
>> अजित कवटकर
निर्मितीक्षम बदल म्हणजेच आजच्या भाषेत ‘ट्रेण्डस्’ स्वीकारणे प्रगतीसाठी आवश्यक असते. काळानुरूप, परिस्थितीनुसार होत असलेल्या परिवर्तनाशी स्वतःला आवश्यक तिथे आणि तेवढे जुळवून घेणे गरजेचे आहे. पण आपण काही बाबतीत असेही बदलत आहोत की, त्या सवयी, ते बदल आपली देव, देश, धर्माबद्दलची अस्मिताच बदलू पाहत आहेत. वारसा रूपाने चालत आलेल्या काही प्रथा, परंपरा बदलणे, दूषित करणे, मलिन करणे योग्य नाही. म्हणून ट्रेण्डस् विचारपूर्वकच स्वीकारले पाहिजेत.
दरवाजावर जरीचे स्टिकर लावले गेले असले तरी बहुतेक जण सवयीप्रमाणे ‘Pull’ ला ‘Push’ करणार वा ‘Push’ ला ‘Pull’ करणार. जाणीवपूर्वक जरी हे केले जात नसले तरी सवय ही कधी कधी एवढी अंगवळणी पडते की, मग कृती अंध होते. समाजात पडणारे टेण्डस् हे काहीसे असेच जन्माला येतात. यात कधी कधी आवश्यकतेचा लवलेशही नसतो. एकाने केलं की, त्याचं अनुकरण दुसरा करतो आणि मग तिसरा आणि हे काहीतरी ‘डिफरंट’ म्हणून बहुतेक याला ’ट्राय’ करू पाहतात आणि यातूनच ‘टेण्ड’ पडतो, सवय जडते. आज नवनवीन ‘टेण्ड’ फॉलो करणे हे असेच सवयीचे झाले असून ते आवडो वा न आवडो, पण त्यास उक्रांतीची प्रक्रिया समजून बहुधा अंगीकारले जाते. आता यातील अनेक गोष्टी या ‘विनाकारण – निरर्थक – निरुपयोगी’ या कॅटेगरीत येतात, परंतु तरीही जर सर्वच ते स्वीकारत असतील तर आपण त्याबाबतीत मागे राहून आपला मागासलेपणा का प्रदर्शित करायचा? अशा मानसिकतेत समाजमन आज संमोहित झालेले दिसते. याचा प्रभाव हा विचारशैली – जीवनशैलीत फरक पाडत असतो.
सुसंस्कारांचे अनुकरण हे संस्कृतीला शाश्वत करतात, पण वाईट टेण्डस् हे पुढच्या पिढय़ा दूषित करतात. तसेच यामुळे अस्थिरता, असंयम, धरसोड वृत्ती मात्र स्थिरावत असल्याचे दिसून येते, जे धर्म, संस्कृती, संस्कार आणि एकंदरच जीवनाच्या दृष्टीने मारक ठरू शकते. याचे कारण म्हणजे टेण्ड हे जसे साध्यासोप्या गोष्टींना आपल्या कवेत घेत असतात तसेच ते अस्मिता, स्वाभिमान, विचारधारेला धक्का देत त्यांनादेखील कमकुवत करण्याची क्षमता बाळगतात. याच कारणास्तव कोणता टेण्ड समाजात रुजतो आहे वा पेरला जात आहे आणि तो आपल्या एखाद्या सांस्कृतिक वारशाचे वैभव वाढवणार की घटवणार, याबाबत दक्ष असणे गरजेचे आहे.
व्हिडीओ / फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा टेण्ड टिकटॉकने पाडला आणि आजची पिढी त्याच्या पूर्णपणे आहारी गेलेली दिसते. संवाद – संपर्क करण्याकरिता प्रत्यक्ष भेटणे वा कॉल करण्यापेक्षा मेसेज, चॅट करण्याची सवय रुजली आहे. ऑफिसला न जाता ‘वर्क फ्राँम होम’ला अधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरबसल्या शाँपिंग करण्याची सोयही ‘ऑनलाइन पर्चेस’ पद्धतीचा जबरदस्त प्रसार करत आहे. यूटय़ूबमुळे टीव्हीवर ‘लाईव्ह’ बघणे सोडून आता आपल्या सोयीनुसार रेकॉर्डेड बघणे होत आहे. ‘ऑनलाइन व्यवहार’ पर्याय सर्वमान्य झाला आहे, इतका की, सुट्टे पैसे नाहीत म्हणून कढीपत्ता खरेदीचे पैसेदेखील ‘ट्रान्स्फर’ केले जात असल्याचे बघायला मिळत आहे. स्मार्ट फोन – स्मार्ट वॉच – स्मार्ट कार्ड म्हणजेच गॅजेट्सने तरुणांना भुरळ घातली आहे. ‘रेडिमेड’साठी गुगल करण्याची सवय विद्यार्थी वर्गात वाढत असतानाच चॅट-जीपीटीने त्यात भर घातलेली दिसते.
आयडॉलाईझ केल्या जाणाऱया सिने कलाकाराला पूर्वी सिनेमा पडद्यावर स्टाईलमध्ये सिगारेट ओढताना पाहून त्या वेळच्या अनेक पिढ्या त्या स्टाईल स्टेटमेंटच्या अनुकरणात व्यसनाधीन झाल्या. ‘डार्क / निगेटिव्ह पर्सनॅलिटी’ची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा उभी करून एक प्रकारे गौरविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थीदशेतील मुलांना ते एक साहसी ध्येय वाटू लागले आहे. रेडी टू इट, इन्स्टंट नूडल्स वगैरेंच्या वाढलेल्या क्रेझमुळे पारंपरिक पौष्टिक आहार पद्धती विस्कळीत झालेल्या दिसतात. शिक्षण – नोकरीनिमित्त परदेशात जायचे आणि पुढे तिथेच स्थायिक होण्याचा कल नवतरुणांमध्ये वाढलेला दिसतो. ‘रिपीट’ न करण्याच्या बडेजाव मानसिकतेमुळे अव्यवहार्य मागणी, खर्च, अपव्यय वाढत आहे. बाजारात नवीन मॉडेल आले रे आले की, आपल्याकडील जुने मॉडेल त्या बदल्यात एक्स्चेंज करण्याची घाई दिसते. बॅचलर जीवनाचा सर्वतोपरी पूर्ण आनंद घेऊनच मग उशिरा लग्न करण्याची रीत प्रस्थापित होत आहे. ‘टॅटू’ काढण्याचा टेण्ड अधिकाधिक ठळक होत आहे. सतत सेल्फी काढण्याची सवय ही एखाद्या रोगाप्रमाणे बळावत चालली आहे. चांगले दिसण्यासाठी, तारुण्य टिकविण्यासाठी आरोग्याबाबत जागरुकता आणि त्यातूनच सेंद्रिय पदार्थांची मागणी वाढत आहे. विंडो शॉपिंगची भटकंती हा ताणतणाव मुक्त करणारा उपाय ठरत आहे. बाजारात येणाऱया नवनवीन सुपरफूडच्या शृंखलेत आता एव्होकॅडोची अचानक एन्ट्री झाल्याने ‘डाएट सजग’ जनता अगोदरचं सोडून आता याच्या मागे लागली आहे. बाहेरचं नको म्हणून घरातच घरगुती जंक फूड तयार करण्याचा घाट घातला जात आहे. आपल्या ठिकाणाचा पत्ता हा जीपीएस लोकेशनद्वारे पाठवणे सोयीचे झाले आहे. स्वस्त व सुलभ असूनदेखील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे कमीपणाचे वाटण्याचा संकुचितपणा तयार होत आहे आणि त्यामुळे काहीच नाही तर निदान दुचाकी घेणे प्रत्येकाला अनिवार्य वाटू लागले आहे. मित्रांशी बोलताना प्रत्येक वाक्यात निदान एक तरी शिवी असणे ‘कूल’ समजले जाऊ लागले आहे. एअरपॉड्समुळे मोबाईल शरीराचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
आपल्या सांस्कृतिक उत्सवांमध्ये डीजेच्या तालावर असभ्यपणा, अश्लीलपणा नाचताना – गाताना दिसतो. देवाधर्माच्या कार्यात भक्ती कमी आणि देखावा – दिखावा अधिक होत आहे. ब्रॅण्ड – बॅण्डेडशिवाय इतर काही मनापासून आवडेनासे झाले आहे. घरातील देव्हाऱयात दिवा लागो न लागो, पण लाँग ड्राईव्हच्या निमित्ताने देवदर्शनाला जाण्याचे टुरिझम वाढत आहे.
पक्ष फुटणे हे राजकारणाला नवीन नाही, पण दुसऱयाचे पक्ष फोडूनच आपला पक्ष घडवायचा व सत्तेवर यायचे, राहायचे हा टेण्ड संवैधानिक लोकशाहीसाठी अतिशय धोक्याचा बनत चालला आहे. जनतेला काहीतरी दाखवत राहायचं म्हणून कुठेतरी कसले तरी चार आण्याचं काम करून त्याचा बारा आण्याचा प्रचार करण्याचा टेण्डदेखील जोर धरत आहे. गल्लीच्या पलीकडे पोहोचताना ज्यांचे कार्य व महती धापा टाकते, ते दिल्ली काबीज केल्याप्रमाणे स्वतःचे बॅनर लावून शहरांच्या विद्रूपीकरणास कारणीभूत ठरत आहेत. रेटून खोटं बोललं की, खोटय़ाला खरं भासवणं कधी कधी शक्य होतं आणि तोच पायंडा आता राजकारणात पडला आहे. राजकारणात – समाजकारणात विचारधारा राहिलेली नाही. उरला आहे तो फक्त स्वार्थवाद. मतं ही जनसेवेतून नव्हे, तर नरेटिव्ह सेट करून फसवून चोरण्याची प्रथा पडत आहे.
प्रगतीसाठी आधुनिकता अपरिहार्य आहे. त्यामुळे निर्मितीक्षम बदल म्हणजेच आजच्या भाषेत ‘ट्रेण्डस्’ स्वीकारणे आवश्यक असते. काळानुरूप, परिस्थितीनुसार होत असलेल्या परिवर्तनाशी स्वतःला जुळवून घेण्याकरिता आपल्याला आवश्यक तिथे आणि तेवढे बदलणे गरजेचे आहे. आज झालेले वा होत असलेले बदल क्रमप्राप्त आहेत आणि त्यातील बहुतांश हे योग्यच होय! पण आपण काही बाबतीत असेही बदलत चाललो आहोत की, त्या सवयी, ते बदल आपली देव – देश – धर्माबद्दलची अस्मिताच बदलू पाहत आहेत. शतकानुशतकं वारसा रूपाने चालत आलेल्या काही प्रथा, परंपरा बदलणे, दूषित करणे, मलिन करणे योग्य नाही. तिथे शिस्त, संयम, संस्कार बाळगणे अनिवार्यच आहे. तेव्हा सवय लावून बदल घडविणारे टेण्ड स्वीकारताना हा बदल आपला सामाजिक विकास, सांस्कृतिक सभ्यता तर कमजोर करत नाही ना? असा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे.