>> प्रसाद कुळकर्णी
आज प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक ताणतणाव आहेत. माणसाचे जीवनच या तणावांनी भरून गेलेले आहे. आजचा दिवस पार पडला, उद्याचं काय? अशा वातावरणात माणूस जगतोय. कामाच्या प्रचंड ताणामध्ये विरंगुळ्याचे क्षण वेचायला त्याच्याकडे वेळच नाही म्हणा किंवा त्यासाठी तो वेळ काढतच नाही. नाटक, संगीत, वाचन, पर्यटन या आपल्या मनाला चिरतरुण, प्रफुल्लित राखणाऱ्या गोष्टींकडे पाहायलाही या पिढीला वेळ नाही. मग मनाची मशागत होणार कशी?
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झालाय की, त्याला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे तर दूरच राहिले. सध्या तो ज्या प्रकारच्या आयुष्यातून प्रवास करतोय किंवा ज्या प्रकारचे आयुष्य जगतोय, ते त्याला मान्य नसले तरी ते जगण्याला तो बांधील आहे.
माणूस मानसिक निराशेमुळे मृत्यू जवळ करतोय. हा झाला ताणाचा एक प्रकार, तर दुसरा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना दिलेल्या कामाचे लक्ष्य (target ) पूर्ण करण्याचा ताण. अर्थात काम कोणतेही असो, त्या कामाचा आनंद घेत ते पूर्णत्वाला नेणे महत्त्वाचे. आता कामाचा आनंद घेत एका ठरावीक काळापर्यंत आपण ते करू शकतो. शरीर आणि मन कधीतरी थकणारच. मग शरीर थकल्यावर आपण काय करतो? आराम करतो, विश्रांती घेतो, काही वेळ शांत पडून राहतो किंवा निवांत झोप घेतो. थोडा वेळ का होईना ती व्यवस्थित आणि निवांत मिळाली की, आपण ताजेतवाने होऊन पुन्हा कामाला लागू शकतो. हे झाले शरीराच्या बाबतीत.
आता मन थकल्यावर आपण काय करतो? अगदी नेमकं सांगायचं तर काहीच करत नाही. मन थकते म्हणजे तरी काय? तर जे काम आपण करत असतो ते व्यवस्थित होत नाही. काहीतरी गडबड, चिडचिड होऊ लागते. काहीच सुचत नाही. कामात आपण एकरूप होऊ शकत नाही. या सगळ्या मन थकल्याच्या जाणिवा आहेत. खरं म्हणजे या जाणिवा होऊ लागल्यावर आपण अनिवार्यपणे काही वेळ त्या कामातून पूर्णपणे बाहेर येऊन मनाला दुसरा काही विरंगुळा किंवा मनाला दुसऱ्या एखाद्या आपल्या आवडीच्या विषयात गुंतवले पाहिजे. आवडीची गोष्ट मिळाल्यामुळे मन प्रफुल्लित होते, त्यावरचा ताण हलका होतो आणि ते पुन्हा नव्या जोमाने कामात रस घेऊ लागते. यासाठी आपण दिवसभरातला काही वेळ (शक्यतो पहाटेचा) मोकळ्या जागी डोळे मिटून मनातले सगळे विचार दूर सारून शांत बसावे. आपण मनाने आपल्याला आनंद मिळणाऱ्या गोष्टीत स्वच्छंदपणे फिरून येऊ शकतो. निसर्गसान्निध्यात (शहरांत जरा कठीणच आहे) किंवा मोकळ्या वाटेवरून अर्धा तास तरी फिरून येऊ शकतो आणि हे सगळे अगदी नाहीच जमले तर आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या कामाचा आनंद घेऊन किंवा नवीन वेगळे एखादे काम शिकून मनाला ताजे करू शकतो.
म्हणजे मुद्दा काय, तर मन हे अगदी लहान-लहान गोष्टींमुळे आनंदित, प्रफुल्लित होऊ शकते. आता तसं पाहिलं तर शास्त्राrयदृष्टय़ा मन नावाचा कोणताही अवयव शरीरात कुठेही नाही. मग मन आनंदित झालं, माझ्या मनात आलं, मन भरून आलं, मन प्रसन्न झालं म्हणजे नेमकं काय झालं? थोडक्यात सांगायचं तर जाणीव आणि बुद्धी यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, स्मरणशक्ती, भावना, चेतना या गोष्टी जिथे होतात त्या ठिकाणाला मन असं म्हणता येईल.
आपल्या मनात आलेल्या, उमललेल्या भावभावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायच्या असतील तर तिथेही एक जागृत मन असायला हवे. म्हणजेच या सुंदर भावना निर्माण होण्यासाठी आणि त्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपलं स्वतःचं मन प्रफुल्लित असायला हवं.
अगदी सोपं उदाहरण देतो. ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या प्रकल्पाची (project) जबाबदारी दिलेली असते. ती पूर्ण करून त्या प्रकल्पाचं सादरीकरणही (presentation) करायचं असतं. आता प्रकल्प तयार करत असताना तो जास्तीत जास्त परिणामकारक कसा होईल आणि सादरीकरण करताना त्याची परिणामकारकता ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या व्यक्तीवर किंवा ग्राहकांवर (client ) जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी तो प्रकल्प आधी आपल्या मनात रुजायला हवा, समजायला हवा तर आणि तरच त्याचा प्रभाव आपण समोरच्या वर पाडू शकतो. म्हणजेच पुन्हा आपण फिरून तिथेच येतोय की, मनाची काळजी घेणे, मन तंदुरुस्त ठेवणे, त्याची योग्य प्रकारे मशागत करणे आणि मनाला इजा होऊ नये हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आता मानसिक स्वास्थ्य बिघडणे म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा कळत-नकळत मनावर आणि पर्यायाने मेंदूवर पगडा बसणे. मन स्थिर असेपर्यंत आपले विचार नेमक्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे निकालही योग्य मिळत असतो. एकदा का मनावरचं दडपण वाढू लागलं की, या विचारांची दिशा स्वैर होऊ लागते. त्यामध्ये तारतम्य राहत नाही. मनात अनेक चित्रविचित्र विचार उभे राहू लागतात. त्यांचा ताण वाढू लागतो. परिणामी सारासार विवेकबुद्धी नष्ट होऊ लागते आणि अखेर माणूस वेडापिसा होऊन जातो. या सगळ्याचा शेवट काहींची मानसिक स्थिरता नष्ट होऊन ते विचित्र वागू लागतात, कुणी नशेच्या आहारी जातात, तर कुणी आत्महत्या करून आपले जीवन संपवून टाकतात. अर्थात त्यामुळे त्या व्यक्तीचं शरीर या जगातून जातं, पण सगळे ताणतणाव मात्र तिथेच उरतात. ती व्यक्ती स्वतःपुरती तो प्रश्न सोडवते इतकेच.
आजची तरुण पिढी अकाली वार्धक्याने ग्रासलेली दिसते. अविरत ताणांमुळे या पिढीमधला मृत्यूदर वाढू लागलाय. ही सगळी कशाची लक्षणं आहेत? मन, शरीर या दोघांनाही पौष्टिक आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी व चिरतरुण राहण्यासाठी गरजेचं मिळत नाही, पण जे नको ते मात्र वेळी-अवेळी मिळत राहतं. अखेर दोघंही थकतात. मेंदू काम करणं बंद करतो आणि शरीर एक थकलेला गोळा होऊन जातं. मग मानसोपचार तज्ञ, आहार तज्ञ यांच्याकडे फेऱ्या मारून आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अर्धवट करून त्यांची मात्र भर तो करत राहतो. हे वाक्य मी म्हणतोय, कारण या सगळ्यांनी अखेरपर्यंत त्याचं मन काही प्रफुल्लित, प्रसन्न होत नाही ते नाहीच. कारण आपल्या मनाला आधी आपण कधीच जाणून घेतलेले नसते. त्याला काय हवंय, काय आवडतं, ते कशात रमतं हे समजूनच घेतलेलं नसतं. उपचार शरीरावर होतात आणि मन मात्र तसंच कोरडं राहतं.