
<<< अक्षय शेलार >>>
जगभरात स्टँडअप कॉमेडीविषयी भन्नाट सादरीकरण होते. मनोरंजनाच्या या महत्त्वाच्या प्रयोगाविषयी कमी लिहिले, बोलले जाते. या क्षेत्राचा वेध घेताना भारतातील व जगभरातील कॉमेडियन्स, त्यांचे कार्यक्रम, सादरीकरण, त्यांची व्यापकता याबाबत माहिती देणारे सदर.
गेल्या दशकभरात भारतात स्टँड-अप कॉमेडीचा झालेला उदय ही केवळ एक कलात्मक घडामोड नाही, तर एक सांस्कृतिक क्रांतीच आहे. कॅफेच्या बेसमेंटमध्ये किंवा महाविद्यालयीन सभागृहांत काही कलाकारांनी मोजक्या प्रेक्षकांसमोर केलेल्या सुरुवातीच्या प्रयोगांपासून सुरुवात झालेली ही कला आज राष्ट्रीय पातळीवर स्थिरावली आहे. हाऊसफुल शो, खास ओटीटी स्पेशल्स, मोठ्या प्रमाणावर आयोजित होणारे कॉमेडी फेस्टिव्हल्स आणि या सगळ्याला जीव लावणारा तरुण प्रेक्षकवर्ग यामुळे स्टँड-अप हा प्रकार आज लोकप्रियतेच्या अशा टप्प्यावर पोहोचला आहे की, कॉमेडियनना मिळणारी प्रसिद्धी एकेकाळी केवळ चित्रपटताऱ्यांचीच मत्तेदारी होती याचे आश्चर्य वाटते.
मात्र स्टँड-अपचं महत्त्व फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित नाही. विनोद हे एक सामाजिक भाष्य असते. एखाद्या विनोदात सामावलेला राजकीय उपरोध, सामाजिक विसंगतीकडे लक्ष वेधणारी टिप्पणी किंवा स्वतच्या अस्तित्त्वाबद्दलची आत्मवंचना हे सगळं आजच्या काळात हेडलाइनपेक्षाही झपाट्यानं पसरतं आणि त्यामुळेच या प्रकारच्या कलेवर सातत्याने लक्ष ठेवणारा, तिच्या सौंदर्यशास्त्रावर, राजकारणावर, अंतर्विरोधांवर आणि परिणामांवर भाष्य करणारा स्वतंत्र स्तंभ असणं ही आताची निकड आहे, असे वाटते.
चित्रपट, नाटक किंवा साहित्य यांच्यावर दीर्घकाळापासून नियमित टीका लेखनाची परंपरा आहे, पण स्टँड-अप कॉमेडीवर सातत्यपूर्ण सखोल लेखन करण्याची ही जवळपास पहिलीच वेळ असावी. या विषयाचे हे ताजे, अनवट वळण या स्तंभाला वेगळेपण देणारं आहे. कारण स्टँड-अप केवळ मनोरंजन नसून आपल्या समाजाचं, काळाचं प्रतिबिंब आहे. या प्रतिबिंबाकडे टीकेच्या, अभ्यासाच्या नजरेनं पाहणं आणि त्यातून नवे प्रश्न विचारणं, हीच या स्तंभामागची मूळ प्रेरणा आहे.
झाकीर खान हा मागील दशकभरात भारतीय स्टँड-अप कॉमेडीच्या विश्वात समोर आलेला ताजा आवाज आहे. अगदी अलीकडेच अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन या भल्यामोठ्या मैदानावर त्याचा कार्यक्रम झाला, यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना करता येईल. त्याचा विनोद केवळ हसवणारा नसून तो त्याच्या आयुष्याचा, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचा आणि समाजाशी असलेल्या नात्याचा एक आत्मकथात्मक आरसा आहे. त्यामुळेच ‘पर्सनल इज युनिव्हर्सल’ या न्यायानं त्याच्या कथा प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.
झाकीरची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा डिलिव्हरी स्टाईल. हलक्या आवाजात जणू काही आपल्या जवळच्या मित्राला एखादं गुपित सांगतो आहे अशा पद्धतीने तो रंगमंचावर बोलतो. इतर अनेक कॉमेडियन्स रंगमंचावर आवाज उंचावून, अतिशयोक्तीवर भर देऊन हास्य मिळवतात. झाकीर मात्र उलट दिशेने जातो. त्याच्या हळुवार, थोड्या लाजऱ्या-थोड्या आत्मविश्वासपूर्ण शैलीतून हास्य उमलतं. त्याच्या बिट्समध्ये (एखाद्या संकल्पनेला धरून सादर केलेले, कमी-अधिक लांबीचे तुकडे) प्रेमभंग, अपयश, लहानशा गोष्टींमध्ये दडलेला अपमान किंवा दैनंदिन जीवनातील छोट्या शोकांतिका दिसतात. या सर्व गोष्टी तो ज्या रीतीने सांगतो, त्यामुळे त्यात प्रेक्षकांना स्वतचं प्रतिबिंब दिसतं.
झाकीरच्या भाषेत हिंदीचा बोलीस्वर, उर्दूचा लहेजा आणि थोडासा शेरोशायरीचा रंग आहे. त्यामुळे त्याचे जोक्स हे केवळ पंचलाइन्स राहत नाहीत, तर त्यात एक काव्यात्मक गोडवा निर्माण होतो. ‘हक से सिंगल’सारख्या स्पेशलमध्ये हे ठळकपणे जाणवते. त्याच्या सादरीकरणातून, गोष्टींमधून एक भावनिक ओळख तयार करतो.
भारतीय स्टँड-अपमध्ये झाकीरने एक नवीन प्रेक्षकवर्ग जोडला. छोटी शहरं, मध्यमवर्गीय घरं, पारंपरिक संस्कृतीत वाढलेली पिढी यांना वाटलं की हा आपल्याच सारखा तर आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील, महानगरीय संदर्भचौकटीतील विनोदांपेक्षा झाकीरचा हळुवार हिंदीतला विनोद त्यांना जवळचा वाटला. झाकीर खानच्या कॉमेडीतून हसवणं हे केवळ चतुराईतून नाही, तर असुरक्षिततेतूनही निर्माण करता येऊ शकतं, हे पदोपदी जाणवतं. स्वतच्या कमतरता उघड करणं, त्यावर विनोद करणं आणि प्रेक्षकांना त्यात सामील करून घेणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच झाकीरचं स्टँड-अप हे फक्त विनोदनिर्मितीपुरतं मर्यादित नाही, तर एका संपूर्ण पिढीचं भावनिक भाष्य ठरतं. झाकीर खानच्या कॉमेडीला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेबरोबरच त्याची चिकित्सा व टीका करावी असेही काही मुद्दे आहेत. उदाहरणार्थ, त्याच्या विनोदांमध्ये स्त्रियांविषयी रूढ समजुतींना खतपाणी घालणारी मांडणी दिसते. ‘सख्त लौंडा’ ही ओळख त्याच्या स्वतच्या अनुभवातून आलेली असली तरी त्यात अनेकदा स्त्रियांना एकसाची भूमिका दिली जाते. त्या एकतर पुरुषांना नाकारतात, त्यांचं जगणं अवघड बनवतात किंवा भावनिक ओझं तरी बनतात अशी प्रतिमा निर्माण होते. यामुळे त्याच्या कार्यक्रमांवर पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा ठपका जाणवतो व क्वचित स्त्रीद्वेष्टेपणाची छापही दिसते.
तसेच त्याच्या सेटमध्ये कधी कधी वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबावर आधारित किस्स्यांमध्ये अतिरेकी भावुकतेचा अंश आहे. काही प्रेक्षकांना ही शैली जवळची नि आपलीशी वाटत असली तरी प्रत्यक्षात ती ‘मॅनिप्युलेटिव्ह’ आहे. कारण त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातील फोलपणा आणि नकारात्मक बाजू झाकोळल्या जातात. मात्र झाकीरची कॉमेडी त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीची आणि भारतातील मध्यमवर्गीय पुरुष अनुभवांची प्रामाणिक झलक आहे, हे तथ्य नाकारता येत नाही. त्यातल्या उणिवा समाजाच्या उणिवाच आहेत, ज्या तो विनोदाच्या चष्म्यातून दाखवतो.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)