दुधावरची साय

>> संजीवनी धुरी-जाधव

आजी-आजोबा आणि नातवंडं… एक गोंडस, सायीचं नातं… नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की, ‘नातकंडांचा सांभाळ करणे ही आजी-आजोबांची जबाबदारी नसून ते मुलांच्या आई-वडिलांचे कर्तक्य आहे. आजी-आजोबांवर त्यासाठी दबाव टाकता येणार नाही. मुलांचा सांभाळ करायला आजी-आजोबा म्हणजे बेबीसीटर नाहीत.’ या शब्दांत न्यायालयाने एका याचिकाकर्त्या महिलेला सुनाकले. मुळात या सुंदर, संपन्न नात्यात कायद्याचे कामच काय… या निर्व्याज प्रेमाला कायद्याच्या चौकटीत बांधता येऊ शकेल का? जाणून घेऊया काही आजी-आजोबांची मत-मतांतरे…

ही तर तारेवरची कसरतच…
या प्रश्नाला दोन्ही बाजू आहेत. एक आनंद तर आहेच त्यात. त्या आनंदाला तोडच नाही. पण त्याचबरोबर लहान मुलाला मोठं करणं ही जबाबदारीही असते. कारण वाढत्या वयामुळे शारीरिक क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे नातवंडांसोबत खेळणे, त्यांची सगळ्य़ा प्रकारे काळजी घेणे ही एक जबाबदारी असल्याची जाणीव असते. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदाची तुलना कशाशीच करता येणार नाही. आम्ही नातवंडांमध्ये आमचं बालपण शोधत असतो. आपल्या मुलांना वाढवताना आम्हाला स्वतःकडे पाहायला वेळ देता आलेला नसतो, अनेक चुका झालेल्या असतात. त्या आता होऊ नये आपण आपल्या नातवंडांना वेळ द्यायला हवा ही जाणीव मनात असते. ही एक प्रकारची तारेवरची कसरतच असते. आजी आणि नातवंडं हे नाते कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसू शकत नाही. नातवंडांना आपण दुधावरची साय म्हणतो. त्यामुळे त्या सायीची जपणूक आजीकडून जेवढ्य़ा चांगल्या प्रकारे होईल तेवढी कोणाकडूनच होणार नाही. त्यामुळे कायद्याचा बडगा दाखवून किंवा कायद्याच्या चौकटीत हे नाते बसवता येते हे मान्यच नाही. ते एक आपुलकीचे, जिव्हाळ्य़ाचे नाते आहे. आजी-आजोबांना नातवंडं हा मोठा विरंगुळा असतो. त्यांच्यासोबत खेळण्यात, त्यांना वाढवण्यात त्या आपल्या बऱ्याच व्याधी विसरतात. पण त्याचबरोबर त्यांना पण थोडंसं आयुष्यात अनेक हौस करता आलेल्या नसतात. आपल्यासाठी काही करावे अशी त्यांचीही अपेक्षा असते. त्यामुळे मुलगा आणि सुनेने हे लक्षात घेतले तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही. त्यांनाही त्यांचा वेळ द्यायला पाहिजे. नातवंडांसाठी आजी-आजोबा केव्हाही हजर असतातच, पण त्याचबरोबर त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. नातू आजारी असताना आजी बाहेर जाऊ शकत नाही. मुलं ही घरातल्या सगळ्य़ांचीच जबाबदारी आहे असे मानले तर अनेक प्रश्न सुटतील. एकमेकांशी सामंजस्याने, सहकार्याने केलेला असतो. आजीचे नातवांशी असायला पाहिजे असेच नाते आहे. माझी सून मला नातवाची ‘सपोर्ट सिस्टिम’ म्हणते यातच सगळे काही आले.
– भावना कुलकर्णी, माहीम

नातवंडे हा विरंगुळा!
आई-वडिलांनी आतापर्यंत मुलांना काबाडकष्ट करून वाढवलंय. उतारवयात त्यांचे शरीर साथ देत नाही. अशावेळी नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांनी घ्यायलाच हवी असा काही नियम नाही. आजी-आजोबांसाठी त्यांची नातवंड ही विरंगुळा असतात. हे ठरवून झालेले नाते नसते. त्यांच्यासोबत आम्ही तहान-भूक विसरून जगत असतो. मुलांचा सांभाळ केला… आता नातवंडांचा सांभाळ करण्याची इच्छा तर खूप असते, पण जमत नाही. काही आजी-आजोबांना पुढचे आयुष्य आनंदात घालवावे असे वाटते, पण काहीजण नातवंडातच आनंद मानतात. हे प्रश्न कोर्टापर्यंतचे नाहीत. हे प्रश्न सामंजस्याने सुटू शकतील. परंतु नातवंडांनाही सांभाळलं पाहिजे अशी अपेक्षा जर मुलगा आणि सून करत असतील तर ते चुकीचे आहे. आता माझी नात ४ वर्षांची आहे. ती आमच्याकडे येऊन-जाऊन असते. दुसरा नातू लहान आहे, पण त्यालाही आमची ओढ आहे.
– सुधाकर भगत, जोगेश्वरी

जिवापेक्षा जास्त प्रेम
नातवंडांना सांभाळणं हा माझ्यासाठी आनंदच आहे. दुधापेक्षा दुधाची साय मऊ असते, तशीच मुलांपेक्षा नातवंडे जास्तच जवळची वाटतात. मुलांनी ती जबाबदारी आमच्यावर टाकू नये. आम्ही नातवंडांना आनंदाने सांभाळत असतो. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी आजी-आजोबांवर अविश्वास दाखवू नये. मुलं तुमची असली तरी नातवडं आमची असतात. जिवापेक्षा जास्त त्यांच्यावर प्रेम करत असतो. आजीलाही हक्क असतो नातवंडांना चुकल्यावर ओरडण्याचा, त्यांना प्रेमाने जेवू-खाऊ घालण्याचा, काहीतरी बनवून देण्याचा… त्यातच आनंद वाटतो त्यांना. नातवंडं घरात असली की घर भरलेलेच असते. त्यात आमचा वेळ जात असतो. या नातवंडांमध्ये एक वेगळे जग तयार झालेले असते. म्हणून वाटतं की, परस्पर सामंजस्य असेल तर अनेक प्रश्न सुटू शकतात. मला तीन नातवंडे आहेत. माझा तीन वर्षांचा नातू आहे. खूप समजूतदार. कधी बरं वाटत नसेल तर डोकंही चेपून देतो. आजी तू आराम कर बोलतो तेव्हा समाधान वाटतं.
– माणिक बेदरकर, बदलापूर.

नाते आपुलकीचे
कोर्टाचा निर्णय नक्कीच बरोबर आहे. नातवंडे सांभाळणे ही आजी-आजोबांची जबाबदारी नाहीच. मुलांचे संगोपन केल्यानंतर नातवंडांचा सांभाळ करण्याची अपेक्षा मुलांनी ठेवूच नये. हे आजी-आजोबा आणि नातवंडे हे नाते प्रेमाचे, जिव्हाळय़ाचे आणि आपुलकीचे आहे. यात जबाबदारी हा विषय येतच नाही. मुलांना सांभाळणे आई-वडिलांचेच कर्तव्य आहे, पण नातवंडांना आम्ही आनंदाने सांभाळत असतो. त्यांच्या छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींत आनंद शोधत असतो. त्यांच्यासोबत सगळ्य़ा वेदना विसरून जातो. मुळात त्यांच्या असण्याने आमचे अस्तित्व आहे.
– विठ्ठल मयेकर, नालासोपारा

आपली प्रतिक्रिया द्या