
>> जयवंत मालणकर
सध्या गौरी–गणपतीच्या उत्सवाची धामधूम सुरू आहे. गणपतीच्या आगमनानंतर आता गौराईच्या पुजेचा थाटही मांडला जात आहे. आज गौराईचे आगमन झाले. कुठे गणेशाची माता म्हणून, कुठे महालक्ष्मी म्हणून तर कुठे माहेरवाशीण म्हणून गौराईचे सोवळेओवळे जपत कोडकौतुक केले जाते. स्त्रीच्या भावभावनांची प्रतीकं दर्शवणारे हे उत्सव संस्कृतीशी असलेले बंध अजून दृढ करतात.
राज्यभरात गणपतींचे मोठय़ा थाटामाटात आणि धुमधडाक्यात आगमन झाले आहे. आज म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमीला अनुराधा नक्षत्रात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येईल. ज्येष्ठा गौरी आवाहन हा महाराष्ट्रात साजरा होणारा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समस्त महिला घराच्या सभोवताली पावसाळ्यात रुजलेल्या तेरडय़ाला मुळासकट उपटून त्या तेरडय़ाच्या गौरी आणून ज्येष्ठा गौरींचे घरोघरी स्वागत करतात. तेरडय़ाची मुळे म्हणजेच गौरीची पावले, असा पूर्वीपासूनचा समज आहे. म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत, चमच्याने ताट वाजवत किंवा घंटी वाजवत गौरी आणल्या जातात. गौरीची पूजा घरातील सुहासिनींकडून केली जाते. दुपारी गोड शिऱयाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी भाकरी आणि पालेभाजीचा नैवेद्य दाखवतात. रात्रीची जेवणं आटोपल्यानंतर दुसऱया दिवशी साजऱया होणाऱया गौरी पुजनाची तयारी घरातील महिला करायला घेतात. घरातील पुरुष मंडळींनी अगोदरच गौरीला साडी नेसवण्यासाठी बांबूचा कोथळा तयार केलेला असतो. अलीकडच्या काळात बाजारात लाकडी तसेच लोखंडी कोथळे सहज उपलब्ध होतात. काही ठिकाणी गौरीचा मुखवटा लाकडात कोरलेला असतो तर काही जणांकडे पितळी धातूचा किंवा शाडूच्या मातीचा असतो. स्थळपरत्वे गौरीच्या पूजेची पद्धत, परंपरा बदलत आहेत. बदलत्या काळानुसार पूर्णाकृती उभ्या तसेच बैठय़ा फायबरच्या गौरीही दादर, गिरगावच्या बाजारात सहज उपलब्ध होतात. माझ्या गवाणे, देवगड येथील निवासस्थानी 1985पर्यंत गौरीचा मातीचा मुखवटा होता, त्यानंतर दादर येथील मोठय़ा काकांनी पितळी धातूचा मुखवटा आणला तो 2022पर्यंत वापरला जात होता. कालानुरूप काहीतरी नावीन्यपूर्ण बदल म्हणून 2023 साली मी आणि चुलत बंधूंनी गिरगाव येथून बसलेल्या पूर्णाकृती अतिशय सुबक अशा फायबरच्या गौरीची स्थापना केली.
दुसऱया दिवशी म्हणजेच नवमीला गौरी पुजनाचा कार्यक्रम असतो. तिच्यासमोर सुपात ओवसा मांडलेला असतो. या दिवशी माहेरवाशिणी न चुकता माहेरी येतात. दुपारच्या आरतीनंतर काळ्या वाटाण्याची उसळ, वडे , बेसन लाडू, रवा लाडू, चकली, गुळपापडीचा लाडू, शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात काही ठिकाणी या दिवशी मांसाहारी, मत्स्याहारी जेवणाची पूर्वीपासूनची प्रथा आजही जोपासली जाते. दुपारच्या जेवणानंतर गौरीसमोर महिलांच्या पारंपरिक फुगडय़ा, टिपरी नृत्य, पेटत्या समयी नृत्य असे खेळ खेळले जातात. कोकणात काही ठिकाणी या दिवशी सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला, मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत आजही प्रचलित आहे. रात्री नैवेद्यात पुरणपोळी, ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी तसेच एकत्रित भाज्यांचा समावेश असतो.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. त्याआधी पूजा आणि आरती केली जाते. गोड शेवयाची खीर, उडदाचा भाजलेल्या पापडाचा नैवेद्य दाखवतात. तिसऱया दिवशी गौरीच्या चेहऱयावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. पाणवठय़ावर विसर्जनाला निघताना माहेरवाशीण गौरीला उचलून घेऊन घरातील समृद्धी, दूध दुभत्याची जागा आणि इतर शुभ गोष्टी तिला दाखवत पुढील वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन तिचा निरोप घेते आणि तिचे विसर्जन केले जाते. धातूचे किंवा कायमस्वरूपी मुखवटे असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. पाना, फुलांचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर परत येताना पाण्यातील थोडी वाळू घेऊन ती सर्व घरभर व परसवातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.
असे हे गौरी आवाहन आणि पुजनाचे व्रत विवाहित आणि अविवाहित महिला भक्तीभावाने आणि श्रद्धेने करतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजेच पार्वती आणि बहीण असेही मानले जाते. कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये आणि परंपरांमध्ये हे दोन अर्थ प्रचलित आहेत. आई म्हणून तिला महालक्ष्मी आणि संपत्ती-समृद्धीचे प्रतीक मानले जाते, तर बहीण म्हणून ती माहेरवाशीण असून भावाकडे पाहुणचाराला येते असे मानले जाते. गौरी हे आदिशक्ती पार्वतीचेच एक रूप आहे आणि ती गणपतीची आई आहे अशी प्रमुख श्रद्धा आहे. तिच्या आगमनाने घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येतो अशीही भोळीभाबडी भावना असते. विशेषतः महाराष्ट्रात गौरी ही गणपतीची बहीण मानली जाते आणि ती तीन दिवसांसाठी माहेरी येते असे मानले जाते.गौरीला ज्येष्ठा आणि कनिष्ठा म्हणूनही ओळखले जाते, जिथे ज्येष्ठा ही गौरी असते आणि कनिष्ठा ही महालक्ष्मी असते.
असा गौरीचा सण. त्याची जय्यत तयारी मुंबई कोंकणासह संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. अशा धामधुमीत गीतकार जगदीश खेबुडकर यांनी रचलेल्या आणि राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ या चित्रपटातील ‘रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंबलोणं करा’ हे गीत प्रकर्षाने आठवतं. गौरीला घागर फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही ‘घागर घुमू दे…’ अशा शब्दांनी होते.