उत्कंठावर्धक पुस्तक मराठी वाचकांनी वाचायलाच हवे.

मी पाहिलेला तीन दशकांतील थरार!

लेखक ः प्रभाकर पवार

प्रकाशक ः पप्पू-प्राची प्रकाशन, दहिसर

पृष्ठे ः 304  मूल्य ः रु. 400/-