भाषा सरस्वती- नवविचारांची धारदार लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धीरज कुलकर्ण़ी

[email protected]

उडिया लेखिका प्रतिभा रे यांचे लेखन म्हणजे अस्वस्थतेतून उमटणारी लेखणी, जी स्त्रीच्या मनाचे असंख्य पदर उलगडून दाखवते, तर कधी समाजशीलनाचे, वर्णभेदाचे ढोंग उघड करते. व्यवस्थेतील विषमता, अन्याय यांच्याविरोधात लढणाऱया या धारदार लेखणीला साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरविले आहे. साहित्यातून समाजाला उमेद देणाऱया, नवविचार देणाऱया प्रतिभा रे यांच्या साहित्याचा हा परिचय.

महाभारत या महाकाव्याने आजवर अनेक लेखकांना मोहित केले. अनेकांनी आपापल्या परीने त्याच्यातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला,  पण खरे महाभारत तर द्रौपदीचे होते. या सर्व घडामोडीत तिच्या मनाचं काय झालं असेल, पुरुषप्रधान व्यवस्थेत ती किती अग्निदिव्यांना सामोरी गेली याबद्दल कमी लोकांनी लिहिलं आहे. 1985 साली उडिया लेखिका प्रतिभा रे यांनी लिहिलेली ‘याज्ञसेना’ ही कादंबरी द्रौपदीच्या भावावस्थेचे चित्रण करते. साध्या सोप्या शब्दांत तरीही अत्यंत ताकदवान पद्धतीने प्रतिभा यांनी ही कथा सांगितली आहे. या कादंबरीत द्रौपदी कृष्णाला पत्र लिहून आपलं मन मोकळे करते आहे. कादंबरीची भाषा प्रवाही आणि काव्यात्म गद्य असलेली अशी सुरेख आहे.

स्त्राrच्या मनाचे असंख्य पदर उलगडून दाखवणाऱया या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले, तिची भाषांतरे झाली. प्रतिभा रे मात्र यावरच शांत न बसता अधिक लिहीत राहिल्या. कारण त्यांचा उद्देश केवळ कलाकृती लिहिणे नव्हता, तर या संपूर्ण व्यवस्थेतील विषमता, अन्याय यांच्याविरोधात सातत्याने आवाज उठवत राहणे त्यांना अगत्याचे वाटले. जगन्नाथ पुरीतील मंदिरात वर्णभेद, जातीभेद होतोय हे लक्षात येताच `धर्माचा रंग काळा’ हा जळजळीत लेख लिहिला. त्याचा परिणाम म्हणजे पुरीतील मंदिर ट्रस्टने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला, पण बाई डगमगली नाही, मागे हटली नाही. तिने आपला लढा सुरूच ठेवला.

प्रतिभा रे यांचा जन्म ओडिशातील एका खेडय़ात 1943 साली झाला. शिक्षणक्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी लेखनाला सुरुवात केली. लघुकथा आणि कादंबरी हा त्यांचा लेखनाचा पैस. पहाडी आदिवासींवर त्यांनी पीएच.डी. प्रबंध केला. प्राथमिक शिक्षिका म्हणून कारकीर्द सुरू करून महाविद्यालयात पीएच.डी. मार्गदर्शक पदावरून त्या निवृत्त झाल्या. प्रतिभा रे सामाजिक जीवनात अतिशय सािढय असल्याने अनेक संस्थांशी त्या संबंधित आहेत. रेड ाढा@स सोसायटी, केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड, नॅशनल बुक ट्रस्ट, भारत आंतरराष्ट्रीय केंद्र असा त्यांच्या कामाचा व्यापक पसारा आहे. 1974 साली त्यांनी लिहिलेल्या `वर्षा वसंत वैशाख’ या पहिल्याच कादंबरीने त्या लोकप्रिय झाल्या. त्यानंतर ‘अरण्य’, ‘निषिद्ध’ पृथ्वी’, ‘परिचय’, ‘मेघमेदूर’, ‘याज्ञसेनी’, ‘शिलापद्म’ अशा अनेक कादंबऱया व लघुकथा संग्रह त्यांनी लिहिले. या साहित्यकृतींना अनेक मानसन्मान लाभले, अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित झाल्या. मात्र प्रतिभा यांचा मूळ पिंड हा समाधानी राहण्याचा नाही. त्या सतत कामात मग्न असतात आणि समाजातील विषमता, स्त्रियांना मिळणारी वागणूक याविषयी आवाज उठवत राहतात. प्रसंगी यासाठी मोजावी लागणारी किंमतही त्यांनी दिली आहे.

प्रतिभा रे यांच्या अशाच अस्वस्थ व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू म्हणजे प्रवास. कामाच्या तसेच लेखनाच्या निमित्ताने त्यांनी देशविदेशात प्रचंड प्रवास केला आहे. हा प्रवास फक्त प्रेक्षणीय स्थळे बघण्यापुरता नव्हता तर जगभरातील लोकजीवन, स्त्राrजीवन यांचा त्यांनी अभ्यास केला. हा सारा प्रवास त्यांनी वेगवेगळ्या प्रवासवर्णनांमधून वाचकांसमोर मांडला. ही प्रवासवर्णने उडिया साहित्यात मोठा दस्तऐवज मानला जातो.

ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कार 1985, केंद्रीय साहित्य अकादमी 2000, पद्मश्री 2007, ज्ञानपीठ 2011, पद्मभूषण 2022 हे प्रमुख पुरस्कार त्यांना लाभले आहेत. साहित्यकृतींना मिळालेले पुरस्कार तर असंख्य आहेत. सर्वार्थाने संपन्न, समृद्ध आयुष्य जगलेल्या प्रतिभा रे या समग्र जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. व्यक्तीचे जीवन हे स्वार्थात संकुचित न राहता त्याला सामाजिक आयाम असायला हवेत हे त्यांचे मत आहे. काळ जसजसा पुढे जातो आहे, तसतसे जुन्या रूढीपरंपरा मोडून नव्या जगाचे समाजाला स्वागत करता आले पाहिजे. ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नव्हे. प्रतिभा रे यांच्यासारख्या विचक्षण व मेहनती लोकांचे अथक परिश्रम त्यामागे असतात.

आपण संपन्न आयुष्य जगताना जे वंचित आहेत त्यांना मुख्य प्रवाहधारेत कसे आणता येईल आणि हे करताना समाजाची नाळ त्याच्या मुळापासून तुटत तर नाही ना हे संतुलन राखणे प्रतिभा रे यांना समजले व जमले. त्यांच्या साहित्यकृतींच्या परिशीलनातून समाजात नवी उमेद निर्माण होत राहणे हेच अगत्याचे आहे.