ठसा – प्रिया मराठे

>> दिलीप ठाकूर

एखाद्या दिवसाची सुरुवात अतिशय धक्कादायक बातमीने होते. एक म्हणजे ती बातमी खरी नसून केवळ सोशल मीडियातील खुळचटपणा असावा असे म्हणतच त्याकडे दुर्लक्ष करावे असे वाटते, पण दुर्दैवाने ती बातमी खरी असते. 31 ऑगस्ट रोजी सकाळीच बातमी समजली की, मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. चित्रपट, मालिका व रंगभूमी या तीनही माध्यमांतून कार्यरत असलेला कलाकार असा अचानक आपल्यातून जातो, तोही तरुण वयात हे पचवणे अवघड असते पण ते वास्तव असते.

प्रिया मराठे गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. तिच्या निधनानंतर प्रिया मराठेची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली. प्रिया मराठेने 11 ऑगस्ट 2024 रोजी आपला नवरा शंतनू मोघेसोबतचे जयपूर ट्रिपचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करताना तिने “Awed by the hugeness and its intricacies”, असं कॅप्शन दिलं होतं.

प्रिया मराठेने ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. अखेरीस ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसली. याशिवाय ‘पवित्र रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बड़े अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही प्रिया मराठे घरोघरी पोहोचली. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत प्रिया मराठेने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या मुलीचे काम केले. प्रिया मराठेचा हा अभिनय कारकीर्दीचा सुरुवातीचा काळ होता, पण उषा नाडकर्णी यांच्याशी तिचे चांगलेच सूर जमले. प्रिया मराठेच्या निधनाचे वृत्त समजताच उषा नाडकर्णी सद्गदित झाल्या. प्रिया चटका लावून गेली अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोटय़ा पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर ‘तू तिथं मी’, ‘चार दिवस सासूचे’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत आपला चाहता वर्ग निर्माण केला. सडपातळ बांधा, हसरा चेहरा, बोलके डोळे आणि मनमिळाऊ स्वभाव ही प्रिया मराठेची वैशिष्टय़े. लहानपणापासून प्रिया मराठेने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणे कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़ स्पर्धा तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. बांदोडकर महाविद्यालयात असताना विजू माने दिग्दर्शित ‘ए फेअरी टेल’ या ग्रुप नाटकात तिने राजकन्येची भूमिका साकारत जणू पुढचे पाऊल टाकले. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने तिचा अभिनयाचा वेगळा प्रवास सुरू झाला. पुढे प्रथम वर्षाला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर यांचे त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.

मालिकांचा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला नकारात्मक स्वरूपाची भूमिका मिळाली आणि मिळालेल्या संधीत ती यशस्वी ठरली. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘संभाजी’ या तिच्या लोकप्रिय मालिका. ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरण’, ‘कसम से’ या हिंदी मालिकांमुळे ती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने भूमिका साकारल्या.

प्रिया मराठेने शेवटचे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते. मात्र आरोग्याच्या कारणामुळे तिने ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा तिने एका व्हिडीओद्वारे चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, आरोग्याची समस्या अचानक उद्भवल्यामुळे मालिकेच्या शूटिंग आणि आरोग्यात समतोल साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘मोनिका’ ही भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला असला तरी मला हा प्रवास इथेच थांबवावा लागत आहे. प्रिया मराठेने अतिशय उत्कटपणे आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या तरी सोशल मीडियातील अनेक वाह्यात जणांनी त्यावर प्रतिक्रिया देताना संयम सोडला होता. याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे असे प्रिया मराठेला वाटले.

2012 साली प्रिया मराठेने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघे याच्याशी लग्न केले. मराठी अभिनय क्षेत्रातील एक आदर्श जोडपे म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले. राजन बने लिखित व दिग्दर्शित ‘रानजाई’ या मराठी चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. लग्नानंतर काही वर्षांतच ते मीरा रोड येथे राहायला आले.

प्रिया मराठेने दोन वर्षांपूर्वी मुंबईतील मीरा रोड या ठिकाणी ‘द बॉम्बे फ्राईज’ या नावाचे स्वतःचं कॅफे सुरू केले होते. कलाकार म्हणून वलयांकित वातावरणात वावरूनही प्रिया मराठेने मध्यमवर्गीय संस्कार जपले हे विशेष उल्लेखनीय.