
>> साधना गोरे
नवऱ्याची बहीण असो नाहीतर दिराची बायको किंवा भावाची बायको, या सगळ्या नात्यांना इंग्रजीत एकाच नावानं संबोधलं जातं. ते म्हणजे सिस्टर-इन-लॉ. मराठीत आणि अनेक भारतीय भाषांमध्ये या नात्यांना वेगवेगळी नावं आहेत. नवऱ्याची बहीण म्हणजे नणंद, दिराची बायको जाऊ आणि भावाची बायको म्हणजे भावजय.
मराठीत नणंद आणि भावजय या नात्यात एकमेकींना संबोधताना ‘वहिनी’ हाच शब्द वापरला जातो. यातल्या वहिनी शब्दाकडे मग जाऊ. आधी नणंद-भावजय शब्द समजून घेऊ. भावाची बायको ती भावजय हा सरळ अर्थ आहे. पण नणंदेचं तसं नाही. हा ‘नणंद’ शब्द उत्तर भारतातल्या पंजाबी, सिंधी, गुजराती, हिंदी, बंगाली, आसामी या भाषांमध्ये वेगवेगळ्य़ा रूपांत आहे. पण कानडीत नणंदेला ‘नादिनी’, मल्याळीमध्ये ‘नात्तून’ आणि तमीळमध्ये ‘नात्तनार्’, ‘नात्ति’, ‘नात्तु’, ‘नात्तूण्’ असे विविध शब्द आहेत. याविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘नणंद शब्द संस्कृतमधील ‘ननांदृ’पासून निघतो खरा; परंतु हा शब्द संस्कृत नसून परकीय असावा. कारण, द्राविडी आणि उत्तर भारतीय भाषांमधील शब्दांच्या रूपांत व अर्थात साम्य आहे.’
लोकानुभव आणि लोकगीतांमधील भावजय आणि नणंद या नात्याचा विचार केला तर ते क्वचितच आनंदी दिसतं. संस्कृत ‘नन्द’ शब्दाचा अर्थ प्रसन्नता, सुख, समृद्धी, संतोष असा आहे. काही शब्दकोशकारांच्या मते, ‘नणंद’ शब्द याच संस्कृत नंदपासून आला. ननंद किंवा नणंद म्हणजे आनंद घेऊ न देणारी, असं म्हणता येईल. समस्त नणंदवर्ग या अर्थामुळे हिरमुसण्याची शक्यता असली तरी नणंदेलाही कुणीतरी नणंद असते, यात आनंद मानायला हरकत नाही! यादृष्टीने तमीळमधील ‘नात्ति’ शब्दाचा अर्थही विचार करण्याजोगा आहे. नात्ति शब्दाचा एक अर्थ नणंद आहे; तसा अभाव, नाश असाही दुसरा अर्थ आहे. म्हणजे नणंद शब्द संस्कृत, द्राविडी किंवा आणखी कुठल्या तिसऱ्या भाषेतून आलेला असला तरी तो काही आनंद देत नाही, एवढं मात्र खरं!
मोठय़ा भावाच्या बायकोसाठी म्हणजे भावजयीसाठी आजही सर्रास वापरलं जाणारं संबोधन म्हणजे वहिनी. कृ.पां. कुलकर्णी या शब्दाचा विकास वधू-वहू-वहुण्णी-वहिनी या क्रमाने सांगतात. या वहिनी संबोधनाचं एक रूप म्हणजे ‘वन्स’ किंवा ‘वन्से’, ज्याचा वापर अलीकडे क्वचित कानावर पडतो. ‘वन्स’ हे संबोधन आताआतापर्यंत खास नणंदेसाठी वापरलं जाई. महाराष्ट्रातील बहुजन समाजामध्ये पूर्वापारपासून मोठय़ा भावाची बायको आणि नणंद म्हणजे नवऱ्याची बहीण या दोन्ही नात्यांसाठी ‘वहिनी’ हे एकच संबोधन वापरलं जाताना दिसतं. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मते, बहिणीसारखी या अर्थाच्या संस्कृत शब्दातून – भगिनीसदृशा- बहिणीसा-वइनिसा- या क्रमाने वन्स शब्द विकसित झाला. ‘वहिनी’ शब्दातही हा भगिनीसदृश अर्थ असल्याचे कुलकर्णी म्हणतात.
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः माणदेशात आत्याच्या मुलीला संबोधण्यासाठी ‘व्हंजी’ संबोधन वापरलं जाई. या अर्थातही वहिनीची अर्थछटा दिसते. वहिनीचं लघुरूप ‘व्हं’ करून त्याला पुढे आदरार्थी ‘जी’ प्रत्यय जोडला आहे. मोठय़ा बहिणीच्या नवऱ्यासाठी, मोठय़ा दिरासाठी वापरली जाणारी दाजी, भावजी/भावोजी ही संबोधनंही भावासाठी वापरल्या जाणाऱ्या दादा, भाऊ या संबोधनातून तयार झालेली आहेत. आणि ‘व्हंजी’प्रमाणे या संबोधनांनाही ‘जी’ हा आदरार्थी प्रत्यय लावला जातो. अहिराणी भाषेतही वहिनीला वंजी म्हटलं जातं.
‘नणंद आणि कळीचा आनंद’; ‘नणंद भावजया दोघीजणी – शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी?’; ‘बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासाने दही-दूध नासे’; ‘उतरंडीला नसावी केळी आणि घरात नसावी नणंद खेळी’; ‘सासू नाही घरी आणि नणंद जाच करी’; ‘नणंद खेळी रहाटाची फळी’ यांसारख्या म्हणींतून नणंद-भावजय नात्यातील ताण, संघर्ष याची अधिक कल्पना येते. ‘नणंदुल्याच्या कणंदुल्या जाचू नको मला, तू जाशील परघरा तर माझीच गत येईल तुला’ यासारख्या स्त्राrगीतात नणंद-भावजय नात्याची जगरहाटीही सांगितली आहे.
पूर्वी बऱ्याच घरांमध्ये नणंदेला दिवाणसा किंवा दिवाणसाहेब असंही म्हटलं जाई. ‘दिवाण’ हा मूळ फारसी शब्द, नंतर तो अरबीतही स्वीकारला गेला. दिवाण किंवा दिवाणजी म्हणजे प्रांताचा किंवा राज्याचा कर गोळा करून सरकारात भरणारा अधिकारी. दिवाणा/दिवाना हा आणखी एक फारसी शब्द. त्याचा अर्थ वेडा, पिसाटलेला, मूर्ख असा होतो. गमतीची गोष्ट म्हणजे, दाते-कर्वे शब्दकोशात या दिवाण म्हणजे मूर्ख या अर्थापुढे ‘दिवाणसाहेब म्हणजे नणंद-नवऱ्याची बहीण’, असा अर्थ दिला आहे. यातला मथितार्थ सुजाण ओळखतीलच.
 
             
		



































 
     
    



















