
>> सुरेश चव्हाण
2005 साली ‘यजुर्वेंद्र महाजन’ यांनी स्थापना केलेल्या व देशातील पहिल्या अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त ठरलेल्या ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’च्या ‘मनोबल’ प्रकल्पाला 3 डिसेंबर 2023 रोजी भारत सरकारच्या ‘सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागा’तर्फे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचा ‘सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
आपण समाजाचे काही देणे लागतो. दुर्बल व्यक्तींनाही चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, त्यांना तशी संधी मिळायला हवी, या विचाराने प्रेरित होऊन यजुर्वेंद्र महाजन या तरुणाने वयाच्या 25व्या वर्षी जळगाव या आपल्या गावी 2005 साली ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ची स्थापना केली. ‘दीपस्तंभ’च्या माध्यमातून वंचित मुलांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी गावोगावच्या शाळा, कॉलेजांमध्ये त्यासंबंधी शिबिरे घेणे, व्याख्यान देणे यानिमित्ताने यजुर्वेंद्र यांना सतत प्रवास घडत होता. दौऱयांदरम्यान अनेक दिव्यांग मुलांशी त्यांचे बोलणे होत असताना त्यांच्या लक्षात आले की, विविध व्याधींनी ग्रस्त असलेली ही मुले बौद्धिकदृष्टय़ा कुठेही कमी वाटली नाहीत. तरीही त्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळताना दिसत नाही. त्यांना टेलिफोन बूथ चालवणे, उदबत्त्या विकणे, चटया विणणे अशी कामे दिली जातात हे पाहून ते अस्वस्थ झाले. पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून ते जळगावला आले.
अधिकृत आकडेवारीनुसार देशभरातील एकूण अपंगांमध्ये 80 टक्के मुले ही आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या समाजात आढळतात. साहजिकच अशा मुलांना घरातून पाठबळ, मार्गदर्शन मिळणेच कठीण असल्याने संधीच उपलब्ध होत नाही. अशा मुलांसाठी काही करून त्यांना दर्जेदार शिक्षणाची व सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या डोळ्यांसमोर खेडय़ापाडय़ांतील जी अपंग मुले होती, त्यांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार होती. त्यांचे राहणे, खाणे, मार्गदर्शन, समुपदेशन, प्रशिक्षण अशा सर्वच गोष्टींसाठी एकत्र व्यवस्था उभारणे अत्यावश्यक होते. पुरेशा पैशांची तजवीज नसतानाही महाजनांनी हिमतीने काम सुरू केले. त्यांच्यापाशी असलेल्या उत्तम प्रशिक्षकांसोबत अजून काही माणसे त्यांनी गोळा केली. अपंग मुलांचे प्रश्न, त्यांची मानसिकता, त्यांच्या क्षमता या सगळ्याकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहणे, मुलांचे मूड्स सांभाळणे यासाठी प्रचंड संयमाची आणि सहनशक्तीची आवश्यकता असते. त्यासाठी या मुलांचे समुपदेशन करणे गरजेचे असते.
महाराष्ट्रात खेडोपाडी फिरताना अपंगत्वाशी आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी लढा देणाऱया मुलांना हेरून ज्या मुलांचे अपंगत्व जास्त आहे, अशांची प्राधान्याने प्रवेश परीक्षा घेऊन त्यांना त्यांच्या बौद्धिक पातळीचाही अंदाज येत होता. या मुलांसाठी 2015 साली दीपस्तंभ फाऊंडेशनच्या अंतर्गत ‘मनोबल’ या समर्पक नावाने नवीन प्रकल्पाची सुरुवात महाजनांनी केली. साधारण 50 मुलांच्या पहिल्या तुकडीतील मुलांचा प्रतिसाद जबरदस्त होता. त्यांचे वर्तमान व भविष्याच्या दृष्टीने आजवर कोणी इतका विचार केलेला नव्हता. इथे 18 वर्षांवरील मुलांनाच प्रवेश मिळतो. बालसुधारगृहात 18 वर्षांवरील मुलांना ठेवले जात नाही. बाहेर आल्यावर ज्यांना कुणाचाही आधार नसतो, अशा मुलांना दीपस्तंभ आधार देते.
इथून शिकून बाहेर पडलेली मुले आज वेगवेगळ्या ठिकाणी उत्तम काम करत आहेत. यासाठी प्रत्येक मुलाची क्षमता आणि कल पाहून ठरवल्या जाणाऱया कोर्सनुसार त्यांच्या बॅचेस केल्या जातात. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या ‘दीपराज’ नावाच्या मुलाला बालसुधारगृहातून बाहेर सोडल्यानंतर त्याला कुणाचाच आधार नव्हता. कारण त्याला त्याचे आई-वडीलही माहीत नव्हते. त्याला रस्त्यावर भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. कुणीतरी त्याला दीपस्तंभ संस्थेत आणून सोडले. संस्थेत आल्यावर महाजन यांच्या लक्षात आले की, हा मुलगा फार सुंदर चित्रे काढतोय. त्याची चित्रकला पाहून संस्थेत त्याला चित्रकलेचे प्रशिक्षण दिले गेले. आज तो मुलगा मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या प्रख्यात कला महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा देऊन, तिथे राहून शिकत आहे. असे अनेक अपंग विद्यार्थी आज मोठमोठय़ा पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये काही तृतीयपंथीयही विद्यार्थी आहेत, ज्यांना पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
भारत सरकारच्या ‘सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागा’तर्फे 3 डिसेंबर 2023 रोजी यजुर्वेंद्र महाजन यांना दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचा ‘सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार’, ‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या ‘मनोबल’ प्रकल्पाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘मनोबल’ हा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प आहे, ज्यामध्ये 18 वर्षांवरील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना विनामूल्य निवासी व सर्व प्रकारचे उच्च शिक्षण दिले जाते. ‘मनोबल’ प्रकल्पात जळगाव व पुणे येथे 12 राज्यांतील व महाराष्ट्राच्या सर्व जिह्यांतील 380 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सोबतच देशातील सुमारे पाचशेहून अधिक दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका येथील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे.
‘दीपस्तंभ’चा एक अनोखा उपक्रम म्हणजे अनाथ आणि निराधार तरुणांसाठीचा ‘संजीवन प्रकल्प’. 18व्या वर्षी सुधारगृहातून बाहेर पडलेल्या मुलांना पुन्हा गुन्हेगारीच्या जगात जाण्यापासून परावृत्त करणे आणि समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याला आकार देणे या हेतूने यजुर्वेंद्र महाजन यांनी प्राचार्य सुनील कुमार लवटे यांच्या मार्गदर्शनातून हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आज असे अनेक तरुण नोकरी व व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण येथे घेत आहेत. राज्यातल्या नऊ जिह्यांमध्ये दीपस्तंभचे विविध प्रकल्प राबवले जात आहेत. खेडय़ांमधल्या घरात अभ्यासाचे वातावरण, त्याला आवश्यक असलेली शांतता आणि मार्गदर्शनाचा अभाव लक्षात घेऊन अमळनेर, वर्धा, पिंपळनेर अशा ठिकाणी ‘ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्रे’ स्थापन करण्यात आली आहेत.