स्वयंपाकघर- खाद्यसंस्कृतीची भरारी

>> तुषार प्रीती देशमुख

खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणाऱया वीणांजली प्रभू यांचा या क्षेत्रातील प्रवास स्वतचे रेस्टॉरंट सुरू करण्यापर्यंत झाला. उंच भरारी घेत मिळवलेले हे यश अनेकींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

स्वच्छंद फुलपाखरासारखी बागडणारी ‘ती’ कर्नाटकमधील रायचूर जिह्यातील सिंधनूर गावातील कुंदा नायक यांच्या पोटी जन्माला आली. तिचे नाव वीणांजली. ती आठ वर्षांची असतानाच वडील सदानंद नायक यांनी त्यांचे बंधू गंगाराम नायक व वहिनी शांताबाई नायक यांना मूल होत नसल्या कारणाने त्यांची मुलगी सुपुर्द केली. त्यांचे बिजापूर जिह्यातील गुळेदगूड गावात चार भावंडांचे शाकाहारी जेवणाचे प्रसिद्ध नायक हॉटेल होते. गंगाराम नायक यांनी स्वतचे मांसाहारी पदार्थांचे
हॉटेल चालू केले. गंगाराम नायक हे स्वत उत्कृष्ट शेफ, हॉटेलमध्ये जे जेवण बनवले जायचे त्यातलेच ते रात्रीच्या जेवणासाठी घरी घेऊन यायचे. त्यामुळे वीणांजलीताईंची जेवणाची चंगळच होती. लहानपणापासूनच त्यांच्या दोन्ही आई-वडिलांकडून तसेच सर्व भावंडांकडून त्यांचे खूप लाड व्हायचे.

त्यांच्या नात्यातील एकाचे मुंबईत राहत असलेले मित्र सुब्राव प्रभू यांच्या घरी येणे-जाणे जास्तच वाढू लागले. तेव्हाच त्यांनी वीणांजलीताईंसाठी आई-वडिलांकडे शब्द टाकला. वीणांजलीताईंचा सुब्राव प्रभू यांच्याशी वयाच्या 18 व्या वर्षी विवाह झाला व त्या मुंबईला स्थायिक झाल्या. मुंबईला त्या आल्या खऱया, पण गावची कन्नड भाषा सोडल्यास त्यांना कोणतीही भाषा येत नव्हती. हळूहळू त्याही उत्कृष्ट मराठी बोलू लागल्या, जेवणामधील सासर- माहेरच्या पद्धती हाताळू लागल्या. वीणाताईंनी घरातल्या सगळ्या जबाबदाऱया स्वीकारत काहीतरी करून दाखवायचे निश्चित केले होते. स्वयंपाक जरी येत नसला तरी खाद्य संस्कृतीत लहानाच्या मोठय़ा झालेल्या वीणाताईंना सासरी आल्यावर जेवण करण्याची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे त्या जेवण करण्यात सदैव आनंदी असायच्या. स्वयंपाकातले गमक कळल्यावर त्यांनी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले, जे घरातल्या प्रत्येकाला आवडू लागले.

सुब्राव व वीणाताईंना दोन मुले झाली. मुलगा दीपेन प्रभू व मुलगी अनुष्का प्रभू. संसाराची व मुलांची जबाबदारी सांभाळत वीणाताई घरातूनच मुलांच्या शिकवण्या घेत असत. दिवसाला 40 मुले असायची. हे काम अनेक वर्षे त्यांनी केले. हे सर्व करत असतानाच त्यांना त्यांच्याकडे शिकत असलेल्या एका मुलीच्या कार्यक्रमासाठी दूरदर्शनला शूटिंग पाहायला जाण्याचा योग आला. तेव्हा तिथे त्या खाद्यसंस्कृतीबद्दल बोलल्या. त्यांची आवड पाहून दूरदर्शनवरील ‘रुचिरा’ कार्यक्रमात त्यांना पदार्थ सादरीकरणासाठी संधी मिळाली. वीणाताईंचे बोलणे, पदार्थ सादर करण्याची पद्धत, पदार्थ समजावून सांगण्याची पद्धत हे सर्व उत्तम असल्यामुळे त्यांना अशा कार्यक्रमांतून बोलावणे येऊ लागले. संजीव कपूर यांच्या ‘फूड फूड‘  कार्यक्रम, झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’, कलर्स मराठीवरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ आणि आकाशवाणीवरील श्रोत्यांना पदार्थ ऐकवण्यासाठीही त्यांना आमंत्रित केले गेले.

दूरचित्रवाहिनीवर येत असतानाच वीणाताई अनेक पाककला स्पर्धांमध्ये भाग घेउढ लागल्या. मनापासून व उत्तम पद्धतीने त्या पदार्थ सादर करत असल्यामुळे नेहमीच त्यांचा पहिला नंबर लागायचा. शेवटी त्यांनी ठरवले की, अनेकांना संधी द्यावी. यासाठी त्यांनी पाककला स्पर्धांमध्ये भाग घेणे थांबवले व पाककला स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून  अनेक ठिकाणी जाऊ लागल्या.

मुलगा दीपेन याला खाण्याबरोबरच आठवीत असल्यापासूनच जेवण करण्याची आवड निर्माण झाली. त्याने हॉटेल
मॅनेजमेंट केले. वीणाताईंच्या ओळखींमुळे व स्वभावामुळे कोरोनाच्या काळात अनेक एकटय़ा असलेल्या आजी-आजोबांनी त्यांना फोन करून “आम्हाला जेवणाचे डबे मिळतील का?’’ याची विचारणा केली. व्यवसायाचा कधीही संबंध नसलेल्या वीणाताईंनी आपलेपणाने त्या सगळ्यांना पैशांची अपेक्षा न करता जेवणाचे डबे पाठवले. कर्तव्य म्हणून ते पार पाडले. वीणाताईंनी त्यांच्या या वाढत्या मागणीकडे पाहून कोरोनाच्या काळात रोजगार नसलेल्या जिम ट्रेनर्सना हाताशी धरून डबे घरोघरी पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले व त्यांना रोजगार मिळवून दिला.

जसा काळ सरला तसा पुन्हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की पुढे काय करायचे? तेव्हा मुलाने त्यांच्याकडे हट्ट धरून स्वतचे रेस्टॉरंट चालू केले. दरम्यान, त्यांनी घरातूनच ‘व्हीपी किचन’ नावाने व्यवसाय सुरू केला होताच. दादरमधील ‘सीबझ’ या समूहाच्या मनाली कामत यांनी वीणाताईंना स्वतचे रेस्टॉरंट चालू करण्यासाठी प्रेरित केले. वीणाताईंनी अनेक वेगवेगळय़ा इव्हेंटमधून फूड स्टॉल्सवर आपले पदार्थ सादर करून व्यवसायाची सुरुवात केलीच होती. दादरमध्ये स्वतचे रेस्टॉरंट सुरू करायचे हे वीणाताईंनी निश्चित केले व त्याप्रमाणे रेस्टॉरंटसाठी जागा शोधू लागल्या. रूपारेल कॉलेजच्या मागच्या बाजूला सामसूम गल्लीमध्ये जिथे ट्रफिक कमी प्रमाणात होते तिथे जागा निश्चित केली. अनेकांनी त्यांना ती जागा पाहिल्यावर वेडय़ात काढले, पण हीच जागा उंच भरारी घेण्यासाठी मदत करणार हा त्यांचा विश्वास होता. मिताली तोडणकर यांच्याबरोबर 2024 साली सुरू केलेल्या ‘मुंबई वाईब्स’ या रेस्टॉरंटची नुकतीच यशस्वी वर्षपूर्ती झाली. तेव्हा वीणाताई, मितालीताई व त्यांचा मुलगा दीपेन यांची मेहनत व त्यांनी घेतलेला निर्णय फळाला आला असे म्हणायला हरकत नाही.

वीणाताई म्हणतात, संकटे तर येणारच, पण ती हसतमुखपणे पेलण्याची ताकद जर आपल्यामध्ये असेल तर ती कधी भुर्रकन उडून जातात हे कळतही नाही. त्यांच्या जिद्दीला खरोखरच सलाम.

[email protected]

(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)