स्त्री-लिपी – पुरावे तिच्या शहाणीवेचे!

>> डॉ. वंदना बोकीलकुलकर्णी

स्त्री म्हणून बाईचं जगणं अंतरीच्या उमाळ्याने मांडणारी स्त्रीच. ओव्या, म्हणी-गाणी, कहाण्या-कथा यांची संकलनं-संपादनं करत, तिनेच तिच्यातील स्त्री ला समजून घेतलं. तिच्यातील शहाणेवेचा हा स्वर जणू तिचा हुंकार ठरावा, इतकी भारावून टाकणारी ही निर्मिती आहे.

लोकसाहित्याची खाण कितीतरी रत्न-माणकांनी गच्च भरलेली आहे आणि कितीही उपसा केला तरी कधी रीती न होणारी आहे. विशेष म्हणजे त्यात किती परींनी स्त्री जीवन उमटलं आहे! आपल्याकडच्या कहाण्या घ्या. कहाणीच्या भाषेची लय बाईच्या बोलण्याची लय आहे. छोटी-छोटी वाक्यं. सगळ्या कथनाला एक घरगुती गंध, पण सगळ्या कहाण्यात व्रतं बाईसाठी सांगितलेली. तिच्या नवऱ्याचं, मुलाबाळांचं, दीर-जावांचं, नणंदा-भावजयांचं क्षेम असावं म्हणून तिनं करायची व्रतं. कहाणीतली ती नेहमी तिच्या माणसांसाठी देह झिजवते. कष्टते. ती निखळ स्वतसाठी कधी काही मागत नाही. मला हे मोठं सूचक वाटतं. तिची म्हणवली गेलेली माणसं जर सुखी असतील तरच ती सुखी, असं काहीसं त्या सुचवतात. माणूसपणाच्या नात्यानं पाहिलं तर हे मुळीचं गैर नाही, पण मग त्याच नात्यानं तिच्या सुखाचं, तिच्या आनंदाचं काय, असा विचार कधीच कुणाच्या मनी आला नसेल? असेल. नक्की असेल, पण रूढ चौकटीत तिला तो स्वतशीही उच्चारताना भय वाटलं असेल. तिला काय वाटतं याचा विचार इथल्या व्यवस्थेनं कधीच केलेला नाही. जणू तिला काही वाटण्याचा प्रश्नच येत नाही. तीही मन, बुद्धी असणारी पूर्ण माणूस आहे हे कधी कुणाला विचारात घ्यावसं वाटलेलं नाही. म्हणूनच तिच्या या निर्मितीकडे कुणी लक्ष दिलेलं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात काय किंवा स्वातंत्र्योत्तर काळात काय बाईच्या मागे, पुढे, बरोबर बाईच उभी ठाकलेली दिसते आहे आणि म्हणूनच स्त्री म्हणून (being woman) तिला बाईचं जगणं आतून माहिती आहे. त्यांची म्हणी-गाणी, कहाण्या-कथा यांची संकलनं-संपादनं बहुधा स्त्रियांनीच केली आहेत, हाही काही योगायोग नव्हे.

आठवून पहा मालती दांडेकर, सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत, इंदिरा संत आणि नंतर तारा भवाळकर ही नावं. जिद्दीनं, चिकाटीनं आणि अंतरीच्या उमाळ्यानं त्यांनी ही कामं केली.

ओव्या आणि गाणी यांप्रमाणेच कथा व कहाण्यांमधून त्यांनी स्त्रीला समजून घेतलं आहे. तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सीतेवर  व्यभिचाराचा ठपका ठेवून रामाने तिचा त्याग केला यामागचं दुःख स्त्री शिवाय कोण जाणणार? मग त्यांनी काय केलं तर सीता निर्दोष आहे हे दाखवणाऱया कथा रचल्या. त्यातली एक कथा असं सांगते की, सीतेला मुळी जुळी मुले झालीच नाहीत. एकच मुलगा झाला तिला. त्याला एकदा वाल्मिकी ऋषींपाशी ठेवून सीता नदीवर त्याची बाळोती धुवायला गेली. जाताना त्यांना बाळाकडे लक्ष ठेवायला सांगून गेली. इकडे ते ध्यान लावून बसले. सीतेचं बाळ उठलं आणि रांगत रांगत दूर गेलं. ऋषींनी डोळे उघडले तर बाळ नाही. घाबरून त्यांनी कुश नावाच्या गवताचं बाळ बनवलं आणि त्यात स्वतच्या तप समर्थांनं जीव फुंकला. इकडे सीता नदीवरून येताना वाटेत तिला रांगत येणारं बाळ दिसलं. ती त्याला उचलून आश्रमात आली. पाहते तो तिथे हुबेहूब तिच्या बाळासारखं दुसरं बाळ! मग सीतेने त्यालाही आपलं म्हटलं. अशी ती सीतेची दोन मुले!  ही कहाणी रचून स्त्रियांनी एका अर्थी सीतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. ही कथा वाचली आणि असं वाटलं, कोण या स्त्रियांना अशिक्षित म्हणेल, कोण त्यांना अडाणी ठरवेल? त्यांना तसं म्हणणं म्हणजे भलतं धाडस करण्यासारखं आहे. किती खोलवरची समज त्यांनी दाखवली आहे. ही समज, ही शहाणीव ही स्त्री साहित्याचा मूलभूत गाभा आहे.

त्यांना लिहू-वाचू दिलं नाही, पण म्हणून स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, विश्लेषण क्षमता…हे तर त्यांच्यामध्ये होतंच आणि तीच त्यांची खरी  ताकद, खरं सामर्थ्य! ते नाही कोणी हिरावून घेऊ शकत. ‘डोर’ चित्रपटात नाही का ती नायिका सांगते, एक पाऊल – पहिले पाऊल हिमतीने टाकायची खोटी, तिच्या पायांखाली मोकळी वाट आपोआप उलगडू लागेल!

(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)

[email protected]