दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली. संमेलनाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड होणे म्हणजे लक्षार्थाने लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचा गौरव आहे नि त्यांच्या औडकचौडक जगण्याचाही!
ओडकचौडक हा ताराबाईंचा (डॉ. तारा भवाळकर) आवडता शब्द. आपलं लेखन, वाचन आणि जगणंही औडकचौडक झालंय, असं बोलताना त्या अनेकदा सांगत असतात. त्यांच्या बोलण्यातील हे ‘औडकचौडक’ म्हणजे काय? तर आडवंतिडवं, वाकडंतिकडं कसंही. शिस्तबद्ध किंवा आखून, रेखून असं काही न केलेलं. अर्थात त्याची ताराबाईंना बिलकूल खंत नाही. उलट आपल्या या औडकचौडक लेखन, वाचनाने आणि वागण्या, जगण्यानेच आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. किंबहुना त्यांच्या अशा औडकचौडक जगण्यामुळेच आजच्या बहुआयामी, बहुपेडी, बहुप्रातिभ ताराबाई मराठी सारस्वताला गवसलेल्या आहेत. केवळ त्यांच्यामुळे मराठी लोकसाहित्यातल्या व लोकसंस्कृतीतल्या अनेक अनवट अशा वाटा मराठी वाचकांना उमजल्या आहेत, आकळल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रात इतरही अनेक मान्यवर होते आणि त्यातले काही आजही आहेत. परंतु ताराबाईंचं वेगळेपण हे की, त्यांनी परंपरेनं चालत आलेल्या लोकसंस्कृतीला मातृसंस्कृतीशी जोडून घेतलं. लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा अभ्यास त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून केला. परिणामी लोकसंस्कृतीच्या मुळाशी असलेलं स्त्रीतत्त्व नव्यानेच मुखरित झालं. लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला एक नवा आयाम मिळाला.
आज डॉ. तारा भवाळकर हे नाव जरी उच्चारलं, तरी त्यापुढे त्वरित ‘लोकसाहित्याच्या अभ्यासक’ ही उपाधी आपसूक जोडली जाते इतकं लोकसाहित्य आणि डॉ. तारा भवाळकर हे समीकरण जुळून आलंय. यावरून कदाचित कुणाला असंही वाटेल की, लोकसाहित्य हा ताराबाईंचा कायमच जिव्हाळ्याचा व प्रेमाचा आणि संशोधनाचा विषय राहिला असावा, परंतु प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. लोकसाहित्य किंवा लोकसंस्कृती हा विषय त्यांच्या आयुष्यात फार उशिरा आला. तोही योगायोगाने. मात्र लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अंगाने त्यांचं भरणपोषण कळत-नकळत अगदी लहानपणापासून होत गेलं. महाराष्ट्र, हिंदुस्थानातील जुनंपण सरण्याच्या आणि नवंपण येण्याच्या सांध्यावरच्या काळाच्या ताराबाई साक्षीदार आहेत. एकीकडे दुसरं महायुद्ध सरून यंत्रयुगाला प्रारंभ झाला होता. जातं जाऊन गिरणाबाई चालायला लागली होती. ग्रामीण भागातही हे बदल हळूहळू झिरपत होते. तरी त्याचं सार्वत्रिकीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे घरातच जात्यावरच्या ओव्यांपासून अंगणात चालणाऱ्या सण-उत्सवातल्या खेळ, गाण्यांपर्यंत त्यांना संथा मिळाली. त्यात त्यांचं बालपण गेलं पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या वाड्यात. ताराबाईंचं कुटुंब या वाड्यात एक भाडेकरू म्हणून राहायचं. वेदांचं मराठीत भाषांतर करणाऱ्या आणि प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या चित्राव शात्र्यांच्या या वाड्यात एकीकडे अखंड ज्ञानयज्ञ सुरू असायचा, तर दुसरीकडे वाड्यातल्या सर्व देवळांत पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत देवांची साग्रसंगीत सेवा सुरू असायची. यातून अगदी आपसूक लोकधाटी ते शास्त्रधाटी असा ताराबाईंचा पिंड घडत गेला आणि परंपरेनं चालत आलेलं जसंच्या तसं न स्वीकारता प्रत्येक गोष्टीला शास्त्रकाटय़ाची कसोटी लावायची त्यांना सवय लागली. अन्यथा जुनं ते सोनं म्हणत परंपरेविषयी गहिवर काढणाऱयांची आपल्याकडे कमतरता नाही. परंतु लोकसाहित्याचा व लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना ताराबाई या ‘गहिवर संप्रदायात’ रमल्या नाहीत. लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना केवळ भावभिजलेपण उपयोगाचं नाही हे त्यांना सुरुवातीलाच उमगलं आणि त्यांनी लोककथा, लोकगीतांपासून ते लोकविधी व लोकश्रद्धांपर्यंत प्रत्येक बाबतीत विवेकवादाचा आधार घेतला.
मराठीत लोकसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाची पायाभरणी करणाऱ्या दिवंगत विदुषी दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एक इशारा देऊन ठेवला होता. त्या म्हणाल्या होत्या, लोकसाहित्याचा खूप मोठा भाग अत्यंत हिडीस, कंटाळवाणा व जनतेच्या बुद्धीस मागे खेचून धरणारा आहे. लोकसाहित्याचा कृत्रिम उमाळा केवळ त्या विषयालाच नव्हे, तर आमच्या अभिरुचीला व प्रगतीला अंती मारक ठरणारा आहे. तेव्हा लोकसाहित्याची छाननी, त्याचे सर्व घटक अलिप्तपणे तपासून व्हायला हवी. ताराबाईंनी दुर्गाबाईंचा हा इशारा केवळ शिरोधार्य मानला नाही तर त्या त्यापेक्षा एक पाऊल पुढेच गेल्या. म्हणून तर त्या म्हणतात, पारंपरिक जीवन हा माझा जिव्हाळ्याचा विषय असला तरी तो माझ्या अंधश्रद्धा उमाळ्याचा विषय कधीच नव्हता. उलट मी त्याकडे सतत चिकित्सक वृत्तीनेच पाहत आले आहे. जुने ते सर्व सुंदर, आदर्श असे जे एक स्वप्नचित्र उभे करण्याची प्रथा आहे ती चिकित्सक विवेकाच्या विरोधात जाणारी आहे.
आता या क्षणी ताराबाईंकडे पाहिलं की, त्या कृतार्थतेच्या एका टप्प्यावर पोहोचलेल्या दिसतात. वापरून वापरून मऊसूत झालेल्या साडीचा लाघवी मुलायमपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्राप्त झालेला आहे. पण प्रत्यक्षात ताराबाईंचं आयुष्य इतकं साधं, सरळ कधीच नव्हतं. सातत्याने स्वतला सिद्ध करतच त्या आताच्या टप्प्यावर पोहोचलेल्या आहेत. लहानपणी घरातील ज्येष्ठ अपत्य म्हणून त्या जरा लवकरच जाणत्या झाल्या. आपली कोणत्याही प्रकारची जबाबदारी कुटुंबावर पडू नये म्हणून शालेय वयातच त्या शिकवण्या घेऊ लागल्या. गंमत म्हणजे रीतसर शिक्षण त्यांनी फक्त एसएससीपर्यंतच घेतलं. पुढलं महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण त्यांनी बाहेरूनच पूर्ण केलं. त्यांनी नोकरी करणं ही त्यांच्या कुटुंबाची गरज नसेलही कदाचित, पण आपल्या आत्मसन्मानासाठी त्यांनी कायम नोकरी करूनच शिक्षण घेतलं. त्यासाठी त्यांनी कधी हिंदी राष्ट्रभाषेची परीक्षा दिली, तर कधी पीटी शिक्षिका म्हणूनही शिकवलं. ताराबाई महाविद्यालयात गेल्या त्या थेट प्राध्यापक म्हणून शिकवायलाच. एवढंच कशाला आपला पीएचडीचा अभ्यासही त्यांनी एकप्रकारे स्वतच केला आणि त्या प्रबंधासाठी त्यांना पुणे विद्यापीठाचा (आता सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ) सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचा पुरस्कारही मिळाला. त्या जेव्हा म्हणतात, मी औडकचौडक जगले, त्यामागे हा संदर्भ असतो.
लहानपणी चित्राव शात्र्यांच्या वाड्यात राहिल्यामुळे तेथील मंदिरात होणाऱ्या देवाच्या सर्व धार्मिक विधी, विधांनांतील नाटय़ात्मकता ताराबाईंना लहानपणीच भावली होती. पुढच्या काळात कदाचित त्यातूनच त्या नाटकाच्या अभ्यासाकडे वळल्या. केवळ अभ्यासाकडे नाही, तर त्या नाटय़ चळवळीत सामील झाल्या. नाटय़लेखन, दिग्दर्शनापासून ते थेट अभिनयापर्यंत त्यांनी रंगभूमी गाजवली. नोकरीच्या निमित्ताने 50 वर्षांपूर्वी सांगलीत येऊन स्थिरावल्यावर त्यांनी सांगलीतच एक प्रायोगिक नाटय़ संस्थाही सुरू केली. विशेष म्हणजे त्यांना राज्यस्तरावरील नाटय़स्पर्धेत अभिनयासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. नाटकाच्या या आवडीतूनच त्यांनी पीएचडीसाठी ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण : प्रारंभापासून 1920 पर्यंत’ हा विषय निवडला. पीएचडीसाठी या विषयाचा अभ्यास करतानाच त्यांची गाठ पौराणिक मिथकांपासून लोकरंगभूमीवरील विविध घटकांशी पडली आणि त्यांच्यासमोर अभ्यासाचं एक वेगळंच क्षेत्र अवचितपणे खुलं झालं. त्यानंतर मग त्यांचा पीएचडीचा अभ्यास कधीच पूर्ण झाला अन् लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा अभ्यास मात्र आजतागायत सुरू आहे. कारण लोकसाहित्य, लोकसंस्कृती ही प्रवाही गोष्ट आहे. ती कधीच थांबत वा संपत नाही. काळाच्या ओघात वेगवेगळी समकालीन रूपं धारण करून ती वाहत राहते. तेव्हा त्या-त्या काळात लोकसंस्कृतीचा मागोवा घेऊन तिचा समकाळाशी सांधा जोडणं ताराबाईंना महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच आजही त्या लोकगीतं, लोककथा, लोकश्रद्धा यांची आधुनिक काळाशी सांधेजोड करीत असतात.
लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा अभ्यास ताराबाईंनी त्यांचा त्यांनी केला आणि तो करताना तो अगदी शास्त्रीय पद्धतीने केला. म्हणजे आज लोकसाहित्य ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा मानली जाते. मात्र या ज्ञानशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विविध ज्ञानशाखांचा (मल्टी डिसिप्लिनरी) आधार घ्यावा लागतो. त्यानुसार ताराबाई इतिहासापासून ते थेट मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, दैवतशास्त्र, भूगोल अशा साऱ्या ज्ञानशाखांच्या क्षेत्रांत मनपूत रमलेल्या असतात.
महत्त्वाची बाब म्हणजे ताराबाई कुठलीही गोष्ट अंधपणाने स्वीकारत नाहीत, मग ती गोष्ट प्राचीन असो वा अर्वाचीन. म्हणूनच जेव्हा 1975 साली आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष हिंदुस्थानातही जोरदारपणे साजरं होत होतं, तेव्हा ‘स्त्री-मुक्तीची कल्पना निदान आपल्याकडे तरी नवीन नाही’ असा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि त्यासाठी मध्ययुगात होऊन गेलेल्या संतस्त्रियांचे दाखले त्यांनी दिले होते. विठ्ठलाकडे आई, बाप, भाऊ या नात्यांपलीकडे जाऊन सखा, प्रियकर म्हणूनही पाहणाऱ्या संतस्त्रियांच्या ाढांतिकारकत्वाची त्यांनी नव्यानेच महाराष्ट्राला ओळख करून दिली. त्यातूनच आकाराला आलेलं ‘स्त्री-मुक्तीचा आत्मस्वर’ हे त्यांचं पुस्तक मध्ययुगातील स्त्री-मुक्ती संकल्पनेची स्त्रीवादाच्या अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी करणारं आहे. पण केवळ संतस्त्रियांपुरता स्त्री-मुक्ती किंवा स्त्रीवादाचा पुरस्कार करून ताराबाई थांबल्या नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी एकूण लोकसंस्कृतीचाच त्या अंगाने मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की, ही लोकसंस्कृती खरं तर मातृसंस्कृती आहे. ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्यातील स्त्री-प्रतिमा’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांची लोकसाहित्याची स्त्रीवादी मांडणी पाहायला मिळते. लोकसाहित्याची अशी स्त्रीवादी अंगाने प्रथमच मांडणी केली गेल्यामुळेच ताराबाईंचं या अभ्यासक्षेत्रातील काम विशेष दखल घेण्यायोग्य आहे. अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ‘सीतायन’ या पुस्तकाने त्यांची ही स्त्रीवादी मांडणी अधिकच अधोरेखित झालेली आहे. अभिजात परंपरेने रामायणाचा स्वीकार केलेला असताना लोकपरंपरेतील स्त्रीच्या मनात मात्र ‘सीतायन’च कसं आहे ते त्यांनी लोकपरंपरेतील लोकरामायणांच्या आधारे या पुस्तकात सिद्ध केलं आहे.
संस्कृतीचं उत्खनन आणि विश्लेषण हा ताराबाईंचा स्थायी भावच आहे. तेव्हा दिल्ली येथे भरणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांना मिळालेलं अध्यक्षपद म्हणजे, लक्षार्थाने लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा गौरव आहे नि ताराबाईंच्या औडकचौडक जगण्याचाही!
डॉ. मुकुंद कुळे
(लेखक लोकसंस्कृती व लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत)