
<<< अजित कवटकर >>>
आजचे राजकारण समाजमनाला विषय खाऊ घालत आहे. समाजाने कोणत्या विषयाकडे लक्ष द्यावे वा देऊ नये, तो विषय कसा स्वीकारावा, त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे सारं काही आज काही पक्ष यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी जंग जंग पछाडत असतात. सोशल मीडिया हे त्यांचे ‘वॉर रूम’ झाले आहेत. त्यामुळे आपले मत आज आपले राहिलेले नाही. स्वातंत्र्य, स्वायत्तता मृगजळाप्रमाणे दिसत तर आहेत, परंतु भेटत मात्र नाहीत. ‘पॉलिटिकल नरेटिव्ह ऑफ डिस्ट्रक्शन’च्या सहाय्याने राजकारण खोल व व्यापक ढवळाढवळ करीत आहे आणि ते गंभीर तसेच घातक आहे.
सध्या आदर्शांवर राजकारण, समाजकारण आणि शासन चालत नाही. त्यामुळे अॅण्टी इन्कम्बन्सीचा प्रभाव नेस्तनाबूत करण्यासाठी राजकारणात ‘फेक नरेटिव्ह’चा नरेटिव्ह सेट केला जात आहे. तो समाजावर बिंबविण्यासाठी हजारो करोडो रुपयांची जाहिरातबाजी करावी लागते. आपल्या अकार्यक्षम, अपयशी कारभारामुळे जनमानसात आपल्याबद्दल तयार झालेली नकारात्मकता पुसून टाकणे हाच केवळ राजकीय नरेटिव्हचा उद्देश नसतो, तर त्याजागी आपल्याविषयी आशा, अपेक्षा, अभिमान तयार करणे ही लबाडी त्यात असते. नजीकच्या काळात आलेल्या धक्कादायक निवडणूक निकालांनी हे दाखवून दिले आहे की, नियोजनबद्धपणे एखादा फेक नरेटिव्ह सेट केला तर तो मतदाराच्या विचारांत आमूलाग्र मतपरिवर्तन घडवू शकतो. समाजमनातील एखादा विचार दडपण्यासाठी, घालवण्यासाठी त्या जागेवर दुसरा विचार खोलवर रुजविण्याची करामत हे ‘डिस्टॅकटिव्ह नरेटिव्ह’ करत असतात. थोडक्यात काय तर मतदारला आता राजकीय नरेटिव्हचे बाहुले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याने काय विचार करावा, किती खोल विचार करावा, कधीपर्यंत करावा… हे सारं काही, ‘पॉलिटिक्स ऑफ माइंड मॅनेजमेंट’द्वारे होत आहे. त्यामुळेच ज्याला पाच वर्षे शिव्या, शाप देण्यात खर्ची घातली, त्यालाच पुन्हा पुढची पाच वर्षे निवडून आणण्यासाठी मतदान होताना दिसत आहे. विचार करताना हे जरी भयानक भासत असले तरी ही वास्तविकता आजचे सत्य आहे. माणूस आज चहूबाजूंनी होणाऱ्या अनेकाविध विचारांच्या, कल्पनांच्या भडिमारामुळे गोंधळून गेला आहे. त्याला मग तेच सत्य वाटू लागते ज्याचा प्रभाव, दबाव हा इतरांहून अधिक असतो.
सत्तापक्षातील एखाद्याचे गुन्हे पुराव्यांनिशी बाहेर आले असतील तरी त्याच्यावर कारवाई करण्याचे सोडून सरकारी यंत्रणा त्याला पाठीशी घालते हा एक नवीन पायंडा सध्या पडला आहे. त्याही पलीकडे जाऊन जो जास्त आवाज करतो, त्याचा आवाज दाबण्यासाठी त्याची जुनी प्रकरणे उकरून वा कल्पिलेले खोटे आरोप त्यावर चिटकवून त्याला एक प्रकारे ब्लॅकमेल करून गप्प करण्याचे घाणेरडे राजकारण सध्या सुरू आहे. भ्रष्टाचार विरोधाच्या मुद्द्यावर तसेच नीतीतत्त्वांची ग्वाही देत जे निवडून आले आहेत, तेच जेव्हा भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना, अनैतिकतेला आपल्या पक्षात घेऊन त्यांना एक नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देतात, तेव्हा विचार येतो, जनतेला व मतदाराला याचे काहीच कसे वाटत नाही? की राजकारण्यांनी जनसामान्यांना मूर्ख बनवणे आणि त्यांनी ते लगेच विसरून पुन्हा नव्याने मूर्ख बनायला तयार होणे हे आजचे न्यू नॉर्मल तर नाही ना झाले आहे.
विधिमंडळाचा आदर, आदर्श, आत्मसन्मान लोकप्रतिनिधींनी टिकवणे अनिवार्य आहे. त्या सभागृहाचे पावित्र्य अबाधित राखणे तसेच तिथे चुकूनही आपल्याकडून गैरवर्तन होणार नाही की ज्यामुळे या सभागृहाची मान शरमेने खाली झुकेल, याची दक्षता त्या सभागृहाचा सदस्य असणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने घेणे अत्यावश्यक आहे. काही अपवाद वगळता आजपर्यंतच्या बहुतांश सदस्यांकडून याची जाणीवपूर्वक काळजी घेतली गेली, परंतु नजीकच्या काळातील काहींना कुठे काय व कसे बोलायचे याचे भान राहिलेले नाही. सभागृहात चालणारी ही असभ्यता या सभागृहाची प्रतिष्ठा, प्रतिमा मलिन करत आहे.
डिस्ट्रक्शन ही आज राजकारणातली प्रभावी चाणाक्षनीती ठरत आहे. ‘वातावरण निर्मिती’ करून जनतेला एखाद्या मानसिकतेमध्ये कैद करून ठेवणे हा या मागचा उद्देश आहे. अशा गलिच्छ राजकारणामुळे समाजकारण बिघडत आहे. लोकांचे सत्य परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना भावनांच्या चक्रव्यूहात ओढले जात आहे. खैरातींच्या अर्थकारणामुळे अर्थव्यवस्था कमजोर झाली आहे. भ्रष्टाचाराने शासन, प्रशासन पोखरले गेले आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांची मेहनत मातीमोल भावाने विकली जात आहे. बेरोजगारी आणि महागाई दोघेही मिळून जगणे मुश्कील करत आहेत. निवडणुकीमध्ये दिलेले शब्द निवडून येताच फिरवले जात आहेत. अंगलट येऊ शकणाऱ्या या व अशा असंख्य विषयांपासून जनतेचे मन इतरत्र गुंतवण्यासाठी सत्ताधारी आपले आवडते जातीचे, भाषेचे, इतिहासाचे अस्त्र उपसताना दिसतात.
आज राजकीय पटलावर जे चाललं आहे ते सारंच काही रचलेलं, घडवलेलं, श्रृंगारलेलं असतं असे नाही. काही बातम्या या अशादेखील असतात जे यांच्या नजरेतून, तावडीतून निसटून लोकांसमोर जशास तशा प्रकटतात. पण मग अशा परिस्थितीत यांच्या 24 तास कार्यरत असणाऱ्या प्रचार यंत्रणा त्या त्यातील झोंबणाऱ्या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी त्यावर उतारा देणे सुरू करतात. विषयांतरासाठी फाटे फोडतात. त्यामुळे आज आपण जे ऐकतो, बघतो, समजतो ते वास्तवात तसे असेलच असे नाही. खऱ्याला खोटे, चुकीला बरोबर, असत्याला सत्य, अन्यायाला न्याय, अवैधतेला वैध भासविणारी ती एक कुटिल कलादेखील असू शकते. आजचे राजकारण समाजमनाला विषय खाऊ घालत आहे. समाजाने कोणत्या विषयाकडे लक्ष द्यावे वा देऊ नये, तो विषय कसा स्वीकारावा, त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे सारं काही आज काही पक्ष यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी जंग जंग पछाडत असतात. सोशल मीडिया हे त्यांचे ‘वॉर रूम’ झाले आहेत. त्यामुळे आपले मत आज आपले राहिलेले नाही. स्वातंत्र्य, स्वायत्तता मृगजळाप्रमाणे दिसत तर आहेत, परंतु भेटत मात्र नाहीत. ‘पॉलिटिकल नरेटिव्ह ऑफ डिस्ट्रक्शन’च्या सहाय्याने राजकारण खोल व व्यापक ढवळाढवळ करीत आहे आणि ते गंभीर तसेच घातक आहे.