आभाळमाया – जिथे सौरशक्ती थबकते!

>> वैश्विक 

ऑक्टोबर सुरू झाला आहे. हा महिना आपल्याकडे ऑक्टोबर ‘हीट’साठी ठाऊक असतो. पावसाळ्याचे तुलनेने शीतल दिवस संपत आले की, उन्हाचे चटके पुन्हा जाणवायला लागतात. सूर्य दक्षिण गोलार्धाकडे गेला असला तरी या उन्हाचा त्रास का होतो याचीही कारणं आहेतच.

या लेखात मात्र आपल्याला जगवणाऱ्या सौरशक्तीविषयी थोडंसं वेगळं. पृथ्वी सूर्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने येणारे सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत यायला सुमारे सवाआठ मिनिटं लागतात हेसुद्धा आपण जाणतो. याचाच अर्थ सूर्योदय आपल्याला दिसतो त्याच्या सवाआठ मिनिटांपूर्वी तो झालेला असतो.

आपल्या ग्रहमालेतील ग्रहांवर सूर्योदय वेगवेगळ्या वेळी होतो. त्याचे गणित काय नंतर ते पुढच्या लेखात जाणून घेऊ. कारण या ग्रहांची सूर्यापासूनची अंतरे किती यावर तो मनोरंजक हिशेब अवलंबून आहे. मात्र सौरशक्ती किती दूरवर जाऊ शकते? ग्रहमालेपलीकडे सूर्यप्रकाश आणि सौरप्रारणं कुठपर्यंत पोहोचतात? सूर्याचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नॅटीक फिल्ड) कुठंवर प्रभाव पाडते.

या प्रश्नांची सोप्या भाषेतील उत्तरेसुद्धा बरेच काही शिकवून जातात. रोज उगवणाऱ्या नि मावळणाऱ्या सूर्यावर आपलं जीवनचक्र चालत असलं तरी त्याचा विचार आपण क्वचितच करतो. आज यावर थोडासा ‘प्रकाश’ टाकण्याचा प्रयत्न करू या. सौरवारे आणि सूर्याचे भारीत कण अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करून जिथे आपल्या आकाशगंगेमधल्या आंतरतारकीय माध्यमाशी टक्करतात त्या ठिकाणी त्यांना थबकावं लागतं, त्याला ‘हेलिओपॉज’ असं म्हणतात.

ग्रीक भाषेत ‘हेलिऑस’ म्हणजे सूर्य. त्याच्या ‘सुदूर’ प्रभावांच्या प्रवासाचं थकबणं याचा अर्थ हेलिओपॉज. तीच आपल्या सूर्यशक्तीची सीमारेषा असं मानायला हरकत नाही. या सौर सीमारेषेवर किंवा हेलिओस्फिअरच्या परिघावर सौरवाऱ्यांमुळे बुडबुडय़ांसारखी (बबल-लाइफ) स्थिती निर्माण होते.

या ठिकाणी होतं असं की, आपल्या सौरमालेत अत्यंत शक्तिशाली असणारे सौरवारे (सोलर विन्ड) क्षीण होत जातात. त्याच वेळी आंतरतारकीय माध्यमात (म्हणजे दोन ताऱ्यांच्या मधल्या भागात) निर्माण झालेले ‘वारे’ अधिक प्रभावी ठरून सौरवाऱ्यांना रोखतात. साहजिकच सौरवाऱ्यांना थबकणं (पॉज) भाग पडतं.

हे सर्व नेमके कुठे म्हणजे सूर्यापासून किती अंतरावर घडते, तर सूर्य-पृथ्वी अंतराच्या 120 पट अंतरावर सौरवारे आणि आंतरतारकीय माध्यमाची टक्कर होते. साध्या हिशेबाने ही संख्या 1800 कोटी किलोमीटर (1 अब्ज 800 कोटी) एवढी भरते.

एखाद्या ताऱ्याची शक्ती त्यातील वस्तुमानावर अवलंबून असते. त्यानुसार त्यावरील घडामोडी (ऑक्टिव्हिटी) ठरतात. सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 3 लाख 33 हजार पट इतके आहे. त्यामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बराच मोठा आहे. तो 1 लाख प्रकाशवर्षापर्यंत पोहोचतो. दुसऱ्या शब्दात तो अडीच प्रकाशवर्षे अंतरापर्यंत विस्तारलेला आहे. त्यातुलनेत सौरवाऱ्यांचा विस्तार बराच कमी वाटेल. म्हणूनच इथंपर्यंतचा सूर्यशक्तीचा प्रभाव संपूर्णपणे संपलेला नसतो, तर केवळ सौरवाऱ्यांच्या बाबतीत थबकलेला जाणवतो.

हे आपल्याला कधी कळलं? व्हॉएजर – 1 आणि 2 या यानांची केलेली आश्चर्यकारक भ्रमंती अजूनही सुरूच आहे. 48 वर्षे उलटली तरी ही याने कार्यरत असून त्यांनी अनुक्रमे 2012 आणि 18 मध्ये सौरवाऱ्यांच्या क्षेत्राची मर्यादा ओलांडली. त्या वेळी त्यांना अचानक सौर प्लाज्मा डेन्सिटी म्हणजे प्लाज्मा घनतेमध्ये वाढ दिसून आली. तिथे त्यांची तारकीय कॉस्मिक किरणांशी (गॅलॅक्टिक कॉस्मिक) गाठ पडली. त्यावरून ही दोन्ही याने आता आंतरतारकीय अवकाशात प्रवेशल्याचे निश्चित झाले.

आता सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव या ‘पॉज’च्या कितीतरी पुढे पसरला आहे. सौरमालेकडे येणाऱ्या सर्व धूमकेतूचे उगमस्थान असणाऱ्या आणि ‘उर्ट’ या शास्त्र्ाज्ञाने शोधलेल्या धूमकेतू ढगांचे अंतर 1 लाख खगोलीय एकक इतके आहे. एक खगोलीय एकक (युनिट) आहे. 15 कोटी किलोमीटरचं म्हणजे ‘उर्ट क्लाऊड’ असं आपल्यापासून 15 लाख किलोमीटर किंवा दीड अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. तिथे ‘जन्मलेले’ धूमकेतू सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याकडे येत असतात. ‘हॅली’च्या धूमकेतूची चर्चा विसाव्या शतकात खूप झाली, परंतु इतर अनेक धूमकेतू त्यानंतर येऊन गेले. त्यात ‘ह्याकुताके’ आणि ‘हेलबॉप’सारखे प्रेक्षणीय धूमकेतूही होते. आता धूमकेतूचं अंतरंगही आपल्याला समजलं असून अनेक गैरसमजुती दूर झाल्या आहेत.

सूर्य नावाच्या आपल्या जनक ताऱ्याची एकूण कथा खूपच मोठी आहे. सोलर – पॉज हा त्यातला एक भाग. ‘हेलिओपॉज’पासूनही ‘उर्ट क्लाऊड’चं अंतर प्रचंड आहे. हा पॉज 1800 एयू (ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट = 15 कोटी गुणिले 1800) एवढय़ा जवळच्या अंतरावर असतो. ‘उर्ट क्लाऊड’बद्दल सविस्तर नंतर एखाद्या लेखात वाचू या.