
>> निलय वैद्य
सुधा मूर्ती यांच्या ‘आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी’ हे पुस्तक लीना सोहोनी यांनी अनुवादित केलं आहे. सुधा मूर्ती लिखित हे पुस्तक नावापासूनच वेगळं आहे. यात पोतडीतल्या गोष्टी आहेत, पण त्या आजोबांच्या! सुधाताई हे एक तेजस्वी आणि गोष्टी वेल्हाळ व्यक्तिमत्त्व. ‘आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी’ या पुस्तकात सुधाताईंनी लिहिलेल्या 19 गोष्टी आहेत. या गोष्टींचं समर्पकत्व असं की, त्या सर्व एका माळेत गुंफल्या आहेत. म्हणजे एक मध्यवर्ती कथानक आणि त्या अनुषंगाने येणाऱया एकेक गोष्टी असं स्वरूप आहे. एका कुटुंबातले प्रेमळ आजी, आजोबा आपल्या नातवंडांबरोबर उत्तराखंड येथील डोंगराळ भागात वसलेल्या मायावतीच्या दिशेने सहससफरीला निघतात. नेहमी गोष्टी सांगायचं काम आजीकडे असतं, पण या वेळी थोडा बदल म्हणून लेखिका ती जबाबदारी आजोबांच्या खांद्यावर सोपवतात. आवाढव्य पर्वत शिखरं, उंच उंच देवदार वृक्ष या निसर्गसंपन्न प्रदेशात ते फिरतात. त्या वेळी आजोबा राजा – प्रजा, राजकुमार, जलपऱया, प्राणी, इतकंच नव्हे तर कडू कारल्याच्या, कलिंगडाच्या नानाविध गोष्टी सांगतात. प्रवासात त्यांना वेगवेगळी माणसं भेटतात. त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांची देहबोली, खाण्यापिण्याच्या सवयी हे सर्व पैलू सहज सुलभ शैलीत उलगडत जातात. हे सुधाताईंचं लेखन कसब. सर्व गोष्टींचा मथितार्थ जसाच्या तसा ठेवून ओघवत्या प्रवाहात या गोष्टी आपल्या समोर येतात. त्याचं श्रेय अनुवादिका लीना सोहोनी यांना द्यायला हवं.
मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी’ या पुस्तकात आलेली साधीसोपी वाक्यं सखोल असा अर्थ साधतात. ती लहानग्यांच्या बालमनावर सुसंस्कार घडवतात. ‘केवळ वर्ण, उंची, वजन किंवा चेहऱयाचा रेखीवपणा म्हणजे सौंदर्य नसून एखाद्या व्यक्तीच्या चेहऱयावर तिच्या अंगच्या कनवाळूपणाचं, विचारीपणाचं आणि औदार्याचं प्रतिबिंब पडलेलं असणं म्हणजे खरं सौंदर्य’ हे वाक्य ‘कडू कारलं’ या कथेत जाता जाता सहज पेरलं आहे.‘गोष्टी इतरांबरोबर वाटणं म्हणजेच इतरांची काळजी घेणं असतं’ अशी वाक्यं रंजकता आणतात आणि पुस्तकातल्या गोष्टी आपण लहानमोठे वाचत जातो आणि त्या कथासौंदर्यात आकंठ बुडून जातो.