अभिप्राय – विस्तारलेले अनुभवविश्व

>> सुधाकर वसईकर

परंपरेने पौरोहित्य व्यवसाय करणाऱ्या प्रदीप बाळकृष्ण जोशी यांचा ‘गुरुजींच्या कविता’ हा कवितासंग्रह. प्रस्तुत काव्यसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक नारायण लाळे यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली असून प्रदीप बाळकृष्ण जोशी यांचा जीवन संघर्ष, पौराहित्य ते कविता लेखनाचा प्रवास त्यांनी यात उलगडून दाखवला आहे. शिवाय प्रस्तावनेत ते प्रदीप जोशी यांचा नामनिर्देश ‘गुरुजी’ असा करतात. त्यांनी केलेल्या मर्मग्राही विश्लेषणातून गुरुजींच्या कविता आकलन होण्यास मदत होते.

धार्मिक, पारंपारिक, सांस्कृतिक विधी करताना लोकसंपर्क वाढत जाऊन गुरुजींचे अनुभवविश्व विस्तारत गेले. इथेच त्यांना कविता गवसली. पुढे मग ते मनमोकळेपणाने कविता लिहू लागले. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता, मोकळेढाकळेपणा कवितेतही प्रतिबिंबित झालाय. लोकांकडून ऐकून घ्यावे, पण निर्णय स्वतच्या मनाने घ्यावा. याचा अर्थ असा की, इतरांचे सल्ले, सूचना किंवा मतं ऐकायला हरकत नाही, पण शेवटी योग्य काय आहे हे स्वतच ठरवावे. हे ‘मोकळा’ कवितेत छान उलगडून दाखविले आहे.

मी मोकळाच असतो, ऐकावयास सल्ला

बांधून तोंड माझे, ऐकतो जगास साऱ्या

आपलं-तुपलं करणारी आपली माणसं रुसतात, फुरगटून बसतात. वागण्याची तऱहा बदलते. पण कवी ‘तीळगूळ कवितेत लिहितो…

सोडून देऊ आता, कटुता मनातली ही

रुसव्यावरीच येवो, पांत ती खरी ही

यातून कवीच्या शब्दप्रयोगाची कल्पकता दिसून येते. आईवर सगळेच कवी कविता लिहितात. प्रस्तुत संग्रहातही आईचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ‘मातोश्री’ ही कविता वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी आहे.

आम्हाला नवीन कपडे, ती साठ छिद्र ल्याली

भरवून घास आम्हा, ती फक्त पाणी प्याली

प्रस्तुत काव्यसंग्रहात सुखदुःखाच्या कल्पनेतून साकारलेल्या 59 कविता असून संयम, नाते, विश्वास, वचन, वाहून गेले,क्रोधचिंतन कविता विचारप्रणव आहेत. स्वगत आणि मातोश्री उल्लेखनीय कविता आहेत. विशेष म्हणजे पहिलाच काव्यसंग्रह असूनही लेखनात नवखेपणा जाणवत नाही हे कवितांचे मुख्य वैशिष्टय़ आहे. पौराहित्यात पूजापाठ पठणाला जशी उपजत लय असते. ती लय कवितेनेही साधली आहे. त्यामुळे बहुतांश कविता गेय स्वरूपात आहेत. अर्थात ‘हुंदका’, ‘तर काय’, ‘स्वगत’ या कविता गद्य स्वरूपात म्हणजे मुक्तछंदातही वाचायला मिळतात. त्यांनाही अंतर्गत लय आहेच. वृत्तीगांभीर्यातून लिहिलेली कविता रसिकांना निश्चित भावणार आहे.

गुरुजींच्या कविता 

कवी : प्रदीप बाळकृष्ण जोशी    प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन

पृष्ठे : 76,   मूल्य : रु. 200/-