
>> दिलीप ठाकूर
कलेच्या क्षेत्राबाबत कोणत्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानादेखील फक्त आणि फक्त एखाद्या गोष्टीची आवड आणि मिळालेल्या संधीचा सदुपयोग केल्यास एखाद्या क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करता येते याचं उत्तम उदाहरण छायाचित्रणकार आणि दिग्दर्शक ग्यान सहाय!
बिहार राज्यातील पाटणा येथे शालेय शिक्षण घेत असताना फोटोग्राफीची आवड होती इतकेच. कुटुंबात कोणालाही असे कोणतेही छंद वगैरे नव्हते. आपल्या फोटोग्राफीच्या छंदात आणखी काही शिकायला मिळावे म्हणून ग्यान सहाय यांनी पुणे शहरातील दूरदर्शन व चित्रपट प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. त्या वेळी ग्यान सहाय यांच्या वर्गात बिनोद प्रधान, जहांगीर चौधरी, मनमोहन सिंह असे कालांतराने नावारूपास आलेले चित्रपट छायाचित्रणकार होते. त्या काळात चोवीस फोटोंची फ्रेम होती. ग्यान सहाय यांची शिकण्याची वृत्ती त्यांना अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरली. शिक्षण पूर्ण होताच सहाय यांनी मुंबई दूरदर्शनवर पहिल्या नोकरीचे पाऊल टाकले, पण पहिल्याच दिवशी त्यांना वृत्त विभागाकडून मुंबईत पडलेल्या इमारतीच्या चित्रीकरणासाठी पाठवले असता ते पहिल्याच अनुभवाने घाबरले आणि दुसऱयाच दिवशी ते पुण्यात परतले. सुदैवाने त्यांना दूरदर्शन व चित्रपट प्रशिक्षण संस्थेत काम मिळाले. मासिक पगार नऊशे रुपये. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील ही गोष्ट. ते त्यात समाधानी नव्हते. आपण छायाचित्रणात सतत नवीन गोष्टी शिकायला हव्यात, नवीन कॅमेरा हाताळायला हवा असे त्यांना मनोमन वाटत होते. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ते मुंबईत येऊन चित्रपटसृष्टीतील छायाचित्रणकारांना भेटत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना ख्यातनाम छायाचित्रणकार गोविंद निहलानी यांच्याकडे चौथ्या-पाचव्या क्रमांकाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळाले. तेव्हा गोविंद निहलानी श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भूमिका’ या चित्रपटाच्या छायाचित्रणात कार्यरत होते. येथे आपणास बरेच काही शिकता येईल असा ग्यान सहाय यांना वाटत असलेला विश्वास खरा ठरला. रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ या चित्रपटाच्या युनिटमध्येही ते होते. गोविंद निहलानी यांनी ‘अर्धसत्य’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली तोपर्यंत ग्यान सहाय यांनी छायाचित्रणात बरेच काही शिकून घेतले होते. विशेषतः गोविंद निहलानी म्हणत, छायाचित्रणकार म्हणजे केवळ कॅमेरा सेटअप सांभाळणे, प्रकाश योजना आखणे एवढेच नव्हे, तर त्याने आपण काम करत असलेल्या चित्रपट, मालिका, रिऑलिटी शो याचे स्वरूपही जाणून घ्यायला हवे.
ग्यान सहाय यांनी स्वतंत्रपणे काम सुरू करताना सुरुवातीला जाहिरातपटाचे छायाचित्रण केले. मग मालिका आणि रिऑलिटी शो याकडे लक्ष दिले आणि बरीच मोठी यशस्वी वाटचाल केली. ‘देख भाई देख’, ‘नन्ही सी कली… मेरी लाडली’ इत्यादी मालिकांचे ते छायाचित्रणकार होते. नव्वदच्या दशकात राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रसारित होणाऱया मालिकेत त्यांचे नावही दाखवले जाई. त्यामुळे ते पाटणा येथील आपल्या कुटुंबीयांत लोकप्रिय ठरले. त्यानंतर ‘अंताक्षरी’, ‘सारेगामा’, ‘इंडियन आयडॉल’ असे लोकप्रिय रिऑलिटी शो त्यांच्या कल्पक आणि प्रभावशाली छायाचित्रणाने अधिक प्रमाणात नावारूपास आले. कॅमेऱयामध्ये फाईव्ह डी, सेव्हन डी असे आलेले नवीन तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले. मल्टी कॅमेरा सेटअप हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्टय़ ठरले. ‘बैरी पिया’ या भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आणखी एक पुढचं पाऊल टाकलं. नूतनची भूमिका असलेल्या ‘सरस्वतीचंद्र’ (1968) या चित्रपटाची ही रिमेक रसिकांनी नाकारली. पाखी हेगडेचा हा पहिला भोजपुरी चित्रपट.त्यानंतर निर्माता विवेक वासवानी यांनी ग्यान सहाय यांना हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली. चित्रपट होता, ‘सर आँखो पर’. या वेळी त्यांनी हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ (1971) या चित्रपटाची रिमेक केली. दिलीप जोशी या अभिनेत्याला मध्यवर्ती भूमिकेत संधी दिली. चित्रपटात चरित्र भूमिकेत शम्मी कपूर आणि पाहुणा कलाकार म्हणून शाहरुख खान होता. हाही चित्रपट रसिकांनी नाकारला. ग्यान सहाय यांनी जाहिरातपट आणि रिऑलिटी शो यावर फोकस कायम ठेवला. त्यातूनच ‘पापड, लिज्जत पापड’ ही त्यांची जाहिरात लोकप्रिय झाली.
































































