लेख – बांगलादेशी खासदाराच्या हत्येचे गूढ

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

बांगलादेशी खासदार अनार यांच्या हत्येचे विश्लेषण करताना असे दिसते की, त्यामागे तस्कर, गुन्हेगार, बांगलादेशी घुसखोर यांचा मोठा हात असावा. सीमेवर तस्करी करणाऱ्या वेगवेगळय़ा गटांमध्ये होणाऱ्या स्पर्धेमुळे किंवा वैरामुळे ही हत्या झाली असावी. अन्वारुल अझीम अनार हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. 22 मे रोजी कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. खासदार अनार हे 12 मे रोजी उपचार घेण्यासाठी कोलकाता येथे आले होते

बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार हे कोलकाता येथील एका मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेले. तेथून डॉक्टरांकडे उपचारांसाठी जायचंय असं सांगून बाहेर पडले. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी सांगितलं की, आम्हाला त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले की, अनार यांची कोलकाता येथील एका घरात नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली. गृहमंत्री खान यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या हत्येत बांगलादेशातील लोक सामील होते.

अन्वारुल अझीम अनार हे बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगचे खासदार होते. ते झेनैदह-4 मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत हेते. 5 जानेवारी 2014 रोजी ते पहिल्यांदा संसदेवर निवडून आले होते. 2018 सालच्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. भारत-बांगलादेश सीमेवरील झेनैदह हे क्षेत्र गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. 2008 मध्ये इंटरपोलने अनार यांच्याविरुद्ध शस्त्रs आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नोटीस जारी केली होती. 2014 मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले.

अनार 12 मे रोजी बारानगरमधील मंडोलपारा येथे एका मित्राच्या घरी गेले होते. गोपाल बिस्वास असे या मित्राचे नाव असून ते सोन्याचे व्यापारी आहेत. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांना भेटण्यासाठी निघाले आणि तेव्हापासून बेपत्ता होते. बिस्वास यांनी बारानगर पोलीस ठाण्यात अनार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना त्यांच्या कोलकाता उपनगरातील फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. याच ठिकाणी अनार यांना शेवटचे पाहिले गेले.

बांगलादेशचे खासदार ज्या फ्लॅटमध्ये शेवटचे दिसले होते, तो फ्लॅट बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्याच्या मालकीचा आहे. त्याने हा फ्लॅट अख्तरझमन नावाच्या अमेरिकन नागरिकाला भाडय़ाने दिला होता, जो एक संशयित आहे. अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला मायदेशी आणण्यासाठी बांगलादेशचे सरकार इंटरपोलची मदत घेणार आहे. खासदाराच्या हत्येच्या कथित सहभागावरून तीन संशयितांना बांगलादेशच्या न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. पश्चिम बंगाल सीआयडीने बंगालच्या उत्तर 24 परगणा जिह्यातून सियाम हुसेन या बांगलादेशीला अटक केली. तत्पूर्वी पश्चिम बंगाल सीआयडीने या प्रकरणात जिहाद हवालदार या बांगलादेशी स्थलांतरिताला अटक केली होती. जिहाद हवालदार मुंबईत कसायाचे काम करायचा. त्याने बांगलादेशी खासदाराच्या मृतदेहाचे 80 तुकडे केले आणि त्यांची न्यू टाऊनच्या आसपासच्या कालव्यासह वेगवेगळय़ा ठिकाणी विल्हेवाट लावली. पश्चिम बंगाल सीआयडीने दक्षिण 24 परगणा जिह्यातील भंगार भागातील बागजोला कालव्यातून त्यांच्या शरीराचे अवयव जप्त केले. नेपाळमध्ये अटक केल्यानंतर ताब्यात असलेल्या मोहम्मद सियाम हुसेनने सीआयडीला घटनास्थळी नेले.

बांगलादेशचे खासदार अनार यांच्याविरुद्ध शस्त्रs आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये इंटरपोलची नोटीस होती. पश्चिम बंगालच्या सीआयडीच्या अधिकाऱयांनी या हत्येमागे सोन्याच्या तस्करीचा संशय व्यक्त केला होता. अनार आणि त्यांचा अमेरिकेतील मित्र व व्यावसायिक भागीदार यांच्यात सोन्याच्या तस्करीवरून झालेला कथित वाद हे या गुह्याचे कारण असावे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी यापूर्वी अनारच्या हत्येतील प्रमुख संशयित म्हणून एका व्यावसायिकाचे नाव घेतले होते.

बांगलादेशी घुसखोर तस्करीवर अवलंबून राहतात. तस्करी व मानवी व्यापारात गुंतलेले माफिया धनवान झालेले आहेत आणि सीमा भागात त्यांनी आपापले बस्तान बसवलेले आहे. भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि त्यांचे राजकीय आश्रयदाते यांची तस्करांसोबत हातमिळवणी झालेली आहे. त्यामुळे अनधिकृत बांगलादेशी घुसखोर सीमा सहज पार करून भारतात प्रवेश करू शकतात. एवढेच नाही तर भारताचे नागरिक म्हणून राहण्यास आवश्यक असलेली कागदपत्रेही ते विकत घेऊ शकतात.

ही तस्करी थांबवण्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाला पूर्णपणे अपयश मिळालेले आहे. पश्चिम बंगालचे सरकार आणि त्यांचे पोलीस सीमा सुरक्षा दलाला घुसखोरी थांबविण्याकरिता मदत करायच्या ऐवजी घुसखोरांना आत येण्यामध्ये मदत करतात. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी जमिनी सीमा, समुद्री सीमेपासून अविरत चालू आहे. वेळोवेळी काही बांगलादेशी पकडले जातात, परंतु बहुतेक भारतात कायमचे घुसतात.

बांगलादेशी व्यक्तींना यापुढे येता क्षणीच प्रवेश-अनुमतीची (Visa On arrival), मुक्त प्रवेशाची परवानगी देऊ नये. वैद्यकीय पर्यटनाची प्रथा (Medical Tourism) बांगलादेशीयांकरिता बंद करावी. अनधिकृत घुसखोरांवर, त्यांच्या बिगर सरकारी संघटनांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकावा. बांगलादेशी घुसखोरी देशाच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका आहे. ही घुसखोरी आणि सीमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे.

पश्चिम बंगालची 2217 किलोमीटरची सीमा बांगलादेशला लागलेली आहे आणि या सीमेवर तस्करी घुसखोरी हा एक मोठा व्यवसाय आहे. तस्कर आणि घुसखोरांकरिताआओ जाओ घर तुम्हाराहे तत्त्व पश्चिम बंगालमध्ये पाळले जाते. सोने, अफू, गांजा, चरस, खोटय़ा नोटा, तस्करी, गुरेढोरे पळवणे, दरोडेखोरी, माणसे पळवणे, गुन्हेगारांना पळायला मदत करणे, स्त्रिया मुलांचा व्यापार करणे इत्यादी सीमेपलीकडून येऊन केले जाणारे गुन्हे हे एक वास्तव आणि उपजीविकेचा भाग आहे.