
>> चंद्रसेन टिळेकर
डोकं अजिबात न शिणवता सुखी होणं म्हणजेच आनंद मिळवणं ही किमया जगाच्या पाठीवर केवळ आपल्याच देशाला अवगत असावी. जगाच्या तुलनेत अज्ञानी राहण्याच्या बाबतीत मागेच राहण्याचा चंग बांधलेल्या भारतीयांनी आता तरी विज्ञाननिष्ठा जोपासायला हवी. तार्किक बुद्धीने विचार करायला हवा.
मित्रहो, कोण कसे आपल्या आनंदावर कधी विरजण घालील याचा नेम नाही. आपण आपले आपल्याला वाटणाऱया आनंदाच्या डोही यथेच्छ डुंबत असतो, पण तेवढय़ात काठावरून कोणी ओरडतो, ‘अरे, हा कसला तुझा आनंदाचा डोह? हे तर नुसते डबके आहे. जरा बाहेरच्या जगात डोकावून बघ. मग तुला कळेल, खरा आनंद कशात असतो आणि तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने आनंदी असलेले लोक जगात आहेत!’
माझेही अगदी तसेच झाले. बेडकाला वाटावे, आपण डुंबत आहोत तेवढेच जग आहे, पण कोणीतरी त्याला बाहेरचे अफाट विश्व दाखवून त्याचा भ्रमनिरास करावा, किंबहुना योग्य शब्दांत सांगायचे तर पाणउतारा करावा. अगदी तसेच माझे झाले, पण खरे सांगायचे तर हा पाणउतारा माझ्या एकटय़ाचा झालेला नाही, तर अख्ख्या देशाचा झाला आहे.
तर मित्रहो, आनंदाच्या डोहातून बाहेर काढून दुःखाच्या काठावर आपल्याला बसवले आहे ते एका जागतिक संस्थेने. ही संस्था म्हणे दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध करते. त्या अहवालाचे नाव आहे, ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’. ही संस्था या जगात कोणकोणते देश आनंदी आहेत याची वर्गवारी करते. काही दिवसांपूर्वीच तिने तसा अहवाल प्रसिद्ध केला. पहिल्या दहा आनंदी देशांत ज्या देशांची नावे आहेत त्यात पहिला नंबर आहे तो फिनलंड या देशाचा. त्यानंतरचे नऊ देश आहेत… डेन्मार्क, आईसलँड, स्वीडन, नेदरलँड, कोस्टारिका, नॉर्वे, इस्रायल, लक्झेंबर आणि मेक्सिको. ठीक आहे, खुशाल डुंबू द्या या देशांना आनंदाच्या डोहात, पण आमच्या भारत देशाचे काय? त्या जागतिक संस्थेने आनंदी असण्याच्या वर्गवारीत आपला नंबर अगदी खाली म्हणजे 126 वा लावला आहे. आनंदात राहण्यासाठी जेवढी म्हणून पथ्ये पाळायची असतात तेवढी आपण भारतीय कसोशीने पाळत असतो. मग आमचा नंबर शेवटून वरचा का लावावा?
आता हेच पहा ना, आनंदात राहायचे असेल तर ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ हे वचन आपल्याला किती सुखाचे वाटते! म्हणून तर आपण आपले राहणीमान वाढावे म्हणून अधिक कष्ट करण्याच्या फंदात पडत नाही. हा वेडेपणा ते पाश्चात्त्य करतात. मानवी आयुष्य सुखकारक व्हावे म्हणून ते नाना तऱहेचे शोध लावण्यात गर्क असतात. त्यांनी अहोरात्र डोके शिणवून लावलेल्या शोधांचा उपयोग आपण आनंदाने करतो की नाही? म्हणजे त्यांनी पंख्याचा शोध लावायचा आणि आपण त्याखाली बसून ‘पवनस्तोत्र’ वाचायचे. त्यांनी कॉम्प्युटरचा शोध लावायचा आणि आपण त्यावर कुंडली-पत्रिका काढायची. हातपाय न हलवता अन् डोके अजिबात न शिणवता सुखी होणे म्हणजेच आनंद मिळवणे ही किमया जगाच्या पाठीवर किती देशांना अवगत आहे बरे?
आनंदी राहायचे असेल तर आणखी एक वचन आपण भारतीयांनी श्रद्धेने उराशी बाळगले आहे ते म्हणजे ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी!’ हे वचन म्हणजे वर सांगितलेल्या वचनाचे जुळे भावंडच! आपण सगळे भारतीय वरील दोन्ही वचने निग्रहाने पाळून आनंद मिळवतोच की नाही? हे या समितीला दिसू नये ही खेदाची गोष्ट नव्हे काय?
आता सुख प्राप्त करून आनंदी व्हायचे असेल तर हातपाय हलविले पाहिजेत, म्हणजेच काहीतरी काम केले पाहिजे, म्हणजेच गीतेच्या भाषेत सांगायचे तर कर्म केले पाहिजे, पण गीताच म्हणते तसे कर्म करून फळाची आशा धरायचीच नसेल तर कर्म कराच कशाला? (श्रीकृष्णाची आमच्या राजकीय नेत्यांशी गाठ पडलेली नाही अन्यथा काहीही कर्म न करता फळ कसे मिळवावे, याचे ज्ञान त्याला झाले असते.) आपला देश आनंदात असला पाहिजे असा जो मी ग्रह करून घेतला होता त्याला आणखी एक कारण होते ते म्हणजे ‘अध्यात्मात आनंद असतो’, असे अधूनमधून माझ्या कानावर पडत आलेले आहे
आपला देश आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी सारे जग भारताकडे आशाळभूतपणे पाहत आहे असे मला आमच्या शेजारच्या आचरेकर काकांनी सांगितले होते आणि तसे त्यांना त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी म्हणजे टोपले महाराजांनी सांगितले होते. (ते महाराज नुकतेच तुरुंगातून सुटून आले आहेत.)
खरे सांगायचे तर तसे माझे आणखीही काही ग्रह म्हणजे समज होते. त्यापैकी एक म्हणजे ‘आपली संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे’, पण एक-दोन वाऱया परदेशी, विशेषतः पश्चिम देशी झाल्यावर ही अंधश्रद्धा तत्काळ गळून पडली. सार्वजनिक स्वच्छता, वक्तशीरपणा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि एकूणच सामाजिक बांधीलकीची जपणूक ही जर श्रेष्ठ संस्कृतीची लक्षणे असतील तर श्रेष्ठ संस्कृती कुणाची हे सांगणे न लगे!
हे असे सगळे असले तरी आपण म्हणजे आपला देश जगात सर्वात जास्त आनंदी आहे, अशी माझी धारणा होती. किंबहुना दृढ श्रद्धाच होती. याचे प्रमुख कारण म्हणजे थोरामोठय़ांनी रूढ केलेले एक वचन आणि ते म्हणजे ‘अज्ञानात आनंद असतो!’ आपल्या देशवासीयांसारखी अज्ञानात जगणारी माणसे या पृथ्वीतलावर विरळाच! अज्ञानालाच ज्ञान समजण्याची किमया करावी ती आपल्या भारतीयांनीच. याचे कारण हेच असावे की, आपल्याला आनंदी राहायचे असेल तर ‘अज्ञानात आनंद असतो’ हे सुवचन आम्ही शिरोधार्य मानलेले आहे.
मेवा खायचा असेल तर सेवा करावीच लागते हे सांगणे न लगे. अर्थात हे पुण्यकार्यही अंनिससारख्या वैचारिकदृष्टय़ा ‘आगाऊ’ असलेल्या संस्थांना पाहवत नाही आणि ते त्या उपकारकर्त्या साधू पुरुषांना कारागृहाची वाट दाखवतात. हे बिचारे आजचे साधू पुरुष म्हणजे बाबा, बुवा, बापू, महाराज, स्वामी वैराग्याचे मापदंड मानावे इतक्या साधेपणाने राहतात की, बहुतेकांच्या कमरेला फार तर चिमूटभर लंगोटी असते. एरवी हे साधू गांजा, चरस वगैरे व्यसने करतात असा आरोप काही नतद्रष्ट पुरोगामी करतात. हजारो भक्तांचे प्रश्न सोडवायचे म्हणजे विरंगुळा हा हवाच हे या मंडळींच्या लक्षात येत नाही हीदेखील खेदाची गोष्ट नव्हे काय?
जागतिक आनंदाची उठाठेव करणाऱया त्या संस्थेने आम्हा भारतीयांची आनंदी ठेवण कशात, याचा आधी शोध घ्यावा. यापलीकडे तुम्ही आम्ही भारतीय तरी काय बोध देणार?
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)