
>> संजय कऱ्हाडे
गेले काही दिवस इंदूरमध्ये ‘घंटा’ ऐकू येतेय! काल हिंदुस्थानातल्या सर्वात स्वच्छ शहरात डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी 219 धावांची आतिषबाज भागीदारी करताना आपल्या गोलंदाजांची घंटा वाजवली असं म्हणायचं की त्यांना ‘पाणी’ पाजलं म्हणायचं! आपल्याला विजय मिळाला असता तर हेच श्रेय विराट हिसकावून घेऊ शकला असता. धमक-चमक, अन् शतक क्रमांक चौपन्न!
तीनशेपार धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं नसतं असं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेदरम्यानही माझं मत होतं, आज आहे अन् उद्याही असेल! असो. न्यूझीलंडचा संघ या मालिकेत वर्चस्व गाजवत होता. कालच्या सामन्याने त्यावर ठप्पा मारला इतकंच.
सूर सापडलेला शुभमन, फॉर्मात असलेला पण मोठय़ा धावा या मालिकेत करू न शकलेला रोहित, छान पुनरागमन करून आपल्या आशा वाढवणारा श्रेयस, गेल्याच सामन्यातला शतकवीर राहुल आणि जाडेजा पार निराशा करून गेले. नितीश रेड्डी अन् हर्षित राणाने थोडा संयम दाखवला असता वगैरे आता निरर्थक बोलाच्याच बाता राहून गेल्यात! नितीश, हर्षितने आशा जागवल्या होत्या हे मात्र खरं. कारण एका बाजूने विराट त्याचा करिष्मा दाखवत होता. त्याचा डौल पाहण्याजोगाच! या खेळीमुळे पार सहा-सात महिन्यांनंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱया वन डे मालिकेपर्यंत विराट पायावर पाय टाकून, मंद-मंद हसत आराम करू शकतो! रोहितची मनःस्थिती मात्र किंचित तरल, साशंक राहील!
इंदूरची खेळपट्टी ठणठणीत होती. मैदान छोटं आणि वेगवान. बॅटीतून तटावलेला हरएक चेंडू जणू रवी शास्त्रीच्या भाषेत ट्रेसर बुलेट! साहजिकच, मिचेल अन् फिलिप्स दोघांचीही शतकं घणाघाती होती, मात्र बेदरकार नव्हती. कॉन्वे आणि निकल्स लवकर बाद झाले होते. गेल्या सामन्यात चमकलेला यंग बाद झाला तेव्हा न्यूझीलंडने साठ धावांचा टप्पाही गाठलेला नव्हता. म्हणूनच मिचेल-फिलिप्सची शतकं महत्त्वाची होती अन् भक्कम पायघडय़ा घालून गेली. षटकार-चौकारांची लडी लावत दोघांनी मिळून सहा षटकार आणि चोवीस चौकार मारले! या तीन सामन्यांच्या मालिकेत मिचेलचा धडाका होता दोन शतकं अन् एका अर्धशतकाचा! तब्बल तीनशे बावन्न धावा त्याने फटकावल्या. थोडक्यात, आपल्या गोलंदाजांना त्याने भोचक्का केलं.
न्यूझीलंडने शेवटच्या दहा षटकांत एकशे एक धावा ठोकल्या यात सगळं आलं! अखेर 337 धावांचा पल्ला क्षितिजासारखाच ठरला. हाती गवसलाच नाही!
एकूण, न्यूझीलंडचा संघ आपल्याला झेपत नाही, असंच वाटतंय! 2024 मध्ये त्यांनी आपल्याला 3-0 च्या फरकाने कसोटी मालिकेत आणि आता 2-1 च्या अंतराने वन डे मालिकेत फटका मारलेला आहे.
परवापासून पाच टी–ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्या दृष्टीने हा पराभव ओशाळवाणा म्हणावा लागेल!
























































