
जगभरातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतातील नोकरी बाजारपेठ आशादायक चित्र दाखवीत आहे. ‘इंडीड’च्या ताज्या ‘हायरिंग ट्रकर’नुसार, 2025च्या जानेवारी ते मार्च तिमाहीदरम्यान 82 टक्के नियोक्त्यांनी सक्रिय भरती केली असून ही आकडेवारी मागील तिमाहीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढलेली आहे. विशेष म्हणजे फ्रेशर्स आणि एआयसह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व डेटा अॅनालिटिक्ससारख्या तांत्रिक भूमिका याकडे भरतीत अधिक लक्ष दिले जात आहे.
“नोकरीची बाजारपेठ सातत्याने बदलते आहे. कंपन्या सावध, पण आशावादी दृष्टिकोनातून भरती करत आहेत. फ्रेशर्सची मागणी स्थिर असून त्यांच्या निवडीसाठी कंपन्या अधिक विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. तंत्रज्ञानातील कौशल्यांसोबत लवचिकता आणि शिकण्याची तयारीही महत्त्वाची ठरते,’’ असे इंडीड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार यांनी सांगितले.
कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2026चे नियोजन सुरू केले असताना नवोदित पदवीधर हे सर्वाधिक मागणीतील उमेदवार ठरत आहेत. गेल्या तिमाहीत झालेल्या भरतीपैकी 53 टक्के पदे फ्रेशर्ससाठी होती. सॉफ्टवेअर डेव्हलपर (29 टक्के), डेटा अॅनालिस्ट/सायंटिस्ट (26 टक्के) आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह (23 टक्के) या भूमिका आघाडीवर होत्या. नियोक्त्यांनी एआय, एमएल, सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये प्रशिक्षित फ्रेशर्सना प्राधान्य दिले असून भारतातील नोकरी भरतीचा वेग तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित असल्याचे स्पष्ट होते. भविष्यातील गरजांशी सुसंगत अशा टीम्स उभारण्याच्या दृष्टीने फ्रेशर्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कंपन्यांना फ्रेशर्स उमेदवारांमध्ये रस असूनही 38 टक्के नियोक्त्यांनी कौशल्यातील तफावत ही प्रमुख अडचण असल्याचे मान्य केले आहे. अनेक नवोदित उमेदवारांकडे तांत्रिक ज्ञान असले तरी प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्यामुळे कार्यक्षमतेत अडथळा येतो. शिवाय संवाद, वेळ व्यवस्थापन व सहकार्य यांसारख्या सॉफ्ट स्किल्समध्ये कमतरता असल्याचे 27 टक्के नियोक्त्यांचे म्हणणे आहे.
इंडीडच्या हायरिंग ट्रकरच्या मते फ्रेशर्स वेतनाविषयी अधिक सजग झाले आहेत. 72 टक्के नियोक्त्यांच्या मते फ्रेशर्सच्या वेतनात वाढ झाली असली तरी ती मर्यादित आहे. जवळपास 60 टक्के नोकरी शोधणाऱ्यांनी सांगितले की, वाढ फक्त 5 टक्क्यांपर्यंतच राहिली. तरीही बहुतांश फ्रेशर्स पगाराच्या बाबतीत तडजोड करण्यास तयार नाहीत, असे स्पष्ट झाले आहे.
2025 मध्ये सरासरी प्रारंभिक पगार रुपये 3.5 लाख प्रतिवर्ष इतका असून 58 टक्के नियोक्त्यांनी रुपये 3 ते रुपये 5 लाख प्रतिवर्षदरम्यानची पॅकेजेस ऑफर केली आहेत, जे 67 टक्के फ्रेशर्सच्या अपेक्षांशी साधर्म्य दर्शवते. मात्र अनेक फ्रेशर्स आकर्षक कामाचे स्वरूप, शिकण्याच्या संधी असूनही वेतनाला सर्वोच्च प्राधान्य देतात.
इंडीडच्या हायरिंग ट्रकरनुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 34 टक्क्यांपेक्षा अधिक नियोक्त्यांनी एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. एआय, डेटा व सायबर सुरक्षा या क्षेत्रांत संधी अधिक असून नियोत्ते स्पष्ट कार्य भूमिका, जबाबदाऱ्या आणि कार्य संस्कृतीची माहिती देणाऱ्या नोकऱ्यांकडे उमेदवारांचा अधिक कल असल्याचे दिसते.