
>> मुबारक शेख
कथांमध्ये अनुभूतीच्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटलेले असते. त्यात विविध रूपांची, घटनांची एकसंध गुंफण असते. कथा म्हणजे एक निवेदन प्रधान वाड्मय प्रकार होय. कथा निव्वळ मनोरंजनच करतात असे नव्हे तर, मनावर संस्कारही घडवतात. काळ जसा बदलत गेला तशी कथाही बदलत गेली. माणसाचे जगणे, त्याचे प्रश्न आणि त्याला अपेक्षित असलेली उत्तरेही बदलत गेली. पण माणसांचे जगणे काही संपले नाही. काळ कितीही बदलला तरी माणूस आणि त्याचा भवताल कवेत घेऊन कथा वाचकांसमोर येत राहणे अपरिहार्य असते. आजच्या घडीचे नव्या दमाचे युवा कथाकार मयुरेश कुलकर्णी यांचा ‘धुमधडाका’ हा पहिला वहिला संग्रह कथावाड्मयात दाखल झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने त्यांना अनेकविध ठिकाणी वास्तव्य करावे लागले. त्या वास्तव्यात घडलेल्या काही वास्तववादी दारुण, करुण घटना तर काही वरवर हलक्या फुलक्या वाटणाऱया पण विनोदाची झालर असणाऱया काही गोष्टींचे मिश्रण करून छोटय़ा प्रसंगातून त्यांनी सत्तावीस कथा लिहिलेल्या आहेत. हा अनुभूतीतून फुटलेला कथांचा टवटवीत ताटवा आहे. त्यात इथल्या अस्सल ग्रामीण मातीच्या रसगंधाचा दरवळ आहे. समाज आणि कौटुंबिक जीवनातील अनुभव विश्वाचा मयुरेश कुलकर्णी यांनी सशक्त कथावस्तूंत अचूक वेध घेतला आहे. जे अनुभवविश्व त्यांच्या वाटय़ाला आले त्याचप्रमाणे काही कथा व्यक्तिरेखांच्या दैनंदिन जगण्यातील सुखदुःखांचा, भावभावनांचा नेमकेपणा, मोजकेपणा, प्रकृती समजून घेऊन त्याला त्यांनी सुलभतेने कथारूप दिले आहे.वादाची किनार असलेले मराठी साहित्य संमेलन वाचकांना नवे नाही. या पार्श्वभूमीवर लेखकाने जंगल साहित्य संमेलन या कथेतून प्राण्यांच्या संमेलनाची कथा काल्पनिक पातळीवर गंमतीशीरपणे मांडली आहे. साप कुठेही निघू दे लोकांना त्याची धास्ती वाटते. कोणताही विचार न करता लोक त्याला मारायला टपलेले असतात. त्यावेळी लोकांचा गोंधळ, त्यांची उडणारी त्रेधातिरपिट मनोरंजक असते. हा प्रसंगही लेखकाने ‘बापरे साप’ या कथेतून मजेशीरपणे सांगितला आहे. मयुरेश कुलकर्णी हे स्वत शिक्षक असल्याने त्यांना शाळेत दरवर्षी येणाऱया अनुभवाचे प्रकटीकरण त्यांनी झेंडावंदन, टिसी देता का? या कथांमधून प्रत्ययकारी पद्धतीने केले आहे. त्यांनी ग्रामीण ढंगाच्या काही कथाही लिहिलेल्या आहेत. ‘खर्डनी’, ‘बैलपोळा’ मधून आलेली गावखेडय़ातील बारीक सारीक वर्णने वाचकांना आपलेसे करून जातात. ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, सामाजिक अधपतनाचा रोखठोकपणे ‘धरमू’ या कथेतून समाचार घेतात. खुळचट रूढींना, चालीरीतींना, चव्हाटय़ावर मांडतात. व्यक्तीचित्रणाच्या कथाही प्रस्तूत संग्रहात वाचावयास मिळतात. शाममाळी, दुकानदार, मामा, दादा, राममास्तर, आदी कथांमधून व्यक्तिंचे गुण अवगुण प्रकट होत जातात. कुलकर्णी यांनी निरक्षरांचा सर्व्हे, माझा आदर्श, मृत्यूपर सांत्वन, सुपरफास्ट एक्सप्रेस या निखालस विनोदी ढंगाच्या कथा उपहासात्मक शैलीने रंगवून चांगले मनोरंजन साधले आहे. या कथा मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे वाटचाल करणाऱया आहेत. विचारप्रवृत्त करणाऱया आहेत.
धूमधडाका
लेखक ः मयूरेश कुलकर्णी प्रकाशक ः सकाळ प्रकाशन पुणे
पाने ः 146 किंमत ः 230 रुपये