
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. अलीकडे आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भल्याभल्यांची शब्दश मती गुंग केली आहे. या तंत्रज्ञानाची प्रगती झपाटय़ाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘तंत्रज्ञान’ हा शब्द आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात अतिशय निकटचा व परिचित झाला आहे. आपण रोजच्या जीवनात तो अनेकदा वापरतोही, शिवाय त्याचा अनुभवही आपण घेत आहोत. अलीकडच्या 20-25 वर्षांत माहिती आणि तंत्रज्ञान या एका शब्दाने मानवी जीवनात फार मोठी क्रांती घडवून आणली. 11 मे या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने हा लेख.
तंत्रज्ञान ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा अगर संकल्पनांचा वास्तव जीवनात वापर करणे होय. वैज्ञानिक ज्ञान म्हणजे निसर्गाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करून मांडलेले तर्कशुद्ध निष्कर्ष. हे निष्कर्ष कोणीही, केव्हाही व कोठेही प्रयोगाच्या आधारे सिद्ध करू शकतो. हेच निष्कर्ष वापरून आपण काही वस्तू, यंत्रे वा उपकरणे निर्माण करतो. त्यांच्या वापराने आपले दैनंदिन जीवन अधिक सुसह्य व सोयिस्कर होते. आपल्या जीवनात अनेक कामे करत असताना आपल्याला बरेच कष्ट पडतात. हे कष्ट कमी व्हावेत, कामात जास्तीत जास्त अचूकता व सुलभता यावी, एकाच वेळी अनेक कामे समाधानकारक, सुरक्षित व किफायतशीरपणे पूर्ण करता यावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. या गोष्टी साध्य करण्यास तंत्रज्ञान आपल्याला मदत करत असते. आज असे एकही क्षेत्र राहिलेले नाही की, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही.
तंत्रज्ञानाशी संबंधित विज्ञान म्हणजे ‘व्यावहारिक विज्ञान’. विज्ञानाचे ढोबळमानाने याचे दोन मुख्य वर्ग करता येतील. एक सैद्धांतिक विज्ञान (Basic or Theoretical Science) आणि दुसरे व्यावहारिक विज्ञान (Applied Science). यातले दुसऱया वर्गातील विज्ञान हे तंत्रज्ञानात वापरले जाते. विज्ञानातील सर्वच सिद्धांत हे वास्तवात वापरता येत नाहीत. त्यामुळे असे सिद्धांत हे सैद्धांतिक विज्ञानात मोडतात. जे सिद्धांत वास्तवात वापरता येणे भौतिकदृष्टय़ा शक्य आहे, असे सिद्धांत व्यावहारिक विज्ञानात असतात. याच व्यावहारिक विज्ञानातून अभियांत्रिकी ही अभ्यास शाखा निर्माण झाली आहे. अभियांत्रिकीचा हेतू नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करणे आणि ते समृद्ध करणे हा आहे. सध्या अभियांत्रिकी या विषयाचे हजारो भारतीय अभियंते जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये कार्यरत आहेत. यावरून तंत्रज्ञान या क्षेत्रातील व्यापकता लक्षात येते.
तंत्रज्ञान ही एक कला आहे. नवनवीन अभिनव गोष्टी निर्माण करण्याची ही कला आहे. या गोष्टी भौतिकही असू शकतात आणि वैचारिकही असू शकतात. उदा. भाषा हे एक वैचारिक तंत्रज्ञान आहे; परंतु त्या भाषेतील मजकूर लिहिणे, बोलणे अगर छापणे हे भौतिक तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान हे एक कला म्हणूनच उदयाला आले आणि नंतर विज्ञानाच्या विकासाबरोबर उक्रांत होत होत एक वेगळी विचार प्रणाली बनले. जसा विज्ञानाचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो तसाच तंत्रज्ञानाचाही असतो. विज्ञान हे एखाद्या सिद्धांताच्या सर्व शक्यता पडताळून पाहू शकते, परंतु तंत्रज्ञान हे मुळातच वास्तवात आणि भौतिकतेत बांधलेले असल्याने मर्यादित राहते. उदा. विज्ञानाच्या दृष्टीने ‘टाइम मशीन’ ही संकल्पना अस्तित्वात आहे आणि वैज्ञानिक नियमांनी सिद्धही झाली आहे; परंतु भौतिकदृष्टय़ा काही मर्यादा येत असल्याने प्रत्यक्षात साकार होऊ शकत नाही. म्हणून भूत-भविष्यकाळामध्ये प्रवास करण्याचे तंत्र आपण कधीच निर्माण करू शकत नाही. यावरून आपल्याला तंत्रज्ञानाचा नेमका अर्थ समजून येतो. तंत्रज्ञान हे विज्ञानाचे मूर्तरूप आहे; परंतु विज्ञानाप्रमाणे अमर्याद नाही. त्याला मर्यादा आहेत, पण तरीही त्या मर्यादेतही मानवजातीने त्याचा पुरेपूर वापर करणे शिकून घेतले आहे. त्यातून जास्तीत जास्त नवनिर्मिती केली आहे. अर्थात तंत्रज्ञान हा विषय आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक झाला आहे.
तंत्रज्ञान हे एका सुपरहिरोसारखे आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकाराने आणि द्रुतगतीने जग बदलले आहे. आपले जग विस्तारले आहे! तंत्रज्ञानामुळे जग जणू एक खेडे झाले आहे. जुन्या काळी लोक आपणास लागणाऱया वस्तू स्वत बनवत असत व त्यासाठी खूप मेहनत करत असत, पण तेच काम आता मशीन आणि संगणकाच्या सहाय्याने चुटकीसरशी होत आहे. तंत्रज्ञान कारखान्यांमध्ये खेळणी, कपडे आणि अगदी स्वादिष्ट स्नॅक्ससुद्धा जलदगतीने आणि चांगल्या दर्जाचे बनविण्यात मदत करते. जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजार शोधण्यासाठी आणि रुग्णांना बरे वाटण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. शाळांमध्येही आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि रोमांचक तथ्ये शोधण्यासाठी संगणक वापरतो. गुह्यांचे निरीक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी तंत्रज्ञान कॅमेरे, सेन्सर्स आणि डेटा विश्लेषण वापरून पोलीस सुरक्षा वाढवतात. मोठमोठय़ा शहरांत मोबाइल अॅप्लिकेशन्ससह कॅब बुक करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना राइड्सची विनंती करता येते. आता आपण आपल्या अनेक खरेदींसाठी डिजिटल पेमेंट वापरतो. तंत्रज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात व कार्यात तसेच निरोगी राहण्यासाठी क्रांती घडवून आणली आहे.
ज्याप्रमाणे जादूच्या वाईट आणि चांगल्या बाजू आहेत, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचेही फायदे आणि तोटे आहेत. तंत्रज्ञान आपल्याला मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट होण्यास, नवीन गोष्टी शिकण्यास आणि मनोरंजनासाठी मदत करते. आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवून देते. लहानपणी वाचलेल्या ‘जादूची कांडी’ या गोष्टीसारखी तंत्रज्ञान ही एक जादूची कांडीच म्हणावी लागेल, पण आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. फोनवर जास्त वेळ घालवणे किंवा व्हिडीओ गेम खेळणे आपल्यासाठी चांगले नाही. तसेच कधी कधी वाईट लोक याच तंत्रज्ञानाचा (गैर)वापर करून खोडकर गोष्टी करू शकतात. कधी कधी लोक तंत्रज्ञानाचा वापर वाईट मार्गाने करतात. ते इतरांना ऑनलाइन फसवतात, अशा वेळी आर्थिक फसवणूकही होते. जेव्हा वाईट लोक संगणक प्रणालीमध्ये घुसतात आणि पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर यांसारखी बरीच वैयक्तिक माहिती हस्तगत करतात तेव्हा डेटाचे उल्लंघन होते. सायबर क्राइमसारखी गुन्हेगारी हे आपल्या पोलीस यंत्रणेसमोरचे प्रचंड मोठे आव्हान आहे. या सर्व गोष्टींमुळे तंत्रज्ञान आणि विज्ञान ‘शाप की वरदान’ असा प्रश्न पडतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)