आभाळमाया – ग्रहांची उलट गिरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

अवकाशात ‘स्वतंत्र’पणे फिरणाऱ्या ग्रहांविषयी माहिती रंजक, तशीच ते कधी पृथ्वीच्या दिशेने येतील की काय, या कल्पनेने धडकी भरवणारीही असते. आपल्या सौरसंकुलातले ग्रह मात्र तसे बऱ्याच शिस्तीत जनक तारा असलेल्या सूर्याभोवती फिरतात.त्यांची सपाटी (प्रतल) वेगवेगळी असली तरी त्यात फारसा फरक नाही. आपल्या सूर्यमालेतले सर्व ग्रह ‘क्लॉकवाइज’ म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ानुसार स्वतःभोवती फिरतात. त्यातला ‘ऑन्टिक्लॉक वाइज’ म्हणजे घडय़ाळ काटय़ांच्या उलट पद्धतीने स्वतःभोवती फिरणारा एकमेव ग्रह म्हणजे शुक्र. त्याचप्रमाणे नेपच्यूनचा उपग्रह किंवा चंद्र असलेला ‘ट्रायटन’सुद्धा शुक्रासारखाच स्वतःभोवती ‘ऑन्टिक्लॉकवाइज’ फिरतो.

शुक्र स्वतःभोवती ‘उलटा’ फिरतो म्हणजे काय, तर पृथ्वी आणि इतर ग्रहांची स्वतःभोवतीची गिरकी (परिवलन) पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. त्यामुळे आपल्याला सूर्योदय पूर्वेकडे दिसतो. शुक्र वगळता इतर सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे (स्वतःभोवती) फिरतात. त्यांचा या ‘रोटेशन’मुळे कोणत्याही ग्रहावर सूर्य पूर्वेलाच उगवणार. अपवाद एक शुक्राचा. तिथे सूर्योदय पश्चिमेला आणि सूर्यास्त पूर्वेला होतो. ‘आज काय सूर्य पश्चिमेला उगवला काय?’ असं तिरकसपणे शुक्रावरच्या (नसलेल्या) ‘माणसाला’ विचारलं तर तो म्हणेल, ‘हो! इथे असाच सूर्योदय होतो!’ अर्थात शुक्रावरच्या सल्फर कार्बनच्या घनदाट वातावरणामुळे तिथे जीवसृष्टी नाही. परंतु त्याचा अक्ष (ऑक्सिस) 178 अंशाच्या कोनात म्हणजे दक्षिण-उत्तर धुवांची पार उलटापालट झाल्याने त्यावर सूर्य पश्चिमेलाच उगवताना दिसणार. नेपच्युन ग्रहाचा अक्ष जवळपास 90 अंशांनी कललेला असल्याने तिथे एका भागात ऊन तर दुसऱ्या अर्ध्या भागात अंधारमय शीतलता जाणवणार.

या नेपच्युनचा ‘चंद्र’ असलेला ‘ट्रायटन’ मात्र शुक्रासारखाच ‘बंडखोर’ आहे. तो स्वतःभोवती उलटय़ा दिशेने फिरणारा, सौरमालेतला एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. शुक्र-ट्रायटनचा अपवाद वगळता आपल्या ग्रहमालेतील इतर ग्रह कसे शिस्तीत सूर्याभोवती भ्रमण करतात.

याउलट, काही ग्रहमालांमधले काही ग्रह त्यांच्या जनक ताऱ्याला जुमानत नाहीत. ते स्वतःभोवती ‘उलट’ गतीनेच फिरतात. अशा दोन ग्रहमाला सापडल्या आहेत. त्या म्हणजे डब्ल्यूएएसपी-17-बी आणि एचएटी-पी-76.

यापैकी वॉस्प-17-बी ग्रहमालेचं नाव ठेवण्यात आलं आहे ‘डिस्टो.’ हा एक परताराग्रहमालेतील एक मोठा ‘गुरू’सारखा वायुरूप ग्रह आहे. वृश्चिक तारकासमूहात तो आढळला. हा तारा वॉस्प-17 या ग्रहाभोवती फिरतो. त्याचा शोध 11 ऑगस्ट 2009 रोजी लागला. त्याच्या गुरूएवढय़ा ‘बी’ ग्रहाच्या उलट परिवलनाने अभ्यासकही चक्रावले. कारण या संशोधनामुळे एकूणच ग्रहमाला निर्मितीच्या पारंपरिक सिद्धांताला धक्का बसला. आपल्या शुक्राचं उलट परिवलन (अक्षाभोवती उलट गिरकी) हा एक अपवाद वाटत होता, पण ‘डिस्टो’ तर विशाल आकाराचा ‘उलट गिरकी’चा ग्रह निघाला. या ‘डिस्टो’चे वस्तुमान आपल्या ग्रहमालेतील सर्वात मोठय़ा (म्हणूनच गुरू) ग्रहाच्या निम्मं असलं तरी त्याचे आकारमान मात्र गुरूपेक्षा बरंच जास्त आहे. 3 डिसेंबर 2013 रोजी हबल दुर्बिणीने त्याचा तपशील पाठवला, त्यातून या ग्रहाच्या वातावरणात पाण्याचे अंश आढळले.

‘डिस्टो’चा शोध डेव्हिड अॅण्डरसन यांनी इंग्लंडमधल्या स्टॅटफर्डशरमध्ये लावला. हा प्रचंड ग्रह पृथ्वीपासून 1000 प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचं नाव परताराग्रहाच्या नामरण स्पर्धेतून आलं. ही स्पर्धा ‘इन्टरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन’ला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घेण्यात आली होती. या ‘डिस्टो’चा आकार गुरूच्या दीड ते दोन पट असला तरी त्याची घनता एका घनसेंटीमीटरला केवळ 0.19 ग्रॅम इतकीच आहे. आपल्या गुरू ग्रहाची घनता 1.3 तर पृथ्वीची साडेपाच (एका घन सेंटीमीटरमध्ये) आहे. हा उलट गिरकीचा ग्रहसुद्धा शुक्रासारखा अपवाद असेल असं वाटत असताना एचएटीपी-7 बी) या ताऱ्याचा शोध लागला. 2008 मध्ये हा गुरूपेक्षा मोठा असणारा आणि त्याच्या जनक ताऱ्याच्या जवळच्या कक्षेत फिरणारा ग्रह असल्याचं लक्षात आलं. उलट गिरकी घेणारा ‘डिस्टो’ हा एक वैशिष्टय़पूर्ण ग्रह, तर एएटी-झ्-7 बी किंवा केपलर 2 बी ताऱ्याभोवतीच्या या ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे तो काळाकुट्ट ग्रह आहे. कोणताही ग्रह परप्रकाशी असतो, त्याच्या जनक ताऱ्याकडून येणारा प्रकाश तो जितका जास्त परावर्तित करेल तितका तो स्पष्ट दिसतो हे आपल्याला ‘शुक्रा’च्या उदाहरणावरून कळतं. या परावर्तित प्रकाशाला खगोलीय भाषेत. ‘अल्बिडो’ असं म्हणतात. या केपलर-2-बी ग्रहाचं वैशिष्टय़ असं की त्याच्या जनक ताऱ्याकडून येणारा प्रकाश परावर्तित करण्याचं त्याचं प्रमाण केवळ 0.3 टक्के इतकेच आहे. याचं कारण असे की, त्या ताऱ्याचा 99 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकाश तो ‘शोषून’ घेतो!

हा ग्रह शोधला तो हॅट-7 या दुर्बिणीने, फ्रेड व्हिपल वेधशाळा आणि हवाईतील मौना-की येथील हॅट-8 या दुर्बिणीच्या सहयोगाने. 5 मार्च 2008 रोजी त्याचा शोध लागला. अशा अनेक अवकाशी वस्तूंच्या नावाची नोंदणी ज्या सांकेतिक पद्धतीने केली जाते ते क्रमांक सहज लक्षात राहणं कठीण. या प्रकाशशोषक ताऱ्याचा ग्रह आहे ‘केपलर-2-बी’ आणि ग्रहाचं नाव ‘केपलर-1.’

या नामजंजाळात न अडकता आपण एवढंच लक्षात ठेवूया की, विश्वातले सर्व ग्रह सारखे नाहीत. त्यांचे खगोलभौतिकी ‘स्वभाव’ विविध असू शकतात. नित्यनव्या संशोधनातून ते आपल्याला कळले की विश्वाच्या वैचित्र्यपूर्ण रचनेचीही जाणीव होते!