आभाळमाया – विविध ग्रहांवरची जमीन

>> वैश्विक

1969 हे वर्ष खगोलशास्त्राच्या अभ्यासात तसं ‘क्रांतिकारी’ म्हणावे लागेल. 1957मध्ये रशियाचा स्पुटनिक-1 अवकाशात गेल्यावर, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेरही भ्रमण करता येते हे सिद्ध झाले. पुढचा टप्पा होता माणसाला अंतराळात पाठवण्याचा. युरी गागारीनच्या रूपाने तोही यशस्वी ठरला. रशियाच्या या अवकाशी भरारीने, सैरभैर झालेल्या अमेरिकेने तातडीने घोषणा केली की, 1970 उजाडायच्या आत आम्ही माणूस चंद्रावर पाठवू… आणि घडलंही तसंच. अमेरिकेचे हे साहस ‘फसवं’ असल्याची टीकाही त्या वेळपासून होत राहिली, पण नंतर गेलेल्या अनेक चांद्रमोहिमांना 1969च्या ‘इगल’ यानाचे अवशेष दिसले. त्यानंतर ती चर्चा थांबली.

चंद्रावर पहिले पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटले होते की, ‘मानवतेसाठीचे हे मोठे पाऊल आहे.’ 20 जुलै 1969 रोजी माणसाने पृथ्वीव्यतिरिक्त वेगळय़ाच अंतराळी ‘भूमी’वर पाय ठेवला. त्यानंतर बुध, शुक्र, मंगळ अशा ग्रहांवर याने जात राहिली आणि तिथल्या भूमीचा वैज्ञानिक तपास करू लागली. एवढंच नव्हे तर विविध ग्रहांप्रमाणेच त्यांचे उपग्रह अवकाशात फिरणारे महापाषाण (अशनी) यांच्या पृष्ठभागांवरही अभ्यास सुरू झाला. त्याचा प्रचंड ‘डेटा’ (विदा) आतापर्यंत जमा झाला आहे.

या लेखात आपण महत्त्वाचे ग्रह आणि त्यांचे काही उपग्रह यावरच भूमी कशी आहे ते पाहू. त्याला ‘प्लेनेटरी जिऑलॉजी’ किंवा ग्रहांचे भूगर्भविज्ञान असे म्हटले जाते. ग्रह, उपग्रहाच्या पृष्ठभागावरची आणि अंतर्भागातील रचना तसेच तिथे भरपूर पाणी आहे त्या जलाशयांच्या तळाचीही भूसंरचना कशी आहे हे थोडक्यात जाणून घेणे योग्य ठरेल. यापैकी स्वतः जाऊन खोदकाम करून माणसाने भूगर्भशास्त्र समजून घेतलेय ते फक्त पृथ्वी आणि चंद्राचे. मंगळावर जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हायचेय. इतर ग्रहांवर माणूस पाठवून असे उद्योग करणे आज फारच कठीण वाटत असले तरी उद्या ते साध्य होईलच.

ज्या ग्रहांवर माणूस गेलेला नाही तिथे ‘लँडर’ याने पाठवली गेली. शुक्र आणि मंगळावरच्या भू-संरचनेचा असा अभ्यास झालाय. पैकी मंगळावर तर रोव्हर किंवा वाहन पाठवून डेटा गोळा करण्यात आला. शनीच्या ‘टायटन’ या मोठय़ा उपग्रहावरही लॅन्डर (अवतरक) यान पाठवून माहिती घेतली गेली. याव्यतिरिक्त ‘इरॉस’ उपग्रहावर (2001), आटोकावावर (2005) टेम्पल-1 (2005), अशा छोटय़ा अशनींवरही याने उतरली आणि त्यांनी तिथल्या पृष्ठभागांच्या संरचनेचा (कॉम्पोझिशन) अंदाज घेतला. या ठिकाणी असलेली धूळ, दगड, माती पृथ्वीवर पृथःकरणासाठी आणण्यात यश मिळाले.
पृथ्वीव्यतिरिक्त इतर अवकाशस्थ वस्तूंच्या जमिनीचा अभ्यास करताना तेथील खडक, माती, रेती यामध्ये असलेले विविध घटक, पाणी असल्यास किंवा सूक्ष्म जीव असल्यास त्याची नोंद आणि त्या त्या भूमीवरून सूर्यप्रकाश किती प्रमाणात परावर्तीत होतो (अल्बिडो किती असतो) अशा अनेक गोष्टींचा अभ्यास या संशोधनात केला गेला. कुठे किती सपाट, खडकाळ जमीन आहे, उंच पर्वत, दऱया आहेत का? अशनीपाताने झालेली विवरे किती? ध्रुवीय भागात बर्फ आहे का? प्रत्येक ग्रहावरचे गुरुत्वाकर्षण, वातावरण कसे आहे आणि ज्वालामुखी, भूकंपांचे प्रमाण काय, अशा कितीतरी गोष्टींचा त्यात समावेश होता.

प्रत्येक ग्रहावर, त्याच्या उपग्रहावर तापमानाचा चढ-उतार, तसेच त्या त्या भूभागामध्ये असलेली खनिजं कोणती, पृथ्वीशी त्यांचे साधर्म्य किती? या साऱयाचा अंदाज घेत आपली सौरमाला आपल्याला खऱया अर्थाने समजू लागली. वेनेरा-7 हे पृथ्वी सोडून इतर कोणत्या ग्रहावर यशस्वीरित्या उतरलेले पहिले यान. 15 डिसेंबर 1970 या दिवशी ते मंगळावर उतरले. 22 ऑगस्ट 1972 रोजी ‘मार्स-3’ या यानाने मंगळभेट घेऊन पृथ्वीवर परत येण्याचा विक्रम केला. ‘पाथफाइन्डर’ हे रोव्हर मंगळावर 1977मध्ये उतरले. फेब्रुवारी 2001मध्ये ‘इरॉस’ या मोठय़ा अशनीवर (तो मंगळ-गुरू यांच्यामधल्या अशनी पट्टय़ात आहे) पोचले. इटोकावा अशनीवरून 13 जून 2001 रोजी काही नमुने पृथ्वीकडे आणण्यात आले. हय़ुजिन्स हे यान शनीच्या ‘टायटन’ या मोठय़ा उपग्रहाला भेट देऊन 14 जानेवारी 2005 रोजी परतले. अशा प्रकारे पृथ्वीबाहय़ ‘भूभागांचा’ अभ्यास वेगाने सुरू आहे. बुधापासून प्लुटो आणि शेरॉन तसेच त्यापलीकडच्या किवर बेल्टमधल्या काही अशनींची भूपृष्ठाrय संरचना कशी ते क्रमाक्रमाने जाणून घ्यावे लागेल. विविध ग्रहांना परिक्रमा करताना किंवा त्यावर लॅन्डर उतरवताना कोणती काळजी घ्यावी लागली आणि या सगळय़ातून नेमके काय साध्य झाले ते आपण पुढच्या काही लेखांमधून वाचणार आहोत. कारण आता पाऊस अपेक्षित आहे. ढगाळ हवामानामुळे किमान सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तरी आकाश मेघाच्छादित राहणार. ‘ला निना’ इफेक्टमुळे पावसाळा वाढला तर ऑक्टोबरचे तारांगणही ढगाआड जाईल. त्या काळात विविध ‘भू-पृष्ठां’चा वेध घेऊया.

[email protected]