
>> डॉ. गजानन सीताराम शेपाळ
महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ अलीकडेच (10 मार्च) मुंबईच्या जहांगीर कला दालनात झालेल्या एका सोहळय़ात प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, ज्येष्ठ चित्रकार ‘पद्मश्री’ वासुदेव कामत आणि प्रयोगशील शिल्पकार किशोर ठाकूर या दिग्गजांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त…
मुंबईच्या जहांगीर कला दालनात 10 मार्च रोजी एक ‘कला इतिहास’ घडला. महाराष्ट्राच्या कला संचालनालयातर्फे ‘राज्य कला प्रदर्शन’ हा कला उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी राज्य कला प्रदर्शनाचे 65 वे पुष्प सादर झाले. या प्रदर्शनाचे औचित्य साधून वर्ष 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या तीन वर्षांचे ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ एका समारंभात प्रदान केले गेले. हे पुरस्कार अनुक्रमे शिल्पकला विभागासाठी ज्येष्ठ आणि प्रयोगशील शिल्पकार किशोर ठाकूर, उपयोजित कला विभागासाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि रेखा व रंगकला विभागासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार ‘पद्मश्री’ वासुदेव कामत यांना जाहीर करण्यात आले. वासुदेव गायतोंडे हे महान, जगप्रसिद्ध चित्रकार महाराष्ट्रासह देशाला लाभलेले प्रज्ञावंत चित्रकार होते. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शतायुषी ‘शिद’ फडणीस यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावतीने त्यांच्या कन्येने हा पुरस्कार स्विकारला. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये कुठलीही केलेली कृती विक्रम समजली जाते. त्याप्रमाणे कला प्रांतात शि. द. यांच्या नावाने अनेक विक्रम सांगता येतील. हंस, मोहिनी, नवल या अंतरकरांच्या नियतकालिकांपैकी ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाची मुखपृष्ठे 1951-52 पासून तब्बल 74 वर्षे शि.द. फडणीसच करीत आहेत. हा एक अद्भूत विक्रमच म्हणता येईल. साप्ताहिक ‘मार्मिक’ने तर त्यांना 2000 मध्येच ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. अत्यंत कमी रेषा, साधे-सपाट रंगलेपन, तीक्ष्ण अवलोकन, बारकाव्यांच्या तपशिलाचे अचूक, पण सुलभ सादरीकरण ही शि.द. यांच्या व्यंगचित्रकलेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. अशा दमदार आणि चिरतरुण रेषांच्या अधिपतीची व्यंगचित्रे निखळ आनंद देतात. शि. द. यांना खरं तर याआधीच ‘महाराष्ट्रभूषण’ तसेच इतर ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मानित करायला हवे होते, असे ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत एकदा म्हणाले होते.
या कार्यक्रमातील दुसरे सन्मानमूर्ती ज्येष्ठ चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत हे होते. त्यांच्या कला कर्तृत्वाला भारताच्या कला-सांस्कृतिक पटलावर ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान प्राप्त झाले आहे. चित्रकार कामत यांच्या कला प्रज्ञेचे योगदान अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणातही लाभलेले आहे. भारतीय धर्म आणि अध्यात्माला अत्यंत अनोख्या रंगलेपनातून आबालवृद्धांना भावतील अशा कलाकृती कामत यांच्या कल्पनाशक्तीतून साकारल्या आहेत.
किशोर ठाकूर यांच्या कलाविषयक योगदानाविषयी माहिती नाही असा कला जगतात क्वचितच कोणी असेल. अत्यंत साध्या साध्या वाटणाऱया, टाकाऊ वाटणाऱया वस्तूंमध्ये शिल्पकार किशोर ठाकुरांना ‘आशय’ गवसतो. मग तो आशय दृश्य कलेतील तत्त्व, सृजनात्मकता आणि त्रिमिताकाराच्या रूपाने प्रकटतो. अशा या सृजनशील, आनंदनिर्मितीचा महास्रोत असणाऱया, साधे राहणीमान, असामान्य कर्तृत्व असणाऱया व्यक्तीला शासनाने सन्मानित करून पुरस्कारालाच सन्मानित केले. याच प्रदर्शनात कला संचालनालयाचा ‘ज्येष्ठ कलाकार पुरस्कार’ हा ज्येष्ठ चित्रकार आणि प्रिंट मेकर विलास शिंदे यांना प्रदान करण्यात आला. दिड लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या तिन्ही कलादिग्गजांना सन्मानित करून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या कलासंचालनालयाने राज्यातील कलाकार्याला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
n महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्या 923 कलाकारांनी 1266 कलाकृती पाठवून या प्रदर्शनासाठी सहभाग दर्शवला. राज्यात सुमारे 250 च्या दरम्यान कला महाविद्यालये असतील. गेल्या तीस-चाळीस वर्षांत महाराष्ट्राने कला जगताला सुमारे चाळीस हजारांवर कलाकार बहाल केलेले आहेत. याचा ढोबळ विचार केला तरी हा सहभाग अगदीच नगण्य आहे. आता तर पुरस्कारांच्या रकमांमध्येही सरकारने वाढ केलेली आहे. मग अधिक उत्साहाने सहभागी न होण्याची ही उदासीनता का?
n या निमित्ताने आणखी एक गोष्ट. वासुदेव गायतोंडे हे जागतिक कला प्रांतात फार मोठे भारतीय नाव. त्यांच्या पश्चात त्यांच्या पेंटिंग्जनी कोटींच्या कोटी रुपयांची उड्डाणे घेतली. आर्ट इन्व्हेस्टमेंटला चालना मिळाली ती खऱया अर्थाने गायतोंडे यांच्या पेंटिंग्जमुळे. अशा दिग्गजाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वोच्च पुरस्कार वाटतो. हा पुरस्कारप्राप्त कलाकारांच्या पुरस्काराची रक्कम सरकारने प्रचलित कर प्रणालीतून सवलतपात्र करावी. शिवाय दृश्य कलाकारांच्या कला विक्रीवरील जीएसटीदेखील माफ करावा. तसे करणे शक्य नसेल तर जीएसटीची टक्केवारी तरी कमी करावी. पर्यायाने महाराष्ट्रातील कला संस्कृती अधिक समृद्ध होण्याला मदत मिळेल.
































































