लेख – इराणमध्ये सत्तापालटासाठी अमेरिका सक्रिय

>> सनत्कुमार कोल्हटकर

इराकसाठी जे ‘टूल किट’ अमेरिकेने वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या नावाखाली वापरले होते त्याचीच पुनरावृत्ती इराणकडे असणाऱया अणुभट्टीबाबत अमेरिका करणार याबद्दल शंका नाही. अमेरिकेच्या हाती प्रचाराची सर्व संसाधने असल्याने येत्या काळात अचानक सर्व आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या एका सुरात इराणच्या अणुभट्टीबद्दल बोलताना दिसू लागतील. बघता बघता इराणला सीरिया, तुकाaये, इस्राएल, पाकिस्तानकडून घेरले जाईल आणि इराकच्या युद्धाची पुनरावृत्ती होऊ शकेल. अर्थात यामध्ये अमेरिकेकडूनच पुढाकार घेतला जाईल हे वेगळे सांगणे न लगे.

अमेरिकेतील 9/11 ची ट्विन टॉवरवरील हल्ल्याची घटना आणि अमेरिकेकडून ओसामा बिन लादेन हा त्या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याची घोषणा करण्यात आली होती, हे सर्वाना आठवत असेलच. त्यापाठोपाठ ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी अफगाणिस्तानला अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती, हेही वाचकांना लक्षात असेलच. पण अमेरिकेचे खरे लक्ष्य होते इराक आणि त्याचा सत्ताधीश सद्दाम हुसेन. अमेरिकेने मोठय़ा सफाईने अफगाणिस्तानवरील मोर्चा इराककडे वळविला होता. क्रूड तेल अमेरिकन डॉलरशिवाय इतर चलनात विक्री करण्याची सद्दाम हुसेनला मिळालेली शिक्षा होती. अमेरिकेचे हे ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ इतर अनेक घटनांमध्येही दिसून आले आहे. अफगाणिस्तानकडे बोट दाखवत असतानाच बघता बघता इराककडे ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ असल्याचे सांगत अमेरिकेने इराकला लक्ष्य करून उद्ध्वस्त केले आणि नंतर सद्दाम हुसेनला अटक करून त्याला जाहीरपणे फाशीही दिले. जगातील कोणत्याही देशाकडे अमेरिकेला जाब विचारण्याची हिंमत नसल्याने अमेरिकेने हे काम बिनबोभाट पार पाडले.

हे सर्व येथे सांगावयाचे कारण म्हणजे, अमेरिकेकडून आखातामध्ये चाललेल्या आक्रमक हालचाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा दुसऱयांदा सांभाळल्यावर त्यांच्या पहिल्या दौऱयासाठी निवडलेले आखातातील देश. ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, कतार, यु.ए.ई. यांना भेटी दिल्या. या दौऱयातील लक्षवेधी घटना म्हणजे सीरियामध्ये सत्ता बळकावलेल्या अहमद अल शारा या व्यक्तीने डोनाल्ड ट्रम्प यांची सौदी अरेबियामध्ये घेतलेली भेट आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘अहमद अल शारा’ याचे करण्यात आलेले काwतुक. सौदी अरेबिया, कतार आणि यु.ए.ई. हे सर्व सुन्नीबहुल आहेत ही नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. इराण हा शियाबहुल देश आहे.

अमेरिकेने यापूर्वीच अहमद अल शारा याला फक्त दहशतवादी म्हणून घोषित केलेले नव्हते, तर त्याला पकडण्यासाठी 10 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली होती. अमेरिकेने हे बक्षीस अजून मागे घेतलेले नाही हे विशेष. अमेरिका किती दुटप्पी आहे याचा हा मोठा पुरावा आहे. ‘अहमद अल शारा’ याला चर्चेमध्ये आणण्यासाठी सौदी अरेबिया आणि तुकाaयेचे अध्यक्ष एर्दोगेन यांनी घेतलेला पुढाकार या गोष्टी विशेषत्वाने लक्षवेधी होत्या. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आखातातील देशांना दिलेल्या भेटी आणि त्यामागची कारणमीमांसा शोधताना पुढील गोष्टी समोर येतात.

इस्राएलकडून लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अस्तित्वाला लागलेली घरघर. इस्राएलकडून गाझामधील हमासच्या अस्तित्वाला लावण्यात आलेली घरघर. येमेनमधील हौथी संघटनेकडून अमेरिकेबरोबर जाहीर केलेली युद्धबंदी. अमेरिकेकडून पाकिस्तानला आयएमएफकडून जाहीर झालेली आर्थिक मदत. या सर्व घटनांचा परामर्श घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, यावरील घटनांमधील एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ‘इराण.’

याच इराणने हिजबुल्लाहला नुसते उभे केले नव्हते, तर त्याला भरपूर शस्त्रास्त्रे पुरविली होती आणि भरघोस आर्थिक मदतही दिली होती. गाझामधील हमासलाही इराणकडूनच सर्वाधिक मदत मिळत होती. सीरियामधील बशर अल असद याच्या राजवटीचीही इराणसोबत जवळीक होती आणि अमेरिका व इतर पश्चिमी देशांना ही जवळीक खुपत होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इराणला धक्का देऊन बशर अल असद याला सीरियाबाहेर पलायन करण्याची वेळ आणण्यामागे तुकाaयेचाच हात होता. तुकाaयेच्या सीरियन राजवट बदलण्यासाठीच्या पुढाकारामुळेच रशियाही तुकाaयेवर नाराज झाला होता असे सांगतात. आता इस्राएल, सीरिया, लेबनॉन, तुकाaये, येमेन (हौथी) या देशांचे नकाशे बघितले तर या सर्व देशांमध्ये अडकलेला एकच देश समोर येतो तो म्हणजे ‘इराण.’

इराकसाठी जे ‘टूल किट’ अमेरिकेने वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या नावाखाली वापरले होते त्याचीच पुनरावृत्ती इराणकडे असणाऱया अणुभट्टीबाबत अमेरिका करणार याबद्दल शंका नाही. अमेरिकेच्या हाती प्रचाराची सर्व संसाधने असल्याने येत्या काळात अचानक सर्व आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या एका सुरात इराणच्या अणुभट्टीबद्दल बोलताना दिसू लागतील. जगाला कसा इराणच्या अणुभट्टीमुळे धोका निर्माण झाला आहे त्यामुळे इराणला अण्वस्त्रे बनविण्यापासून रोखले पाहिजे, याबद्दल सर्व वाहिन्यांवर चर्चा झडू लागतील. बघता बघता इराणला सीरिया, तुकाaये, इस्राएल, पाकिस्तानकडून घेरले जाईल आणि इराकच्या युद्धाची पुनरावृत्ती होऊ शकेल. अर्थात यामध्ये अमेरिकेकडूनच पुढाकार घेतला जाईल हे वेगळे सांगणे न लगे.

गेली अनेक वर्षे इराण आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेच. याबरोबरच इराणची जनता तेथील राजवटीवर प्रचंड नाराज आहे. इराणमधील महिला त्यांच्यावरील बंधनांमुळे अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इराणच्या जनतेची अंतर्गत नाराजी आणि बाहेर इराणला घेराव घातलेले देश हे बघता या वर्षाअखेर पर्यंत इराणची सध्याची राजवट बदलविण्याचा अमेरिका आणि इतर देशांकडून जोरदार प्रयत्न होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे. इराणमधील सध्याची राजवट बदलविण्यात अमेरिका यशस्वी झाली तर इराणच्या सत्तेवर कोण येऊ शकेल? तर अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले आणि एकेकाळच्या इराणच्या शहा रझा पेहलवी यांचे वंशज मोहम्मद रेझा शहा पेहलवी.

इराणमध्ये तेथील राजवटीविरुद्ध साल 2022 आणि 2023 मध्ये अनेक महिने चालू असणारे आंदोलन पाहता इराणमधील सामान्य जनतेमध्ये रेझा पेहलवी यांच्याबाबत सहानुभूती आली असल्यास आश्चर्य नाही. इराणच्या जनतेत मोहम्मद रेझा शहा पेहलवी व त्यांचे उत्तराधिकारी प्रिन्स रेझा पेहलवी यांच्याबाबत आदर असल्याचे सांगतात. काही वर्षांपूर्वी इराणच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने दबक्या आवाजात पेहलवी यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित व्हावी अशी समाज माध्यमांवर मागणी केल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

इराणमध्ये उपलब्ध होणाऱया क्रूड तेल आणि इंधन वायू उत्पादनावर एकेकाळी पश्चिमी तेल उत्पादक कंपन्यांचा वरचष्मा होता. तत्कालीन इराणला क्रूड तेल उत्पादन आणि विक्रीतील खूप कमी अशी रॉयल्टी मिळत असे. त्यामुळे इराणी नागरिकांमध्ये असंतोष धगधगत होता. त्यातूनच 1979 मध्ये सत्तापालट झाला होता. अयातुल्ला खोमेनी यांच्या वर्चस्वाखालील इराणी सरकारने इराणी क्रूड तेल उत्पादन कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले होते आणि पश्चिमी तेल उत्पादक कंपन्यांना इराणबाहेर हाकलून दिले होते. तेव्हापासून अमेरिका आणि काही पश्चिमी देश यांचे इराणबरोबर वितुष्ट आले होते जे अजूनपर्यंत कायम आहे. इराणला आर्थिक आणि इतर निर्बंध टाकून सतावण्याचा उद्योग अमेरिकेने चालविला आहेच. आता अमेरिका आणि त्याचे मित्रदेश इराणची राजवट बदलवण्यासाठी काय करतील, याकडे जगाचे लक्ष असेल हे निश्चित. जगामध्ये सर्व देशांमध्ये स्वीकारार्ह असणाऱया अमेरिकेच्या डॉलर या चलनाच्या दादागिरीला जोपर्यंत ग्रहण लागत नाही तोपर्यंत अमेरिका हे इतर देशांमधील ढवळाढवळीचे उद्योग थांबविणार नाही.