>> हर्षवर्धन दातार
अष्टपैलू आणि मनस्वी… ज्ञानपीठ, चित्रकर्मी दादासाहेब फाळके पुरस्कृत गुलजार यांनी नुकतंच 91 व्या वर्षात पाऊल ठेवलं. संपूर्णसिंग कालरापासून गुलजार दीनवी आणि गुलजारपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा व कुठल्याही कलाकाराला स्फूर्ती देणारा आहे. इंद्रधनुष्याचे सगळे रंग मिसळले तर श्वेत रंग दिसतो. गुलजारांच्या कर्तृत्वामध्ये या सगळ्या रंगांचं, भावनांचं नेमकं चित्र आपल्याला दिसतं अन् सोबत त्यांचं शुभ्रधवल व्यक्तिमत्व, ती कृतार्थता आपण डोळ्यात साठवत राहतो.
अष्टपैलू आणि मनस्वी चित्रकर्मी दादासाहेब फाळके पुरस्कृत गुलजार यांनी 91 व्या वर्षात पाऊल ठेवलं आहे. खरं तर या वयातही त्यांची साहित्य, चित्रपट माध्यमाशी बांधिलकी, सृजनशीलता आणि उत्साह बघता ते 19 वर्षांचेच वाटतात. इंद्रधनुष्याचे सगळे रंग मिसळले तर श्वेत अर्थात पांढरा रंग दिसतो. त्यांच्या कर्तृत्वामध्ये या सगळ्या रंगांचं, भावनांचं नेमकं चित्र आपल्याला दिसतं आणि म्हणून नेहमी पांढरेशुभ्र कपडे हा त्यांचा ट्रेडमार्क पोशाख. त्यातून त्यांनी शुद्ध, प्रामाणिक आणि सात्त्विक कला पेश केली. संपूर्णसिंग कालरापासून गुलजार दीनवी आणि गुलजारपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा व कुठल्याही कलाकाराला स्फूर्ती देणारा आहे.
गॅरेजमध्ये मोटारीचे रंग काढण्यापासून ते आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘साहित्यिक आणि कलात्मक रंग’ भरण्याचे उदात्त काम ते करत आले आहेत. ‘बंदिनी’ (1963) ते ‘बंटी और बबली’ (2005), किंबहुना त्याही पुढचा अनेक पिढय़ा ओलांडणारा, बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीला सामावून घेणारा प्रवास सुंदररीत्या केला, करत आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येकाला गुलजार नेहमीच प्रासंगिक आणि समकालीन वाटतात.
‘बंदिनी’मध्ये ‘मोरा गोरा अंग लयले’ गाण्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि कविराज शैलेंद्रनी जणू काही गीतलेखनाची धुरा त्यांच्या लेखणीत सोपवली. त्याचप्रमाणे दिग्दर्शक बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जींनी चित्रपट दिग्दर्शनाची मशाल त्यांच्या हाती दिली. दीना पाकिस्तान येथे जन्म आणि फाळणीचे अनुभव, जखमा त्यांच्या चित्रपटातून आपल्याला चिंतनशील करतात. त्यातून ‘मेरे अपने’, ‘अचानक’सारखे वास्तववादी व ‘आंधी’सारख्या वादग्रस्त ठरलेल्या राजकीय आणि ‘परिचय’, ‘कोशिश’सारख्या संवेदनशील, शीख दशतवाद्यांची पार्श्वभूमी असलेला ज्वलंत, पण परिपक्वतेने हाताळलेल्या ‘माचीस’, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारा ‘हूतूतू’ या चित्रपटांतून त्यांनी आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्याच वेळेला ‘आनंद’, ‘आशीर्वाद’ आणि ‘खामोशी’ चित्रपटांमध्ये संवाद व गीतलेखनातून त्यांनी या माध्यमांवरील पकड दर्शवली. ‘आनंद’मध्ये ‘खुशी एक फुलझडी की तरह होती है और उदासी अगरबत्ती की तरह’ या संवादातून त्यांनी चित्रपटाच्या विषयाला आणि नायकाला एक समर्पक छटा प्रदान केली. ‘खामोशी’मधील गीतात ‘प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो’मधून प्रेमाला एक वेगळा परिपेक्ष दिला. उर्दू शब्द ‘मुख्तसर’ म्हणजे ‘किरकोळ’ हा शब्दसुद्धा त्यांनी वापरात आणला.
हेमंतकुमार (खामोशी), मदन मोहन (मौसम), राजेश रोशन (स्वयंवर, खट्टा-मीठा), लक्ष्मीकांत प्यारेलाल (पलको की छावो मे, गुलामी) अशा अनेक समकालीन संगीतकारांबरोबर काम करूनसुद्धा त्यांचे खरे सूर जुळले ते त्यांच्याच सारखे चिंतनशील आणि ‘ध्वनी संशोधक’ राहुल देव बर्मन यांच्याबरोबर. मैत्रीपूर्ण स्पर्धेतून या अवलिया जोडगोळीने अप्रतिम संगीत श्रोत्यांसमोर आणलं. पंचमदा आणि गुलजार एकमेकांचे सख्खे मित्र होते. ‘परिचय’, ‘खुशबू’, ‘किनारा’, ‘आंधी’, ‘अंगूर’, ‘गोलमाल’, ‘किताब’ आणि ‘इजाजत’ ही काही उदाहरणे. नवीन पिढीतल्या रेहमान (दिल से, गुरू, रावण), विशाल भारद्वाज (माचीस, ओंकारा), शंकर एहसान लॉय (बंटी और बबली) यांच्याबरोबर त्यांनीसुद्धा जुळवून घेतले.
‘मौसम’ चित्रपटात त्यांच्या कल्पक दिग्दर्शनाची आपल्याला जाणीव होते. अनेक वर्षांनंतर दार्जिलिंगला परतलेल्या डॉ. अमरनाथला आपले तरुणपणीचे दिवस आठवतात. तो फ्लॅशबॅक त्यांनी ‘दिल ढुंढता है फिर वही’ या युगुल गाण्यातून अतिशय सुंदर चित्रित केला आहे. कदाचित फ्लॅशबॅक पद्धतीचे हे सर्वोत्कृष्ट गाणे असावे. प्रत्यक्ष बघून याची प्रचीती येते.
परंपरागत गीतकार साधे, सरळ शब्द वापरत किंवा गजल असेल तर उर्दू शेरो-शायरी असे. गुलजारांनी या नेहमीच्या चौकटीला छेद देत त्यांच्या गाण्यात काही वेगळ्या भन्नाट कल्पना मांडल्या. ‘अब के ना सावन बरसे, अब के बरस तो बरसेंगी अंखिया’ (किनारा) यात बरस शब्दाचा आणि ‘जो गुजर रही है उसपे गुजर करते है’ (नमकीन) यात गुजर शब्दाचा कल्पक उपयोग त्यांनी केला. ‘तेरी कमर के बल पे नदी मुडा करती थी, हंसी तेरी सुन सुन के फसल पका करती थी’ (माचीस) आपल्याला थेट एका टुमदार गावात घेऊन जाते. ‘एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहा दास्तान मिली लम्हा कही नही’ (गोलमाल) असा थक्क करणारा विचार फक्त गुलजारच करू शकतात. गंतव्यापेक्षा प्रवास महत्त्वाचा या विचाराशी त्यांची बांधिलकी ‘मूड के हमने कोई मंजिल देखी ही नही’ (नमकीन) आणि ‘पा के भी तुम्हारी आरजू हो’ (इजाजत) या गाण्यातून व्यक्त होते. बलात्काराच्या भयंकर प्रसंगातून होरपळलेल्या नायिकेला पुन्हा सामान्य प्रणयजीवनात आणण्याच्या प्रयत्नाला ‘मासूम सी नींद मे जब कोई सपना चले, हमको बुला लेना तुम पलको के परदे तले’ (घर) असे नाजूक शब्द मदत करतात. गाण्यातील अभिव्यक्तीमधून ‘आँखो की आवाज’, ‘आवाज का रंग’, ‘रंग की खुशबू’, ‘खामोशिया सुने’ या जगावेगळ्या संवेदना श्रोते प्रथमच अनुभवत होते. ‘दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुआँ’ (घरोंदा) यातून त्यांनी वास्तवाशी संवाद केला आणि ‘दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ (मौसम) मधून निसर्गाबरोबर निवांत क्षण व्यतीत केले.
बदलत्या काळाशी सामावून घेताना त्यांनी ‘बिडी जलायले, जिगर से पिया’ (ओंकारा), ‘कजरारे’ (बंटी और बबली) आणि ‘गोली मार भेजे मे’ (सत्या) अशी गाणीही लिहिली. दूरदर्शन माध्यमात मिर्झा गालिब आणि मुन्शी प्रेमचंद की कहानियां या त्यांच्या दूरदर्शन मालिका लोकप्रिय झाल्या. लहान मूल त्यांना अतिशय प्रिय. ‘मोगली’ या आनिमेशन चित्रपटात ‘जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है’ हे त्यांचं गाजलेलं गाणं आजही लोकांच्या चेहऱ्यावर स्मित झळकावून जातं.
‘ये गलत है की वक्त गुजर जाता है. वक्त कभी नही गुजरता. वक्त इटर्नल है, पर्मनंट है. जो गुजर जाता है वो हम और आप’ या विचारातून त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताला विज्ञानापलीकडे जाऊन जीवनाशी जोडणारी परिपूर्णता दिली. गुलजार आजही नियमित टेनिस खेळतात, कार्यालयीन वेळेप्रमाणे 9 ते 5 टेबलाशी बसून लिखाण करतात. उमरे दराज हो गुलजार साब!
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)