परीक्षण- आठवणींचे अलवार पदर

>> रुचिरा सावंत

गुरुदेव रवींद्रनाथ या नावाभोवतीचे एक विलक्षण वलय आहे. त्यांच्या साहित्यकृती, कविता, कादंबऱया, लेख, चित्रं, नाटकं, त्यांच्या साहित्यकृतीवर आधारित सिनेमे, त्यामधील नायिका आणि शांतिनिकेतन अशा अनेक माध्यमांतून ते आपल्याला माहीत आहेत. कुणासाठी राष्ट्रगीतातून, कुणाला गीतांजली या नोबेल पारितोषिक विजेत्या काव्यसंग्रहातून, तर कुणाला त्यांनी घडवलेल्या त्यांच्या शिष्यांच्या रूपात त्यांची आठवण होत राहते.

या अशा बहुआयामी, कर्तृत्ववान व्यक्तींबाबतीत एक गोष्ट जी कायम जाणवते ती अशी की, सामान्य माणसांना त्यांच्या विषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते खरी, पण बऱयाचदा त्यांच्या कर्तृत्वाच्या आढावा घेत असताना, त्याविषयी बोलत असताना पराक्रमाच्या व योगदानाच्या त्या चौकटीत माणूस अडकतो, भारावून जातो आणि या थोर माणसांना माणूस म्हणून समजून घेण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अधोरेखित करायचे राहून जातात.

असं म्हणतात की, कुणाला खऱया अर्थाने जाणून घ्यायचे असेल तर औपचारिक वातावरणात आलेल्या अनुभवांवरून कोणतेही निष्कर्ष काढू नयेत. त्या व्यक्तीसोबत अनौपचारिक वेळ घालवावा. अनौपचारिक भेटीगाठींमधून, गप्पांमधून माणूस आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर अलवार उलगडत जातात.

मैत्रेयीदेवी…गुरुदेव रवींद्रनाथांच्या शिष्या आणि स्वत साहित्य अकादमी विजेत्या एक उत्कृष्ट कवयित्री. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी त्याचं कवितेचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती दस्तखुद्द गुरुदेवांनी. रवींद्रनाथांचा दीर्घ स्नेह त्यांना लाभला. त्यांचे पती डॉ. सेन यांची कोलकाताजवळील मंग्पू येथे नियुक्ती झाल्यावर त्या आडवळणाच्या, निसर्गाने वेढलेल्या, गर्द वनराई असणाऱया, पायवाटांनी जंगलाशी जोडलेल्या गावी त्या मुक्कामी गेल्या. 1935 पासून आपल्या लाडक्या गुरुदेवांना त्या आपल्या या नव्या घरी मुक्कामी बोलवत राहिल्या. गुरुदेवांनीही हे आमंत्रण स्वीकारलं आणि शेवटी 1938 मध्ये पहिल्यांदा ते पाहुणे म्हणून मैत्रेयीदेवींकडे पोहोचले. तिथला निसर्ग, शांतता, मैत्रेयीदेवींचा आणि डॉ. सेन यांचा पाहुणचार या सगळ्या वातावरणात ते इतके छान रुळले की, त्या नंतर ते तिथे अनेकवार येत राहिले. अगदी 1940 पर्यंत. मैत्रेयीदेवींनी त्यांच्या या अनुभवांवर, तिथे घडलेल्या प्रसंगांवर ‘मंग्पूते रबीन्द्रनाथ’ हे पुस्तक लिहिलं. हे केवळ मैत्रेयीदेवींचे मंग्पूस्थित असताना त्यांच्या जीवन नाटय़ात घडलेल्या प्रसंगांचे दस्तावेजीकरण नाही. हे पुस्तक म्हणजे रवींद्रनाथांच्या नाना छटा असलेल्या स्वभावविशेषांचे अनोखे दर्शन आहे. ही एका आधुनिक महाकवीच्या माणूसपणाची आणि सहवासाची गोष्ट आहे. त्यांच्या साहित्यकृतीतून वाचकाना व त्यांच्या चाहत्यांना न भेटणारे पण मैत्रेयीदेवींना त्यांच्या घरात, अनौपचारिक प्रसंगांतून, नेहमीच्या सहज संवादातून भेटलेले गुरुदेव सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रांजळ प्रयत्न आहे.

गुरुदेव आपल्याला इथे वेगळ्या आणि अनेक अनपेक्षित रूपात भेटतात. त्यांची आणि मैत्रेयीदेवींची वय, सामाजिक स्थान, कर्तृत्व अशा अनेक मर्यादांपलीकडील मैत्री आपण अनुभवतो. ज्या अधिकारवाणीने आणि प्रेमाने ते दोघे एकमेकांना चिडवतात, खोडय़ा करतात, माया करतात तितक्याच हक्काने एकमेकांना ते रागावतात, फार सहजतेने ते एकमेकांजवळ मागण्या करतात. त्यांचं हे हृदय नातं आपल्यालाही स्तिमित करतं. ओघवत्या शैलीत मैत्रेयीदेवी त्यांच्या आठवणी लिहितात. अनेक हळुवार प्रसंग त्यातील गोडवा टिप कागदाने टिपावा असा अलगद टिपतात.

काय नाही या पुस्तकात. जीवनाचा भरभरून आनंद घेण्याचे तत्त्वज्ञान, जीवन जगण्याची एक वेगळी परिभाषा, मरणाकडे पाहण्याचा एक स्थितप्रज्ञ दृष्टिकोन, सत्य स्वीकारण्याची आणि त्याला समोरं जाण्याची तऱहा. यात रवींद्रनाथांच्या कविता आहेत. त्यांची पत्रं आहेत. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. माणसांवरील आणि निसर्गावरील त्यांचं प्रेम आहे. त्यांची विनोदबुद्धी आहे. त्यांनी प्रकाशित केलेली अनेक हृदयं आहेत. मैत्रेयीदेवींचं लेखन वाचताना जाणवलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे एक प्रांजळ कथन आहे. गुरुदेवांविषयी त्यांना असणारा आदर, जिव्हाळा आणि कृतज्ञता या लेखनात ठायी ठायी जाणवते. असं असलं तरी एका महापुरुषाची वेगळी बाजू दाखवत असताना, आपल्या गुरुदेवांविषयी लिहीत असतानाही त्याला व्यक्तिपूजेचा गंध नाही.

आधुनिक युगातील या सर्वश्रेष्ठ कवीनं त्यांच्या मंग्पू येथील निवासादरम्यान लिहिलेल्या कविता आणि पत्रं, काढलेली चित्रं, गायलेली गाणी, काढलेल्या खोडय़ा व केलेला आराम सहज आपल्यापर्यंत पोहोचतो. मला वाटतं आपण मैत्रेयीदेवींसोबत तो प्रवास करतो हे त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्टय़. विलास गीते या प्रतिष्ठित अनुवादकांनी हे पुस्तक मराठीमध्ये आणत असताना या पुस्तकातील या साऱया गोष्टी सांभाळल्या आहेत. आपण मैत्रेयीदेवींच्याच तोंडी सारं ऐकतो आहोत असं वाटत राहतं हे अनुवादकाचं श्रेय. वाल्डनने हे पुनर्प्रकाशित केलेलं पुस्तक फार देखणं झालं आहे. अगदी संग्रहात ठेवण्याजोगं. जरूर वाचावं असं.

थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे एक वाऱयाची अलवार झुळूक आहे. आठवणींचं मुरलेलं लोणचं आहे. पुरवून पुरवून वाचावं. त्याचा आनंद घ्यावा. त्यावर मनन आणि चिंतन करावं आणि पाहिजे तेव्हा त्या काळात रवींद्रनाथांच्या सहवासात एखादी चक्कर मारून यावी. अगदी निसंकोच.

रवीन्द्रनाथांच्या सहवासात

प्रकाशक ः वॉल्डन पब्लिकेशन, पुणे

लेखिका ः मैत्रेयीदेवी  अनुवाद ः विलास गिते

पृष्ठे ः 219  मूल्य ः रु.400/-

[email protected]