किस्से आणि बरंच काही- कराओके… पैसे द्या, गाणे गा!

>> धनंजय साठे

कराओके क्लबच्या माध्यमातून हौशी गायक पुढे येत आहेत. मात्र या सगळ्यात खरंखुरं संगीत, त्याचा दर्जा खालावत आहे. मोठमोठय़ा गायकांची नक्कल करत केले जाणारे हे सादरीकरण गायन आणि संगीत कलेच्या अभिरुचीला वेगळे वळण तर देणार नाही ना, अशी धास्ती वाटते.

गल्लीबोळात जशी किराणा मालाची दुकानं दिसतात तशाच पद्धतीने हल्ली असंख्य कराओके गाण्यांच्या क्लब्जचा सुळसुळाट झाला आहे, पण तसं पाहिलं तर नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे कराओके क्लबची संख्या वाढत असली तरी त्यामुळे अनेक होतकरू आणि हौशी गायकांसाठी एक मंच उपलब्ध झाला आहे. म्हणजे पूर्वी अंघोळ करताना लोक ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये, गाना आये या ना आये गाना चाहिये…’ असं गात अंघोळ उरकायचे. कराओके क्लबच्या माध्यमातून अशा बाथरूम सिंगर्ससाठी आता एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. घरात एखाद्या  मुलाला अभ्यासात गती नसते. तर अशा मुलासाठी कार्पेन्टर, पेंटर, प्लंबर इत्यादी कामं करण्यापासून हमाली करेपर्यंत उपजिविकेसाठी नोकरीची अशी साधनं शोधली जायची, पण आज चित्र बदलताना दिसतंय. एखाद्याला अभ्यासात रस नसला तरी त्याला अभिनयात गती असू शकते, तर एखादा उत्तम साऊंड रेकार्डिस्ट बनू शकतो. एखादा नेपथ्य उत्तमरीत्या सांभाळू शकतो, तर एखादा उत्तम वादक किंवा गायक असू शकतो. त्यामुळे असंख्य इव्हेंट अॅार्गनायझरच्या निर्माण झालेल्या फौजेत दररोज टेक्नोसॅव्ही पिढीतल्या मनुष्यबळाची भर पडत असते.

पाचेक वर्षांपूर्वी कराओके गाण्यांच्या कार्यक्रमाची मांडणी करताना मला आठवतंय की, आयोजक इच्छुक गायकांची गाणी प्रत्यक्ष ऐकायचे. जर त्या गायक अथवा गायिकेचं गाणं त्यांच्या पसंतीला उतरलं तरच त्या गायकाला कार्यक्रमात गाण्याची संधी दिली जायची. अर्थात आजही ही प्रथा पाळणारे काही आयोजक आहेत, पण हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. बाकी मंडळींचं लक्ष आणि लक्ष्य गायकांकडून गोळा झालेल्या फी अथवा शुल्काकडेच जास्त असतं. ही वस्तुस्थिती आहे, तसंच दुर्दैवही आहे, पण यामुळे या कराओके कार्यक्रमातल्या गायकांचा दर्जा घसरत चालला आहे.

पूर्वी चांगल्या कलाकारांमुळे अॅार्केस्ट्रा किंवा मेलडी मेकर्ससारखे शोज हाऊसफुल्ल जायचे. आज त्यासाठी आयोजक आणि प्रायोजक शोधावे लागतात. मग तिकीट विकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. सगळेच कराओके सिंगर्स स्वतला किशोर किंवा रफी समजतात. आयोजकसुद्धा ‘व्हाइस ऑफ किशोर’, ‘व्हाइस ऑफ रफी’ अशा पंचलाइन देऊन गायकांना चढवतात. त्यामुळे कुठेतरी असे थोर गायक आणि त्यांनी गायलेल्या गाण्यांचा अपमान होतोय असं नाही का वाटत? दुसरी लता मंगेशकर, दुसरी आशा भोसले, दुसरा किशोर कुमार, दुसरा रफी, दुसरा मुकेश होणं शक्य आहे का? कधीच नाही. मग स्वतचं नाव मोठं करणं आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणं हे जास्त शहाणपणाचं नाही वाटत का?

हे समजण्यासाठी गायक आणि आयोजक यांना किमान गाण्याची आवड आणि संगीताचं ज्ञान असलं पाहिजे, पण ते दिसत नाही. एखाद्या बऱया गायकाला शोच्या बॅनरवर थेट ‘व्हाइस ऑफ किशोर’ अशी पदवी दिली गेली तर साहजिकच तो गायक स्वतला किशोर कुमारच समजायला लागलेला असतो. किशोर कुमारने स्वतची एक विशिष्ट शैली जन्माला घातली आणि मग दुनियाने त्याला ‘किशोर कुमार’ ही ओळख दिली. रफीसाहेब कधी कोणाचा व्हाईस होते का? तर नाही. त्यांनी आपल्या मेहनतीवर आणि टॅलेंटच्या जोरावर आपली गायकी इतकी परिपक्व केली की, आजच्या गायकांना त्यांच्या नावाच्या मापदंडावर अवलंबून राहावं लागतं.

कराओके आता वादकांना घेऊन लाइव्ह शोज आखायला लागलेत. जे आता संगीत या पाशनवर असलेल्या प्रेमाच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे याला धंद्याचं स्वरूप आलंय. म्हणजे कोणीही उठून आयोजक बनतो. यांच्या मांदियाळीत जे खरोखरच दर्दी आयोजक आहेत ते झाकले जातात. अहो, माझ्या पाहण्यात असेही आयोजक आहेत, ज्यांनी या व्यवसायात येताना आपण फक्त स्वातंत्र्य दिन, गणपती, दसरा, दिवाळी असे खास दिवस वा सणासुदीच्या निमित्ताने गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार असं म्हणत पदार्पण केलं, पण आता ते बाराही महिने पद्धतशीरपणे त्यांचे शोज चालवतात. संगीतावरचं प्रेम, निष्ठा वगैरे या बोलायच्या गोष्टी असतात. गायकांकडून मिळालेली देणगी/फी भल्याभल्यांना नादाला लावते. यामुळे खरंच सच्चा रसिक दर्दी चांगल्या दर्जेदार गायकीला आणि कार्यक्रमाला मुकलेला असतो हेच तर दुर्दैव आहे. मला इतकंच वाटतं की, ‘अति तिथे माती’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते. म्हणूनच ‘सुळसुळाट’ हा शब्दप्रयोग केल्याशिवाय राहवेना.

गायनाचा दर्जा सुधारायचा असेल तर आयोजकांची एक असोसिएशन असायला हवी. जशी सिनेक्षेत्रात आहे तशी! कार्यक्रमाचं आयोजन करण्याची त्यांची क्षमता याची एक पात्रता ठरवावी. गायक/गायिकेची निवड करताना संगीत तज्ञांनी त्यांची चाचणी घ्यावी. ज्यांना तो फक्त एक व्यवसाय म्हणून करायचा असेल अशा मंडळींपासून चांगल्या गायकाने दूर राहावे.  आज प्रत्येक गायकाला अनेक दरवाजे उघडे आहेत. जर शुल्क देणार असाल तर तुम्हाला गाता येतं की नाही याचं आयोजकाला देणंघेणं नसतं. यहां पैसा बोलता है! आजकाल पैसे दिल्याशिवाय गायला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग तुम्ही कितीही मुरलेले, टॅलेंटेड गायक असाल, पैसे दिले तरच हातात माइक दिला जाईल. नशिबाची साथ असेल आणि पूर्वपुण्याई तुमच्या पाठीशी असेल तर गायकांना पैसे कमावण्याची संधी लाभते, पण ते दिवस येईपर्यंत ‘वो सुबह कभी तो आयेगी’ याची वाट पाहावी लागणार.

[email protected]

(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)