लेख – मालदीवला भारताची आठवण का झाली?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मालदीवला चीनने मदत केली नाही. मग तेथील राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताची वाट पकडली. भारताने उदार मनाने 40 कोटी डॉलर्सची चलन अदलाबदल आणि तीन हजार कोटी भारतीय रुपयांची चलन अदलाबदल या स्वरूपात मदत देऊ केली. चीनची मदत ही सावकारी असते. या मदतीची म्हणजे कर्जाची परतफेड याचा अर्थ आगीतून फुफाटय़ात पडण्यासारखे असते. यासाठीच मुइज्जू यांना गेल्या आठवड्यात भारतभेट करावी लागली 

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर 6 ते 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आले. गेल्या नोव्हेंबरमध्ये मालदीवमधील ‘इंडिया आऊट’ मोहिमेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांना तडा गेल्याने ही भेट महत्त्वाची होती. मुइज्जू भारत दौऱ्यावर नक्की कोणत्या कारणासाठी आले? या दौऱ्यामागचा त्यांचा उद्देश काय होता? पाच महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुइज्जू भारतात आले होते. मात्र त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय राज्य दौरा होता. रविवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. फर्स्ट लेडी साजिधा मोहम्मद यांच्यासमवेत भारतात आलेल्या मुइज्जू यांचे सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मालदीवच्या अध्यक्षांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. व्यावसायिक कार्यक्रमांसाठी ते मुंबई, बंगळुरूलाही गेले.

मुइज्जू म्हणाले की, मालदीवचा आर्थिक भार कमी करणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. भारताला आमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आणि आमचा सर्वात मोठा विकास भागीदार म्हणून आमचा भार कमी करण्यासाठी, आमच्यासमोर असलेल्या आव्हानांवर चांगले पर्याय व उपाय शोधण्यासाठी ते नेहमीच तयार आहेत. मालदीवच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान चलन अदलाबदल आणि कर्जाची विनंती केली. भारताने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मालदीवला 1.4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देऊ केली आहे. मालदीवच्या परकीय चलनाचा साठा 440 दशलक्ष डॉलर्सपर्यंत घसरल्याने हा देश कर्जात बुडेल असे चित्र आहे.

मालदीव हा भारताचा हिंद महासागर प्रदेशातील (आयओआर) प्रमुख शेजारी आहे आणि पंतप्रधानांच्या ‘सागर’ (सिक्युरिटी ऍण्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) व भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा भाग आहे. मुइज्जू यांच्या दौऱ्यातील चर्चा द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे आणि दोन राष्ट्रांमधील दीर्घकालीन संबंध वाढविणे यावर लक्ष केंद्रित केले गेले.

मुइज्जू यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना तडा गेला. भारताने 10 मेच्या अंतिम मुदतीपूर्वी या देशातून आपल्या 80 हून अधिक लष्करी कर्मचाऱ्यांना परत येण्यास सांगितले. मालदीवला भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर्स आणि डॉर्नियर विमाने भारतीय सैन्याद्वारे चालवली जायची व त्यांची देखभाल केली जायची. भारतीय सैन्याच्या मुद्दय़ाव्यतिरिक्त लक्षद्वीप बेटांच्या प्रचाराला उत्तर देताना मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे मालदीवशी असलेल्या भारताच्या संबंधांना आणखी तडा गेला. नंतर मुइज्जू सरकारने दोन कनिष्ठ मंत्र्यांना निलंबित करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

भारतात सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘मालदीववर बहिष्कार घाला’ अशी मोहीम सुरू केली. भारतीय सेलिब्रिटींनीही स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मालदीवसाठी भारत हा पर्यटनाचा सर्वात मोठा स्रोत आहे. ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका पोहोचला.

मुइज्जू यांच्या भारत भेटीमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळू शकते. मालदीव आता आपल्या ‘वेलकम इंडिया’ मोहिमेद्वारे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘इंडिया आऊट’ हा प्रचाराचा मुद्दा करून मालदीवच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले आणि चीनच्या आशीर्वादाने उन्मत्त झालेले मुइज्जू सुरुवातीचा काही काळ भारतविरोधात होते. याचा फायदा घेऊन चीननेही मालदीवच्या समुद्रात त्यांच्या नौदलाच्या हालचाली वाढवल्या होत्या, परंतु गेल्या तीन महिन्यांत मुइज्जू भारताशी चांगले वागू लागले आहेत.

मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. गतवर्षी आणि त्याच्याही आधी कित्येक वर्षे मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक होती. यंदाच्या वर्षी लक्षद्वीप-मालदीवच्या वादात मोदींवर मालदीवमधून आगपाखड झाली. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि मालदीववर बहिष्काराची मोहीम येथे तीव्र झाली. जवळपास 50 हजारांची घट भारतीय पर्यटकांच्या संख्येत पाहायला मिळाली. शिवाय कोरोना पश्चात या देशाची अर्थव्यवस्था अद्याप रूळावर आलेली नाही. मूडीज या पतमानांकन संस्थेने मालदीवचे अवमूल्यन केले असून कर्जे बुडवण्याच्या दिशेने त्या देशाची वाटचाल सुरू असल्याचे म्हटले आहे. केवळ 44 कोटी डॉलर्सची परकीय गंगाजळी मालदीवकडे शिल्लक असून पुढील दीड महिनाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या आयातीसाठी ती पुरू शकेल असा इशारा दिला आहे. अशा गंभीर परिस्थितीत मुइज्जू यांच्यासाठी धावाधाव करणे जरुरी होते.

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मालदीवला चीनने मदत केली नाही. मग तेथील राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताची वाट पकडली. भारताने उदार मनाने 40 कोटी डॉलर्सची चलन अदलाबदल आणि तीन हजार कोटी भारतीय रुपयांची चलन अदलाबदल या स्वरूपात मदत देऊ केली. चीन त्याच्या  मित्रांना मदत करत नाही. चीनची मदत ही सावकारी असते. चीनने पाकिस्तान, श्रीलंका या देशांना मदत देऊ केली, पण या मदतीची म्हणजे कर्जाची परतफेड करणे म्हणजे एका आर्थिक संकटातून दुसऱ्या संकटात जाण्यासारखे असते. यासाठीच मुइज्जू यांना गेल्या आठवड्यात भारतभेट करावी लागली.

त्यांनी भारतीय पर्यटकांना मालदीव भेटीचे साकडे घातले आहे. मालदीव, नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये भारतविरोधी भावनांवर स्वार होऊन सत्तापदावर निवडून आलेल्यांना स्वतःच्या आर्थिक कुवतीचे, वर्षानुवर्षांच्या आर्थिक बेशिस्तीचे आणि चीनशी मैत्री जोडण्याची किमत कळली आहे. श्रीलंकेला मध्यंतरी भारताने भरीव आर्थिक मदत दिली. नेपाळबाबतही आपण सकारात्मक आहोत. आता मुइज्जूंना हे कळाले आणि ते भारताचे मित्र बनले.  

[email protected]