लेख – भारत-जपान संबंधांचे भवितव्य

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

जपानचे नवे नेतृत्व सनाए ताकाईची या जपानसाठी परिवर्तनाचे प्रतीक आहेत. ताकाईची यांच्या कठोर चीनविरोधी धोरणामुळे भारत-जपान संबंधांमध्ये रणनीतीक खोली आणि सामायिक सुरक्षा दृष्टिकोन अधिक दृढ होईल. दोन्ही देशांनी जर आपापल्या आर्थिक व तांत्रिक सामर्थ्याचे एकत्रीकरण केले, तर आशिया नव्या ‘लोकशाही सुरक्षा युगात’ प्रवेश करेल. भारताने या संधीचा उपयोग करून केवळ द्विपक्षीय नव्हे, तर प्रादेशिक स्थैर्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारावी. हेच ताकाईची यांच्या युगात भारत-जपान भागीदारीचे खरे सार ठरेल.

 जपानच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (LDP) ने सनाए ताकाईची यांची त्यांची नवीन नेत्या म्हणून निवड केली आहे. पक्षाच्या 70 वर्षांच्या इतिहासात नेतृत्व करणारी ती पहिली महिला आहे. तथापि, एक आठवडाहून कमी वेळ झाला असतानाच LDP च्या 26 वर्षांच्या युतीमधील भागीदार असलेल्या कोमेइटो पक्षाने युती सोडण्याची घोषणा केली. मात्र सनाए ताकाईची यांचा लिबरल डेमोव्रॅटिक  पक्ष सर्वात मोठा असल्यामुळे नवीन सरकारवर सनाए ताकाईची यांचा आणि त्यांच्या धोरणाचा प्रभाव सर्वात जास्त राहणार आहे.

सनाए ताकाईची (Sanae Takaichi) यांच्या निवडीने जपानच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात ऐतिहासिक वळण दिले आहे. ताकाईची या शिंझो आबे यांच्या राजकीय वारसदार आहेत आणि त्यांचा विचारसरणीचा पाया – राष्ट्रवाद, चीनविरोधी धोरण आणि इंडो-पॅसिफिक भागातील सामरिक स्वायत्ततेचा आग्रह हाच आहे.

भारतासाठी जपानमध्ये सनाए ताकाईची यांच्या सत्तारोहणाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि जपान हे दोन्ही देश चीनच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध ‘लोकशाही सुरक्षा घेरा’ (Democratic Security Ring) उभारणारे नैसर्गिक सहकारी आहेत. या पार्श्वभूमीवर जपानमधील सत्तांतर भारतासाठी केवळ आर्थिकच नव्हे, तर भू-राजनैतिक आणि सुरक्षाविषयक दृष्टीनेही निर्णायक ठरणार आहे.

सनाए ताकाईची या कट्टर राष्ट्रवादी आणि रूढीवादी विचारसरणीच्या नेत्या आहेत. त्या स्वतःला ‘जपानची आयर्न लेडी’ (Iron Lady) म्हणवतात आणि ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर यांच्याकडून प्रेरणा घेतात.

कठोर चीनविरोधी भूमिका ः त्या चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपानसाठी ‘मुख्य धोका’ मानतात. त्यामुळे जपानच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ, सागरी सुरक्षा बळकट करणे आणि तैवानला समर्थन हे त्यांच्या धोरणाचे पेंद्र आहे.

राष्ट्रवादी इतिहासदृष्टी : त्या दुसऱ्या महायुद्धातील जपानी भूमिकेचे पुनर्मूल्यांकन करतात आणि जपानी सैन्याच्या गौरवाचे समर्थन करतात.

आर्थिक सुरक्षा आणि तंत्रज्ञान स्वावलंबन : त्यांनी मंत्रीपदाच्या काळात जपानच्या `Economic Security Policy’ ला गती दिली. ही धोरणात्मक दिशा भारतासाठी सहकार्याचे नवे क्षेत्र ठरू शकते.

अमेरिकाजपान सुरक्षा आघाडीवरील निष्ठा :  जरी त्या स्वायत्त परराष्ट्र धोरणाच्या बाजूने आहेत, तरी त्या अमेरिका-जपान सुरक्षा कराराला मजबूत ठेवू इच्छितात. भारत आणि जपान यांचे संबंध सांस्कृतिक, आर्थिक आणि सामरिक पातळीवर सशक्त आहेत. बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक आदानप्रदान यांनी दोन्ही देशांमध्ये शतकानुशतकांची जवळीक निर्माण केली.

शिंझो आबे युग (2006-2020) :  या काळात भारत-जपान संबंधांनी अभूतपूर्व उंची गाठली. आबे यांनी “Confluence of the Two Seas” या संकल्पनेद्वारे इंडो-पॅसिफिक भागातील सामायिक सुरक्षा चौकट प्रस्तावित केली, जी पुढे QUAD म्हणून विकसित झाली.

ताकाईची यांचे राजकीय मार्गदर्शक आबे असल्याने या संबंधांच्या पुढील अध्यायातही सातत्य राहील. ताकाईची यांच्या कठोर चीनविरोधी भूमिकेमुळे भारत-जपान भागीदारी अधिक रणनीतीक बनेल.

दोन्ही देशांसाठी फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक (FOIP) ही मुख्य संकल्पना आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’च्या प्रतिसादात भारत आणि जपान यांनी Asia-Africa Growth Corridor (AAGC) प्रस्तावित केला होता. ताकाईची यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळू शकते. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा QUAD गट चीनच्या आक्रमकतेला प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वाचा मंच बनला आहे. सनाए ताकाईची यांचे नेतृत्व QUAD ला अधिक ठोस रणनीतीक दिशा देऊ शकते – विशेषतः सायबर सुरक्षा, सागरी निरीक्षण, आणि हायब्रिड युद्ध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात.

भारतीय नौदल आणि जपानी मॅरिटाईम सेल्फ-डिफेन्स पर्ह्समध्ये नियमित MALABAR सराव होतात. आता या सरावांचा विस्तार दक्षिण चीन समुद्रापासून ते हिंद महासागरापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

ताकाईची यांच्या आर्थिक दृष्टिकोनात `Market-friendly nationalism’ हा समतोल आहे. भारतासाठी हे तीन प्रकारे उपयुक्त ठरू शकते:

हायटेक गुंतवणूक : जपानी कंपन्या भारतात सेमीपंडक्टर, हाय-स्पीड रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात गुंतवणूक वाढवू शकतात.

सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन : चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी `China+1′ धोरणांतर्गत भारत एक महत्त्वाचा भागीदार बनेल.

ग्रीन एनर्जी आणि अणु सहकार्य : जपानकडून स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन तंत्रज्ञान आणि अणु सुरक्षा क्षेत्रात सहकार्याची अपेक्षा आहे. ताकाईची या तैवानविषयी खुल्या समर्थनासाठी ओळखल्या जातात. भारतानेही तैवानसोबत तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात संबंध वृद्धिंगत केले आहेत. त्यामुळे दोन्ही देश एक ‘अनौपचारिक तैवान धोरण समन्वय’ विकसित करू शकतात.

सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याची गती: संयुक्त उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संरक्षण R&D क्षेत्रात नवे करार शक्य.

आर्थिक वाढीसाठी जपानी गुंतवणूक: पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटीज आणि औद्योगिक कॉरिडॉरमध्ये मोठय़ा गुंतवणुकाRची अपेक्षा.

इंडोपॅसिफिक नेतृत्वाचे सहनिर्माण: सनाए ताकाईची यांचे चीनविरोधी धोरण भारताच्या `Act East Policy’ शी सुसंगत आहे.

अमेरिका जपानवर प्रभाव टाकेल. भारताने आपली धोरणात्मक स्वायत्तता कायम ठेवणे आवश्यक आहे. ताकाईची यांच्या नेतृत्वाखाली जपान अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि सामरिकदृष्टय़ा आक्रमक भूमिका घेईल. त्यामुळे आशियातील शक्ती-संतुलन अधिक बहुध्रुवीय बनेल. भारत-जपान आघाडी अमेरिकन नेतृत्वाखालील पश्चिमी आघाडीला पूरक ठरेल. चीनला हिंद महासागर व पॅसिफिक दोन्ही बाजूंनी प्रतिकाराचा सामना करावा लागेल.

या बदलामुळे भारताला आशियातील संतुलन-निर्माता (Balancing Power) म्हणून आपली भूमिका अधिक दृढ करण्याची संधी मिळेल.

[email protected]