आभाळमाया – अवकाशातील साप, विंचू आणि…

<<< वैश्विक >>>

‘थिअरी’चा काळ याच लेखात आपण पावसाळी दिवसात थेट अवकाशदर्शन शक्य नसल्याने थोडी सैद्धांतिक माहिती घेत राहू या असं म्हटलं होतं. आता सैद्धांतिक वगैरे शब्द वापरले की, उगाच विचकायला होतं. तसं खरं तर काहीच कारण नाही. कोणत्याही गोष्टीच्या सखोल अभ्यासाचा प्रयत्न ‘सिद्धांता’कडे नेतो. वैज्ञानिक भाषेत मांडताना त्यात क्लिष्टता येऊ शकते हे खरं, पण सोप्या पद्धतीनेही अनेक गोष्टींचे ‘सिद्धांत’ समजून घेता येतात. साधं, सोपं उदाहरण फोडणीचं समजा असं म्हटलं की, पातेलं किंवा टोपात ठरावीक तेल ओतून त्याच्या उत्कलनबिंदूचा अंदाज घेत राई किंवा मोहरी आणि हिंग, जिरं, मिरच्या वगैरे अमूक प्रमाणात घालून ते मिश्रण जळणार नाही याची काळजी घेणं म्हणजे रुचकर फोडणी! आता कुणी म्हणेल, घराघरात हे सैद्धांतिक तत्त्वज्ञान ठाऊक नसतानाही सुयोग्य पद्धतीने रोजच वापरलं जातंच की. तेही खरंच आहे. आपण नकळत सरावाने अनेक विज्ञानाधिष्ठत गोष्टी सहजतेने करत असतो. मात्र त्यामागचं विज्ञान कालांतराने कळलं तरी ज्ञानात भर पडते आणि घटनांमागचं सूत्र किंवा कार्यकारण लक्षात येते.

अवकाशातील प्राणिमात्रांविषयीच्या कल्पना, अंदाज आणि त्यानंतर त्यांच्या वैज्ञानिक सत्याचा विचार असा प्रवास खगोल अभ्यासातही असतो. मृग नक्षत्राच्या ‘मनोहारी’ आकाराविषयी वाचताना ते सर्व तारे एकाच ‘हरीण’ किंवा ‘ओरायन’ आकारासाठी कुणी निर्माण केलेले नाहीत, तर आपल्याला ते तसे भासतात याचे ज्ञान आणि तसे का भासतात यामागची जिज्ञासा वैज्ञानिक विचारांना चालना देते. आपण विज्ञानाचा क्षणोक्षणी वापर करून आपल्या नैमित्तिक गरजा भागवतो, परंतु विज्ञानाचा विचार अभावानेच करतो. तो केला तर आणि उगवत्या पिढीत रुजवला तर अधिक संशोधक निर्माण होऊ शकतात.

यासाठी अभ्यासाची सुरुवात ‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो’ अशा बालगीतांपासूनच होते. त्यातून सूर्य-चंद्र-चांदण्यांकडे बाळमनाचं लक्ष वेधण्यात येते एवढंच लक्षात घ्यायचं. विश्वनिर्मितीचं अत्याधुनिक विज्ञान, जिज्ञासा वाढत गेल्यावर कालांतराने कळतंच, पण मुळात ज्याचा सखोल अभ्यास करायचा त्याचा प्राथमिक विचार तर मनात रुजायला हवा. अवकाशातील प्राणीजगत असं कुतूहल निश्चितच निर्माण करतं.

किती किती प्रकारचे ‘प्राणी’ आपल्याला अवकाशात दिसतात? माणसांपासून सुरुवात केली तर कन्या, मिथुन (जोडपं), शिकारी, देवयानी, ययाती, शर्मिष्ठा, वृषपर्वा, अरुंधती केश, सप्तर्षी, हस्त (हाताचा पंजा), यम, शिल्पकार हे अवकाशीय तारकासमूहांचे आकार माणसाशी संबंधित आहेत. त्यांचीच मराठी नावाच्या क्रमाने इंग्लिश नावं लक्षात ठेवली तर आधुनिक अभ्यासाच्या दृष्टीने सोपं जाईल. ही नावं अशी. कन्यापासून सुरुवात केली तर कन्या म्हणजे व्हर्गो. आता पुढचा क्रम जेमिनी, ओरायन, अ‍ॅन्ड्रोमीडा, पर्सियस, पॅसिओपिया, सिफिअस, कोमा बोरिऑलिस, सप्तर्षी म्हणजे अर्सा मेजर, हस्त म्हणजे कॉर्व्हस. पुढे इंडस व स्कल्प्टर आणि शौरी म्हणजे हर्क्युलस.

आता लेखाच्या शीर्षकानुसार इतर अवकाशीय प्राणी आकार. लघु सिंह (लिओ मायनर), कपोत (अ‍ॅपस), गरुड (ऑक्विला), मेष (एरिस), करभ (कॅमॅलोपॅर्डेलिस-जिराफ), कर्प (खेकडा-कॅन्सर), मकर (कॅपिकॉनस), नरतुरंग (अर्धा माणूस आणि अश्व-सेन्टॉरस), वायुभक्ष (कॅमॅलिअन), कर्कोटक (सर्सिनस), पाल (लॅसर्ट), हंस (सिग्नस), गवय म्हणजे रानमांजर किंवा लिंक्स, कालेय (ड्रको-नाग), वासुकी (हायड्रा-नाग), सिंह (लिओ), शशक (लेपस), वृक (ल्युपस), शृंगाश्व (मोनोसेरस), मक्षिका (मस्का), भुजंगधारी (ऑफियुकस), मृग (ओरायन), मयुर (पॅव्हो), बक (ग्रस), अश्वमुख (अ‍ॅक्वेलस), महाश्व (पेगॅसस), जटायू (फिनिक्स), मीन (पायसेस), दक्षिण मत्स्य (पायसस ऑस्ट्रिनस), वृश्चिक (विंचू- स्कॉर्पिअस), भुजंग (सर्पेन्टस), वृषभ (टॉरस), कारण्डव (प्युकाना), जंबुक (अस्वल-व्हप्लेक्युला), सारथी (ऑटिगा), असेंदष्ट्र (ड्रको-सर्प).

यातून काही अवकाशीय प्राणी निसटले असण्याचीही शक्यता आहे. केवळ प्राणीमात्रच नव्हे तर अवकाशात काही वस्तूसुद्धा आहेत! होकायंत्र म्हणजे पायक्सीस, नौकातल (कॅरिना), चषक (क्रेटर), तूळ (तराजू-लिब्रा), नौका (प्युपिस), ढाल (स्कटम), कुंभ (अ‍ॅक्वेरिअस), स्वरमंडळ (लायरा), अष्टक (ऑक्टेन्स-अष्टकोन), चित्रफलक (पिक्टर), जालक (रेक्टिक्युलम-सुबक जाळं-नेट), नौशीर्ष (व्हेनेल्य) आणि ज्यामुळे आधुनिक खगोलशास्त्राच्या अभ्यासाला विलक्षण गती आली, जी वस्तू गॅलिलिओ यांनी प्रथम अवकाशाकडे रोखली आणि आता हबल, चंद्रा यानंतर जेम्स वेब नावाची गोष्ट अवकाशाचे सखोल अंतरंग क्षणोक्षणी उलगडत आहे ती म्हणजे ‘दुर्बिण’सुद्धा एक अवकाशीय तारकासमूहाचं नाव आहे. दक्षिण आकाशात हा लंबचौकटीच्या आकारातील छोटा तारखासमूह असून फ्रेंच खगोल संशोधक लुइस लॅकेल यांनी 12 तारकासमूहांना दिलेल्या नावांपैकी एक आहे. असा हा मनोरंजक सैद्धांतिक खगोल अभ्यास!

[email protected]