कलारंग – दृश्यकलेतील मौन संवेदना

>> आशीष यावले

समकालीन दृष्यकलेतील ‘मौन’ या संकल्पनेवर आधारित ‘फ्रॅगमेंट्स ऑफ सायलेन्स’ हे कलाप्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे

द्बश्यकला निर्मिती ही एक उन्मुक्त सर्जनशील क्रिया आहे. अलीकडच्या काळात दृश्यकलेत शब्द नसलेली भाषा आणि रंगरेषांच्या पलीकडच्या संवेदना प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. अशाच निशब्द कलेशी नाते जुळलेल्या संवेदनशील कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे.

समकालीन दृष्यकलेतील ‘मौन’ या संकल्पनेवर आधारित ‘फ्रॅगमेंट्स ऑफ सायलेन्स’ या कलाप्रदर्शनात अभिषेक चौरसिया, सिद्धार्थ बेटाजेवर्गी, उमेश नायक, विनोद चाचेरे, विनय बागडे आणि विरेंद्र चोपडे या चित्रकारांच्या बहुविध माध्यमातील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. हे कलाप्रदर्शन 18 ऑगस्टपर्यंत आहे.

संस्कृती आणि परंपरा

भारतीय समकालीन कलेतील युवा चित्रकार, प्रिंटमेकर अभिषेक चौरसिया यांच्या कलाकृतीमध्ये संस्कृती आणि परंपरा दर्शविण्राया प्रतिकात्मकतेमधून उत्पन्न होणारे भावविश्व दिसून येते. पौराणिक संदर्भ दर्शविणारी प्रतिकात्मक चित्रे, गूढ रेषा, पृष्ठभागांवरील सूक्ष्म पोत, गडद आणि शीत रंगामध्ये रेखाटलेल्या मानवी प्रतिमा चित्त वेधून घेतात.

आई आणि मूल

प्रख्यात शिल्पकार सिद्धार्थ बेटाजेवर्गी हे निसर्गातील घटक आणि विशेषत झाडाच्या वाळलेल्या पानांच्या सौंदर्याने प्रेरित आहेत. त्याच प्रेरणेतून त्यांनी कागदाच्या लगद्यापासून विविध शिल्पे घडविली आहेत. ‘आई आणि मुल‘ यांच्यातील नात्याचा भाव दर्शविण्राया शिल्पांची रचना मातृत्वाच्या पवित्र आणि नाजूक भावनांचा अविष्कार दर्शवते.

संस्कृती आणि पर्यावरण

ओरिसा राज्यातील भीमपूर येथील उमेश नायक हे एक बहुआयामी कलाकार आहेत. शिल्पकला व इन्स्टॉलेशन या कला प्रकारातील अमूर्त आणि वास्तववादी शैलीत साकारलेल्या त्यांच्या कलाकृती अतिशय सुंदर आहेत. संघर्ष आणि ओळख यावर भाष्य करणारी ‘सिम्बायोटिक बीइंग‘ ही कलाकृती अतिशय बोलकी आहे.

मानवी मन आणि चौकट

विनोद चाचेरे या संवेदनशील आणि सर्जनशील चित्रकाराने स्थिर आणि अस्थिर मनाचा वेध घेण्यासाठी रेषा, रंग आणि विविध आकाराच्या सहाय्याने माणसाच्या आत्म-संवाद प्रक्रियेला दृश्यरुप देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘इकोज अॅण्ड ओरीजिन‘ या चित्रातील सोनेरी-तपकीरी रंगांच्या छटामध्ये चितारलेले ‘मानवी चेहरे‘ आणि ‘मासोळी‘च्या आकृतीची मध्यवर्ती रचना खिळवून ठेवते.

संस्कृती आणि अभिव्यक्ती 

मातीशी नाळ कायम राखत, आपल्या कलाकृतींमधून ग्रामीण संस्कृतीचे चित्रण करणारे चित्रकार विनय बागडे यांनी समकालीन कलाजगतावर आपल्या कलाकारीतेचा ठसा उमटविला आहे. मराठवाडा भागातील बंजारा समुदायावर आधारित त्यांची चित्रमालिका सुखद रंगसंगती आणि विशिष्ट आकारांच्या सहाय्याने कॅनव्हासवर अलगद साकारली आहे.

निसर्ग आणि सर्जनशीलता 

तत्वचिंतक वृत्ती, विविध रंग माध्यमांवरील हुकूमत, तरल हाताळणी यांच्या सुंदर मिलाफातून जीवनाविषयीचा व्यापक दृष्टीकोन आणि सृष्टीतील पाने-फुलांच्या आकारातून भावनाविष्कारांचे सूक्ष्म रंगचित्रण करीत विरेंद्र चोपडे या चित्रकाराने कलाजगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

[email protected]