कथा एका चवीची – अमृताहुनी गोड पंचामृत

>> रश्मी वारंग

श्रावण, भाद्रपद या महिन्यांत सणवारांसोबत व्रतवैकल्येही तितकीच महत्त्वाची असतात. या व्रतपूजेत नैवेद्याइतकाच मान असतो तो पंचामृताला.

श्रावण महिना त्याचा पिसारा आवरता घेत असतानाच वेध लागतात येणाऱ्या भाद्रपदाचे. श्रावण असो वा भाद्रपद, सणवारांनी गच्च भरलेल्या या महिन्यात येणारी व्रतवैकल्येही तितकीच महत्त्वाची ठरतात. या पूजेत नैवेद्याइतकाच मान ज्याला प्राप्त होतो ते पंचामृत. या पंचामृताची ही गोष्ट.

गाईचं दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच पदार्थांच्या मिश्रणातून पंचामृत बनतं. सोळा उपचारांत पंचामृत स्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे. पूजा झाल्यानंतर देवतेचं तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धत आहे. हे विशिष्ट पाच पदार्थच या पंचामृतात का समाविष्ट करण्यात आले? तर दूधदुभत्याने समृद्ध हिंदुस्थान देशात अगदी प्राचीन काळापासून दुग्धजन्य पदार्थांना महत्त्व होते. पण मग साखर प्रचलित नसताना पंचामृत कसं बनत असे? तर साखरेचं मूळ असणारा गूळ किंवा उसाचा रस पंचामृतात वापरला जाई असा संदर्भ मिळतो.

या प्रत्येक पदार्थाचे स्वतचे असे खास गुण आहेत. दूध शुभ्रता दर्शवते. आपलं आयुष्यही तसंच निष्कलंक असावं. दही पावित्र्याचं प्रतीक आहे. तूप स्निग्धता आणणारे असते. मधाला आपल्या संस्कृतीत अमृताचा दर्जा दिलेला आहे. साखर, गूळ त्यांच्यासारखाच गोडवा आयुष्यात यावा असा संदेश घेऊन येतात. अशा सर्व गुणांनीयुक्त सिद्ध झाल्यावर पूजेत पंचामृत वापरताना एक श्लोक आवर्जून म्हटला जातो.

पयोदधि घृतं चैव मधु च शर्करायुतम्।

पञ्चामृतं मयानीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ?

अर्थात तुमच्या (आराध्याच्या) स्नानासाठी मी दूध, दही, तूप, मध आणि शर्करा घेऊन आलो आहे. कृपया यांचा स्वीकार करावा.

हिंदुस्थानातच नाही तर जगभरात दुधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत खास आहे. प्राचीन ग्रीक, इजिप्शियन, रोमन संस्कृतीनेही दुग्धजन्य पदार्थांना ‘फूड ऑफ गॉड’ अर्थात देवादिकांचे अन्न मानले आहे. त्यामुळे हिंदुस्थानसारख्या देशात देवपूजेत या सगळ्या पदार्थांना स्थान मिळाल्यास नवल नाही. प्राचीन हिंदुस्थानातील विविध पाककृतींमध्ये दूध, दह्याला असलेले महत्त्व पहा.

राजा सोमेश्वरच्या ‘मानसोल्लास’ ग्रंथात उल्लेख होतो की,  दूध प्यायच्या अगोदर ते तापवणे ही खास क्रिया होती. यासाठी विशेष भांडी वापरली जात. भरपूर उकळून अर्धे भांडे दूध उरल्यावर ते प्यायला (पानपाक), एक-षष्ठांश दूध उरल्यावर (घुटीपाक) मिठाई करण्यासाठी वापरत. एक-अष्टमांश भाग उरल्यावर त्यास शर्करापाक (खवा) म्हणत. या दुधात फळे किंवा फुलांच्या पाकळ्या घालून खात. रेडकू मोठं झाल्यावरच म्हशीचं दूध पिण्यासाठी वापरलं जाई. याच दुधाचं दही करत. अजिबात पाणी न घातलेल्या दह्याला ‘मथित’ असं म्हणत. समप्रमाणात पाणी घातलेल्या दह्याला उदस्वित, तर भरपूर पाणी घातलेल्या दह्याला तक्र म्हणत. दही घुसळून त्यात साखर व कापूर घालून खात. नित्य आहारात दूध, दह्यावर होणारी ही प्रक्रिया पाहता सहज उपलब्ध या गोष्टी पूजेत समाविष्ट होणं स्वाभाविक होतं.

सत्यनारायणाची पूजा असो अथवा गणेश पूजा, पंचामृत अनिवार्य ठरते. दुधातील दही, तूप, साखर, मधाचे एकत्रित मिश्रण विशिष्ट प्रक्रियेमुळे अधिकच दाटसर होते आणि दुसऱ्या दिवशी अधिक चविष्ट लागते. वास्तविक पंचामृताचा हेतू अधिकतर धार्मिक आहे. ते चवीला बांधील नाही. आपल्या आराध्याच्या पूजेत या पंचामृताला आवर्जून स्थान द्या आणि मनापासून व्यक्त होताना म्हणा, ‘पंचामृतम् समर्पयामि.’

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)