
>> गणेश आचवल
कोणत्याही सांगीतिक मैफलीत किंवा वाद्यवृंदात प्रत्येक वाद्याला महत्त्व असते आणि या सर्व कार्यक्रमातून आपल्याला जास्त आकर्षित करतात ती तालवाद्यं. टाळ, चिपळी, मंजिरा, खंजिरी, चायनीज ब्लॉक अशी अनेक तालवाद्ये अतिशय सहजतेने वाजवणारा वादक कलाकार म्हणजे सूर्यकांत सुर्वे.
गेली पस्तीस वर्षे सूर्यकांत सुर्वे संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे वडील गोपाळ सुर्वे हे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक. सुरेश वाडकर आणि अनेक मान्यवर गायकांना त्यांचे वडील साथसंगत करायचे. तसेच सूर्यकांत यांचे मोठे भाऊ चंद्रकांत सुर्वे हेदेखील उत्तम ढोलक वादक आहेत. तेसुद्धा अनेक कार्यक्रमांतून अनेकांना साथसंगत करत होते. साहजिकच या कलेचे संस्कार सूर्यकांत यांच्यावर लहानपणापासून होत गेले आणि त्यांनाही वाद्य वादनाची आवड निर्माण झाली.
युवक बिरादरी या संस्थेत सूर्यकांत हे समूहगीत गायक म्हणूनही सहभागी झाले होते. मग हळूहळू आपले बंधू चंद्रकांत यांच्याकडून त्यांनी तालवाद्यांचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. ‘विठो रखुमाय’ या नाटकासाठी त्यांनी वादक म्हणून काम केले. मंजिरा, दिमडी, खंजिरी, ताल, डफ अशी अनेक वाद्ये ते शिकले. सुप्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांच्या अनेक कार्यक्रमांतून सूर्यकांत वादक म्हणून कार्यरत होते. ज्या वेळी सुधीर फडके हे ‘वीर सावरकर’ या चित्रपट निर्मितीसाठी निधी संकलनासाठी ‘गीत रामायणा’चे कार्यक्रम परदेशात करणार होते. त्या वेळी त्यांना तालवाद्यांसाठी वादक हवा होता. जयवंत कुलकर्णी यांनी सूर्यकांत सुर्वे यांचे नाव सुधीर फडके यांना सुचवले आणि मग सुधीर फडके यांच्या समवेत सूर्यकांत सुर्वे हे ‘गीत रामायणा’च्या कार्यक्रमासाठी अडीच महिन्यांच्या परदेश दौऱयात सहभागी झाले… आणि मग सुधीर फडके यांच्या अनेक कार्यक्रमांतून देशात आणि परदेशात सूर्यकांत सुर्वे कायम होते. त्यानंतर श्रीधर फडके, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा ‘भावसरगम’ कार्यक्रम, गायक रवींद्र साठे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, अनुराधा मराठे, जयतीर्थ मेवुंडी, महेश काळे, कौशिकी चक्रवर्ती अशा अनेक मान्यवरांच्या सांगीतिक कार्यक्रमांतून सूर्यकांत सुर्वे आपली कला सादर करू लागले. सूर्यकांत सुर्वे हे नाव परिचित होऊ लागले.
सह्याद्री वाहिनीवरील अनेक कार्यक्रमांतून आणि खासगी टीव्ही वाहिन्यांवरील ‘नक्षत्रांचे देणे’सारख्या विविध कार्यक्रमांतून ते घराघरांत पोहोचले. 2001 पासून बॉलीवूडमध्ये हिंदी गाण्यांसाठीदेखील त्यांना वादक म्हणून संधी मिळाली. पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर यांच्या कार्यक्रमांतूनही ते होते. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमांतून गेली एकोणीस वर्षे ते तालवाद्य वादक म्हणून कार्यरत आहेत. ‘पंचम निषाद’चे शशी व्यास यांच्यामुळे शास्त्राrय संगीताच्या कार्यक्रमातदेखील त्यांना वाद्य वादनाची संधी मिळाली. दरवर्षी आषाढी एकादशीला ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो आणि यात अभंगासाठी तालवाद्य वाजवताना आणि खास करून शंखध्वनी सादर करताना एका आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद त्यांना मिळत असतो. शंखध्वनी ही त्यांची खासीयत आहे. अमेरिका, लंडन, कॅनडा, सिंगापूर, आफ्रिका अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. पंडित जसराज यांच्या ‘वृंदावन कॉन्सर्ट’साठी केलेला कार्यक्रम त्यांच्या आठवणीतील एक कार्यक्रम आहे.
उस्ताद झाकीर हुसेन तसेच पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरही त्यांना आपली कला सादर करण्याचा मान मिळाला आहे. ‘गीतरामायण’ तसेच अभंगाच्या कार्यक्रमांतून जेव्हा सूर्यकांत सुर्वे आपली कला सादर करतात, तेव्हा त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. तालवाद्य वादनात सूर्यकांत सुर्वे यांनी स्वतची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.