
>> प्रा. डॉ. स्मिता शिंदे
मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ एका संस्थानाचा संघर्ष नव्हता, तर तो होता अन्यायाविरुद्ध पेटलेल्या जनतेचा रणसंग्राम! हा संघर्ष केवळ भूभागासाठी नव्हता. हा संघर्ष होता तो स्वातंत्र्यासाठी! लोकशाहीसाठी! धर्मनिरपेक्षतेसाठी! या लढय़ाची ताकद अशी होती की जातीपातीच्या भिंती ढासळल्या होत्या. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन निजामाच्या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले होते.
भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील एक महत्त्वपूर्ण आणि रोमांचकारी सुवर्णपान म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम होय. या संग्रामामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या भौगोलिक सलगतेला परिपूर्णता मिळाली. अनेकांच्या बलिदानाने पूर्ण झालेल्या या लढय़ामुळे मराठवाडय़ातील मराठी माणसाला स्वतःची अस्मिता, मातृभाषेतून शिक्षण, राजकीय आणि वैचारिक स्वातंत्र्य तसेच लोकशाही प्रजासत्ताकाचा लाभ मिळाला.
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशात 564 संस्थाने होती. त्यात हैदराबाद हे सर्वात मोठे व श्रीमंत. आसिफजाही घराण्यातील निजामाची 225 वर्षे सत्ता या संस्थानात होती. 82314 चौरस मैल क्षेत्रफळ असलेल्या या संस्थानाच्या भूभागात मराठवाडय़ातील पाच जिल्हे, कर्नाटकातील तीन जिल्हे आणि तेलंगणातील आठ जिल्हे अशा एकूण 16 जिह्यांचा समावेश होता. लोकसंख्या सव्वा कोटी. त्यापैकी 85 टक्के हिंदू, 11 टक्के मुस्लिम आणि उर्वरित शीख पारशी व इतर धर्मीय. तेलुगु, मराठी आणि कन्नड अशा तीन भाषा होत्या, तर उर्दू ही राजभाषा होती. राज्यातील 42 टक्के क्षेत्र जहागीरदारांच्या ताब्यात होते. सर्व भलेबुरे गुण घेऊन हे संस्थान नांदत होते.
शेवटचा निजाम मीर उस्मान अली अलीगड विद्यापीठात शिकलेला असल्याने अतिशय धर्मांध होता. त्याला हैदराबादला दार-उल-इस्लाम म्हणजे संपूर्ण मुस्लिम राज्य बनवायचे होते. त्यामुळे त्याने सत्तेवर येताच, महाराजा किशनप्रसादला काढून सालारजंग तिसरा याला नियुक्त केले. त्याशिवाय नगर व गल्ल्यांची नावे बदलण्यास सुरुवात केली. सरकारी नोकऱयांमधील उच्च पदे अलीगडमधून शिक्षण घेतलेल्या मुस्लिमांना दिली. त्याच्या रहबर-ए-दख्खन या वृत्तपत्रांमधून हिंदूविरोधी कविता प्रकाशित करून हिंदू प्रजेला दडपण्याचा इशारा दिला. महकाम-ए-महजबी हा धर्म विभाग सुरू करून मोठ्या प्रमाणावर तबलीग म्हणजेच धर्मांतर सुरू केले. हिंदूंच्या सणांवर बंदी होती तसेच नवीन देऊळ बांधणे तर दूर, साधी मंदिर दुरुस्तीसाठी, सण उत्सवांसाठी, व्यापार व जमिनीचे व्यवहार करण्यासाठी देखील महकामाची परवानगी बंधनकारक होती. पब्लिक सेफ्टी रेग्युलेशनद्वारे हिंदूंना अटक केली जात असे.
शाळांमधून उर्दूची सक्ती तसेच निजामाच्या प्रार्थनेची अट होती. फक्त अंजुमन-ए-इस्लामच्या शाळा सुरू केल्या. हिंदूंच्या शाळा, व्यायाम शाळा, आखाडे, सभा संमेलनावर बंदी होती. रझाकारांनी तर अत्याचाराचा कळस केला होता. हिंदूंवर अत्याचार, हत्या, लूट, बलात्कार आणि धर्मांतराच्या घटना सर्रास घडू लागल्या. यातून हिंदू धर्मसंस्कृती आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्याने लोक अस्वस्थ झाले आणि त्यातून मुक्तिसंग्रामाची ठिणगी पडली.
मराठवाडय़ात गांधी विचाराने प्रभावित असणारे स्वामी रामानंद तीर्थ हे या लढय़ाचे अग्रणी होते. त्यांच्यासमवेत गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे, श्रीनिवास बोरीकर, माणिकचंद पहाडे आदी कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी मराठवाडय़ात राजकीय परिषदा, साहित्य परिषदा तसेच महाराष्ट्र परिषदांच्या कार्याला गती दिली. ज्या वेळी स्टेट काँग्रेसवर बंदी होती त्यावेळी सर्व कार्य हे महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून झाले. 1942च्या भारत छोडो आंदोलनाने देशभरात स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली. आपसूकच त्याचे पडसाद मराठवाडय़ाच्या कानाकोपऱयात उमटले. रझाकार विरुद्ध सामान्य जनता असा संघर्ष पेटला. 7 मे 1947 रोजी जयप्रकाश नारायण यांनी सिकंदराबाद येथील सभेत स्पष्टपणे सांगितले, हैदराबाद हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अन्यायाविरुद्ध लढा. त्यामुळे चळवळीला नवीन बळ मिळाले. इकडे निजामाने 11 जून 1947 ला हैदराबाद स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य राहील, असा फतवा काढला. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असतानाही 15 ऑगस्ट 1947 ला ‘आझाद हैदराबाद’ची घोषणा केली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी 7 ऑगस्टला भारतीय संघराज्यात सामील होण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले. अत्यंत अटीतटीच्या संघर्षाच्या आणि चुरशीच्या या लढय़ात एकीकडे रझाकारांनी अत्याचारांचा कळस गाठला तर दुसरीकडे संस्थानातील सर्व जनतेने लढय़ाला जनलढय़ाचे स्वरूप दिले. त्यामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाले. दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 ला भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य झाल्यानंतर हा लढा अधिक त्वेषाने लढला गेला. जनतेला सार्वभौम प्रजासत्ताकाची आस, तर निजामाला स्वतंत्र सत्तेचा ध्यास लागला.
मराठवाडा मुक्ती लढय़ातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे निजामाची सत्ता झुगारून जवळपास अडीचशे गावांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आणि प्रतिसरकाराची स्थापना केली. या कामात त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यानच्या काळात भारत सरकार आणि निजाम यांच्यात झालेल्या 29 नोव्हेंबर 1947 स्टॅन्ड स्टील कराराचे उल्लंघन करून पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरदार पटेल यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. भारतीय सैन्याने प्राणपणाने लढून अवघ्या चार दिवसांत निजामी सत्ता संपुष्टात आणली. ‘हंड्रेड अवर्स वॉर’ म्हणून या घटनेची इतिहासात नोंद आहे. अखेर ऑपरेशन पोलो यशस्वी होऊन निजामाने शरणागती पत्करली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि मराठवाडय़ात स्वातंत्र्याची पहाट झाली. मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ एका संस्थानाचा संघर्ष नव्हता, तर तो होता अन्यायाविरुद्ध पेटलेल्या जनतेचा रणसंग्राम! हा संघर्ष केवळ भूभागासाठी नव्हता. हा संघर्ष होता तो स्वातंत्र्यासाठी! लोकशाहीसाठी! धर्मनिरपेक्षतेसाठी! या लढय़ाची ताकद अशी होती की जातीपातीच्या भिंती ढासळल्या होत्या. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन निजामाच्या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले होते. मराठावाडा मुक्तीसंग्रामाने शेवटी आम्हाला हेच शिकवलं की, स्वातंत्र्य हे कधीही जात-धर्मावर आधारित नसते. ते एक पवित्र मूल्य आहे. आपण त्याची जपवणूक केली पाहिजे.