
>> साधना गोरे
हल्ली तरुण, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील तरुण मुलं ‘मी त्याला कोलला’ किंवा ‘मी त्याला कोलतो’ यांसारखे वाक्प्रयोग सर्रास वापरताना दिसतात. संदर्भावरून आपल्याला या वाक्यांचा अर्थ लागतो खरा, पण त्याचं मूळ समजून घेणं तितकंच रोचक आहे. यातली गंमत अधिक रंगतदार व्हावी म्हणून ‘कोलदांडा’ या शब्दाची माहिती आधी घेऊया.
कधी एकाच भाषेतील तर कधी दोन वेगवेगळ्या भाषांतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत. उदा – भांडणतंटा, भांडीकुंडी. ‘भांडणतंटा’ या शब्दांमध्ये एकाच अर्थाचे दोन्ही शब्द संस्कृतमधून आले आहेत, तर ‘भांडीकुंडी’मधील ‘भांडी’ संस्कृत आहे आणि त्याच अर्थाचा ‘कुंडी’ शब्द मात्र कानडी आहे. ‘कोलदांडा’ या शब्दात काठी या एकाच अर्थाचे दोन शब्द दोन वेगळ्या भाषांतून आलेले आहेत. ‘कोल’ शब्द कानडीतला तर ‘दांडा’ शब्द संस्कृतमधील ‘दंड’ शब्दापासून मराठीत आला आहे. कानडीतही कोल म्हणजे दांडाच.
‘कोलदांडा’ या शब्दाच्या अर्थात काळानुरूप बरेच बदल झालेले दिसतात. पूर्वी कोलदांडा हा शिक्षेचा एक प्रकार होता. मनुष्याला उकिडवं बसवून त्याचे हात, पाय, कोपर, गुडघे यांच्यामधून दांडा घातला जाई. या अवस्थेत कंबरेच्या वरच्या आणि खालच्या दोन भागांना एकत्रित आणल्याने मनुष्याचं एक प्रकारे मुटकुळंच होत असे. हात-पाय अजिबातच हलवता येऊ नयेत म्हणून गुडघे आणि कोपरे जिथं एकत्र येतात, तिथल्या फटीत दांडा खोचत. त्यामुळे आपसूकच नमस्काराची अवस्था प्राप्त झालेल्या तळव्यांना मनगटापाशी घट्ट बांधलं जाई. शरीराला अशी अवघडलेपणाची अवस्था प्राप्त करून देण्यात दांडय़ाची महत्त्वाची भूमिका असे. त्यावरून या शिक्षेला ‘कोलदांडा’ म्हटलं गेलं असणार हे सहज समजण्यासारखं आहे.
‘ज्ञानेश्वरी’मध्ये काठी या अर्थाने ‘कोल’, तर दांडपट्टा या अर्थाने ‘कोलकाठी’ हे शब्द आलेले आहेत. अंगकाठीचा निर्देश करणारे बारकुळा, हाडकुळा या शब्दांमधील ‘कुळा’ हा शब्दही काठी याच अर्थाचा आहे आणि ते ‘कोल’चेच रूप असल्याचं कृ.पा. कुलकर्णींनी म्हटले आहे.
आता कोलदांडय़ाची शिक्षा दिली जात नसली तरी शरीर जखडून टाकण्याचा हा प्रकार पाळीव जनावरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आजही वापरला जातो. ओढाळ किंवा चपळ जनावराच्या गळ्यात लोढणा बांधला जातो. घोडा, शेळी यांसारख्या चपळ प्राण्यांची चाल मंदावण्यासाठी एक मागचा आणि एक पुढचा पाय एकत्रित बांधले जातात, त्याला कळाव किंवा कळावा म्हटलं जातं. एखादं जनावर धार म्हणजे दूध काढू देत नसेल तर त्याला भाला घातला जातो. एकूण कोलदांडा असो किंवा त्यासम जनावरांना नियंत्रणात ठेवू पाहणारे इतर प्रकार, या साऱयांमध्ये शरीराच्या हालचालीवर निर्बंध आणले जातात. त्यातून लाक्षणिक अर्थाने आज कोलदांडा शब्दाला संकट, अडथळा, आडकाठी, अडवणूक, प्रतिबंध अशा विविध छटा प्राप्त झालेल्या दिसतात. उदा ः ‘आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाला महापौरांनी घातला कोलदांडा’.
महाराष्ट्रात दोरी आणि काठी यांच्या सहाय्याने खेळ करणारा डोंबारी समाज आहे. त्यांना कोल्हाटी असंही म्हटलं जातं. या ‘कोल्हाटी’ शब्दाचं मूळही कानडीमध्येच आहे. कानडी ‘कोल’ शब्दाचा अर्थ आहे काठी आणि ‘अटिसु’ म्हणजे खेळ. कोल्हाटी समाजातील या खेळातील उडी म्हणजे कोलांटी. या उडय़ा काठीच्या साहाय्याने मारल्या जातात. पण आज मराठीत उलट मारलेल्या उडीलाही कोलांटी म्हटलं जातं.
आपण सुरुवातीला ज्या ‘कोलणे’ क्रियापदाचा उल्लेख केला त्यावर बोलू. मुळात या क्रियापदाचा संबंध विटीदांडू खेळाशी आहे. गलीवरची विटी दांडूने उडवणे म्हणजे कोलणे. यावरून एखाद्याला झिडकारणे, दूर लोटणे, नाकारणे, हडतूड करणे, पराजित करणं अशा विविध अर्थानं हे क्रियापद वापरलं जातं. त्यावरून कोलून मारणं म्हणजे लाथेनं झुगारून देणं, उडवून देणं असा अर्थ रूढ झाला. कालांतरानं त्यातलं ‘मारणे’ या क्रियापदाचा लोप होऊन त्याची जागा फक्त ‘कोलणे’ या क्रियापदाने घेतलेली दिसते.
एखाद्या शब्दाचं असं मूळ स्वरूप जाणून कधी आपण आश्चर्यचकित होतो, तर कधी हा शोध पहिल्यांदा आपल्यालाच उमगला आहे या आनंदाने हरखूनही जातो. प्रत्येकच भाषेत आपले मूळ स्वरूप पार बदललेले असे कित्येक शब्द असतात. भाषा जितकी जुनी तितक्या त्यातील शब्दांच्या अर्थ-ध्वनी यांच्या बदलाच्या आवृत्त्या अधिक असण्याच्या शक्यता वाढत जातात. तर ‘कोल’ शब्दाचे कोलदांडा, कुळा, कोलणे हे गणगोत वाचून तुम्ही आजवर गृहीत धरलेल्या अर्थात काहीएक बदल नक्कीच झाला असेल!































































