
>> प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
प्रख्यात लोककलावंत दाम्पत्य कांताबाई सातारकर आणि तुकाराम खेडकर हे रघुवीर खेडकर यांचे आई-वडील. ते केवळ तीन वर्षांचे असताना वडिलांनी इहलोकीची यात्रा संपवली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी रघुवीर यांनी तमाशाच्या फडात काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज वयाची साठी उलटल्यानंतरही अव्याहतपणे सुरू आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांचं जे स्थान आहे तेच स्थान तमाशासृष्टीत रघुवीर खेडकर यांचं आहे असं म्हणता येतं. यात अजिबात अतिशयोक्ती नाहीये, पण तमाशा या कला प्रकाराला बहुजन समाजाची कला असा शिक्का बसला असल्याने इथल्या अभिजन समाजाने त्यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही, हे दुर्दैव!
तमाशाची ओळख आणि प्रसिद्धी त्यातल्या सरदार, सोंगाड्या, नर्तकी आणि शाहीर यांच्या भूमिकांमुळे होत असते. हे सारे घटक जर सशक्त असतील तर दर्जेदार निर्मिती घडून येते. कधी कधी यातला एखादाच घटक वरचढ ठरत ठरतो आणि तरीही तमाशा लोकप्रिय होतो. असा करिश्मा सोंगाड्या या व्यक्तिरेखेने केलेला आहे. बाकेराव, दगडूबाबा साळी, काळू-बाळू जोडगोळी, दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे, किसन कुसगावकर, दत्ता महाडिक, शंकर शिवणेकर, वसंत अवसरीकर या कलावंतांनी सोंगाड्याची भूमिका अत्यंत समर्थपणे निभावून एक समृद्ध अशी परंपरा निर्माण केली आहे. हीच वैभवशाली परंपरा रघुवीर खेडकर अतिशय ताकदीने पुढे चालवत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतला ‘शो मॅन’ राज कपूर आणि मराठी सिनेजगतातला पहिला सुपरस्टार दादा कोंडके या दोन दिग्गज कलावंतांनी रुपेरी पडद्यावर सोंगाड्याच्या भूमिकेचा आविष्कार घडवला आहे.
आई कांताबाई सातारकर या त्यांच्या आद्यगुरू होत. तसेच जुन्या काळातले दत्ता महाडिक, दत्ता तांबे, लक्ष्मण टाकळीकर, गुलाबराव बोरगावकर, गंगारामबुवा कवठेकर, बबन हडशिकर, कोंडू पाटील, जगन्नाथ शिंगवेकर, शंकर कोचीरे यांचा अभिनय पाहून ते खूप साऱ्या गोष्टी शिकल्याचे नम्रतेने नमूद करतात. म्हणून यांनाही ते गुरुस्थानी मानतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या औचित्याने संगीत नाटक अकादमीच्या मेघदूत या खुल्या रंगमंचावर दिल्लीत त्यांनी परंपरागत ढोलकी फडाचा तमाशा सादर केला होता. त्याचप्रमाणे चंदिगड शहरातही त्यांनी आपली कला सादर केली. या दोन शहरांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण करून त्यांनी देशभरात तमाशाचा डंका वाजवला. आई कांताबाई सातारकर यांच्यासह सहा दशकांपेक्षाही जास्त काळापासून त्यांनी तमाम मराठी रसिकांची मने तृप्त केली आहेत. याच वर्षी मेमध्ये कांताबाईंना कोरोनाने आपल्यातून हिरावून नेले.
आपली कला अधिकाधिक विकसित करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी रघुवीर यांनी भरपूर कष्ट उचलले आहेत. केवळ जुन्या कलाकारांचा अभिनय पाहून ते शिकले नाहीत तर सोबतीला वाचन-चिंतन-मननाचीही जोड दिली. त्याकाळातले मार्मिक, रसरंग आणि वात्रटिका असलेले वृत्तपत्र-साप्ताहिके विकत घेऊन वाचत. वाचलेल्या मजकुरावर आधारित गोष्टी रचून ते तमाशात सादर करायचे. जेणेकरून तत्कालीन घटना-घडामोडींचा समर्पक उल्लेख योग्य तिथे ते करायचे. परिणामी प्रेक्षकांना नवीन काही तरी देऊन जुन्या तमाशातला तोचतोचपणा टाळता यायचा. लोककलेतला अस्सलपणा आणि हजारो प्रेक्षकांना सहा-सात तास बांधून ठेवण्याची कला ही फक्त इथल्या रांगड्या तमाशातच आहे. चित्रपट अभिनयाला टेक-रीटेकची संधी असते, पण तमाशात मात्र तसं नसते. इथं सारे काही उत्स्फूर्त नि त्याचक्षणी! अक्षरओळख नसलेले कलाकार कोणत्याही पाठांतराशिवाय एकाच वगातल्या व निरनिराळ्या भूमिका सफाईदारपणे साकारतात. रघुवीर खेडकरांचे अलीकडच्या काळातले डोम्या नाग, मुक्काम पोस्ट अभंगवाडी, कोर्टादारी फुटला चुडा यांसारखे वग प्रचंड गाजलेत. त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी आवतनं आलीत, पण तमाशातला थेट प्रतिसाद, रसरशीत जिवंतपणा, टाळ्या-शिटय़ा ऐकण्याची सवय असल्याने त्यांनी नाकारली. चैत्रराम शिरवळकर यांच्याकडून शास्त्राrय गाण्याचे तर विजय मुळे-शेवगावकर, पापा मास्तर सातारकर यांच्याकडून नृत्याचे धडे त्यांनी घेतलेयत.
आपल्या समई-थाळी-मशाल नृत्यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. तमाशाचा हंगाम नसतो तेव्हा ते कीर्तनात रममाण होतात. केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रघुवीर खेडकरांचे मनःपूर्वक अभिनंदन.


























































