परीक्षण – शिवसंजीवनीच्या शोधाची चित्तरकथा

>> गणेश कदम

’याहृदयीचे त्या हृदयी’ सांगण्यासाठी फक्त शब्दच लागतात किंवा तेवढेच पुरेसे असतात असं नाही. खरंतर ‘शब्द’ हा प्रकार अगदी अलीकडचा. त्याआधी चित्र, शिल्प हेच अभिव्यक्तीचे प्रकार होते. त्या माध्यमातून अनेकांनी आपापला काळ पकडण्याचा प्रयत्न केला. त्या-त्या काळावर ठसा उमटवणारी लोकोत्तर माणसे रेखाटली, कोरली. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यातून सुटणे केवळ अशक्य! ते तसे सुटले नाहीत म्हणूनच आज आपण शिवरायांच्या प्रतिमा घराच्या भिंतीवर लावू शकतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आजवर अनेक रुपांत पाहत आलो आहोत. जिजाऊंकडून रामकृष्णाच्या कथा ऐकणारे, गड सर करणारे, अफझलखानाला मिठी मारणारे, शाहिस्तेखानाची बोटे छाटणारे, मिर्झा राजे जयसिंगांशी तह करणारे, …..आग्य्राच्या कैदेत असलेले, राज्याभिषेक सोहळ्यात असलेले, राजसदरेवर मसलत करणारे, दरबारात न्यायदान करणारे, रणांगणात गनिमांवर तुटून पडलेले, अशी एक ना अनेक रुपे. पण ही प्रेरक शिवरूपे आपल्यापर्यंत आणली कोणी? काय होती त्यांची प्रेरणा? कसा होता त्यांचा संघर्ष? कोणी केले त्यांना सहकार्य? असे प्रश्न क्वचितच आपल्याला पडतात. सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर हे त्यास अपवाद ठरले आणि साकारला ‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या’ हा बहुमोल ग्रंथ.

इतिहासकारांचा इतिहास पुढं आणण्याचं मोठं काम बहुळकरांनी या ग्रंथातून केलं आहे. चित्रकार बहुळकर यांची लेखक व संशोधक ही नवी ओळख यातून होते. छत्रपतींच्या पहिल्या चित्राच्या कथेपासून ते अलीकडच्या शिवस्मारकाच्या व्यथेपर्यंतचा प्रवास बहुळकरांनी मांडला आहे. सुरुवातीच्या काळात शिवरायांचे म्हणून इब्राहिम खान नावाच्या भलत्याच व्यक्तीचे चित्र सगळीकडे वापरले जायचे हे सांगून बहुळकर पहिला धक्का देतात. वा. सी. बेंद्रे यांनी ती चूक कशी दुरुस्त केली हेही ते सांगतात. बहुळकरांनी केलेलं संशोधन, त्यांनी दाखवलेले शिवचित्रांतील बारकावे पाहून थक्क व्हायला होतं. हे पुस्तक शिवकालीन इतिहास आपल्यासमोर समोर आणतं.

?राजा रविवर्मा, महादेव विश्वनाथ धुरंधर, दीनानाथ दलाल, ग. ना. जाधव, ए. एच. मुल्लर, शरद कापूसकर अशा दिग्गज चित्र-शिल्पकारांचा संघर्ष सांगताना बहुळकरांनी त्यांचे स्वभाव, त्यांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी यावरही प्रकाश टाकला आहे. त्यांच्या चित्रवैशिष्टय़ांतील फरकही नेमकेपणानं समोर आणला आहे. कोल्हापुरातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या निर्मितीची थरारक कथा हे पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. अवघ्या 20 दिवसांत हा पुतळा उभा करण्याचं काम बाबुराव पेंटर, शामराव डोंगरसाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. शिल्पकलेच्या इतिहासातील ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. बहुळकरांनी डोंगरसाने यांच्या रोजनिशीचा आधार घेत ही कथा सांगितली आहे.

?शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारण्यासाठी जेजेच्या डीनच्या कार्यालयाचा ताबा घेऊन डीनलाच कार्यालय बंदी करणारे, संस्थानिकांना आपल्या तालावर नाचायला लावणारे प्रतिभावंत चित्रकार देऊसकर यांच्याविषयीची लेखकाने दिलेली माहिती रंजक आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला शिवचित्रे व शिवशिल्पांनी कशी प्रेरणा दिली, याचा इतिहासही वाचनीय आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं चित्र काढण्यासाठी दीनानाथ दलाल यांनी घेतलेली मेहनत आणि ते चित्र विकण्याची वेळ आली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली मदत हा प्रसंग भावूक करून जातो.

?अशा असंख्य कथा-कहाण्या वाचकांच्या मनाची पकड घेतात. पण या सगळ्याबरोबर बहुळकरांनी पुस्तकात मांडलेली अरबी समुद्रातील शिवस्मारकाची व्यथा वाचून मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहत नाही. बहुळकरांनी महत्प्रयासाने शोधलेल्या या शिवसंजीवनीचा अनुभव प्रत्येक शिवप्रेमीने, इतिहासप्रेमीने घ्यायलाच हवा.

कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या

लेखक : सुहास बहुळकर

प्रकाशन : राजहंस प्रकाशन
किंमत:1000 रु