
प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर नियमांचे पालन न करणाऱया भल्याभल्यांना कसे गुडघ्यावर आणता येते याचे उत्तम उदाहरण नुकतेच कर्नाटक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दाखवून दिले आहे. कर्नाटकातील लोकप्रिय अशा ‘बिग बॉस कन्नड 12’ या मालिकेचे चित्रीकरण थांबविण्याचा आणि स्टुडिओदेखील बंद करण्याचा आदेश नियंत्रण मंडळातर्फे जारी करण्यात आला आहे. रामनगर जिह्यातील बिदादी येथील औद्योगिक क्षेत्रात मेसर्स वेल्स स्टुडिओज अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे, ज्याला जॉली वुड स्टुडिओज अँड अॅडव्हेंचर्स म्हणूनदेखील ओळखले जाते. याच स्टुडिओमध्ये ‘बिग बॉस कन्नड 12’चे शूटिंग सुरू होते. मात्र इथे पर्यावरणाच्या अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
ही कारवाई करण्यापूर्वी त्यांना इशारे देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नियमभंग होत राहिल्याने शेवटी कारवाई करण्यात आली. विनापरवाना काम चालू ठेवणे, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणे, प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे स्टुडिओने केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या स्टुडिओवर कायदा 1974 च्या कलम 33 (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा स्टुडिओ तत्काळ बंद करण्याचे, रामनगर उपायुक्तांना परिसर सील करण्याचे आणि स्टुडिओचा वीज पुरवठादेखील तत्काळ खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. नियमभंग करणाऱ्या इतर संस्थांवरदेखील कारवाई करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
स्पायडरमॅन