
>> संजीव साबडे
मुंबईतील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात पोलिसांना याआधीच यश आले आहे. आता सफेद कॉलर आर्थिक गुन्हेगारी व सायबर गुह्यांचे दिवस आहेत, पण एकेकाळी गुन्हेगारांच्या टोळ्यांनी मुंबईत हैदोस घातला होता. आधी स्मगलिंग जोरात चालत असे. त्या काळात करीम लाला, हाजी मस्तान ही नावं माहितीची झाली होती. पुढे पाकमोडिया स्ट्रीटमध्ये राहणारा व पोलीस हवालदाराचा मुलगा दाऊद इब्राहिमने मुंबईचे अंडरवर्ल्ड गाजवण्यास सुरुवात केली. त्याने तेव्हा करीम लाला, हाजी मस्तान यांना आव्हान दिलं. त्याच काळात भायखळ्याची जेना दारूवालीच्या बातम्या प्रसिद्ध होत. दाऊदच्या विरोधात भायखळ्याच्या दगडी चाळीतून अरुण गवळी पुढे आला होता. सात रस्ता भागात राहणारा आणि दादरमध्ये व्यवसाय करणारा अमर नाईक, त्याचा भाऊ अश्विन, मोठा राजन ऊर्फ राजन नायर, माटुंग्याचा वरदादादा ऊर्फ वरदराजन मुदलियार, धारावीची दारूवाली पद्मा नायर, चेंबूरचा छोटा राजन अर्थात राजन निकाळजे, इकबाल मिर्ची ही नावेही नेहमी कानावर पडत, त्यांच्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होत. या गुन्हेगारांमधील गँगवॉर भयावह होते. जे. जे. हॉस्पिटलात शैलेश हळदणकर व इतर साथीदारांची हत्या झाल्याने सारा महाराष्ट्र हादरला होता. त्या प्रकरणात तर भिवंडीच्या नगराध्यक्षालाही अटक झाली होती.
पुढे या टोळ्यांतील युद्धाला धार्मिक स्वरूप आले आणि डिसेंबर 1992 नंतरच्या दंगली व 1993 चे बॉम्बस्फोट, त्यातील दाऊद व पाकिस्तानचा हात यामुळे देशात संतापाची लाट उसळली. पुढे पोलिसांनी अंडरवर्ल्ड संपवून टाकलं. त्यासाठी असंख्य एन्काऊंटरही झाली. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे अजय ताम्हणे यांचे ‘मुंबई गँगवॉर’ हे रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक. अजय ताम्हणे यांनी वृत्तपत्रांसाठी नियमित गुन्हे वार्तांकन केलं नसलं तरी त्यांना मुंबईतील अंडरवर्ल्डची खडान्खडा माहिती आहे. त्यांचा दै. ‘सामना’ तसेच ‘मार्मिक’ साप्ताहिकाशी संबंध आला असला तरी ते वार्ताहर नव्हते, पण या विश्वाविषयीचे कुतूहल आणि त्यातून केलेली भटकंती व पोलीस अधिकाऱयांशी झालेली दोस्ती यामुळे त्यांनी गुन्हेगारी जगतातील घटना व पात्रे उत्तम पद्धतीने सादर केली आहेत. त्या पात्रांच्या तोंडी असलेली भाषाही खास ‘गुन्हेगारी’ आहे. ती भाषा हा त्याचा जसा परिणाम तसाच दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये वाढल्याचाही असणार. ते आपल्याला पुस्तकातून 1970 ते 1980 या काळातील गुन्हेगारी विश्वात नेतात.
म्हटलं तर हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारी जगताचा ‘इतिहास’ आहे आणि प्रत्यक्षात मात्र मुंबईच्या गुन्हेगारी जगताविषयीची तब्बल 216 पानांची ‘कादंबरी’ आहे. यात आपल्याला अबू लाला, हैदरअली, पाकमोडिया स्ट्रीटवर राहणाऱया पारकर या पोलिसाचा मुलगा मुनीर, मिर्ची सेठ हे भेटतात. पुस्तकातील जोहराबाई ही जेनाबाईची आठवण करून देते. भायखळ्याचा तरुण दळवी, दादरचा श्रीधर नाईक, माटुंग्याचा शंकरन, चेंबूरचा रंजन काळजे ही अट्टल गुन्हेगारांशी नामसदृश पात्रेही भेटतात. पुस्तकात आणीबाणीच्या काळातील मिसा कायदा व पाइप ओढणारे मुख्यमंत्री आणि त्या वेळी तरुण असलेले आणि सत्तेत राहूनही प्रसंगी पक्षांविरुद्ध भूमिका घेणारे गृहमंत्री आहेत. त्यातून वास्तवातील पात्रेही डोळ्यांसमोर येतात. यात स्मगलिंगशी संबंध असलेल्या खारमधील एक हॉटेल व त्याचा मालकही वेगळ्या नावाने भेटतो आणि समुद्रमार्गे आलेले सोने उतरवून घेणारे कोळीवाडय़ातील लोकही दिसतात. काकतकर, गोडसे, सराफ ही पोलीस अधिकाऱयांची नावेही आपल्या ओळखीची असतात. म्हणजेच वास्तवाचा आधार घेऊन लिहिलेली ही कादंबरी आहे. वस्तुस्थिती व काल्पनिक कथा यांचा उत्तम मेळ लेखकाने कादंबरीत घातला आहे.
कादंबरीतील काळ 1970 ते 1980 हा असल्याने त्यात स्मगलिंग, त्यावरून होणाऱया हाणामाऱया, पुढे बांधकाम व्यवसाय वाढू लागताच गुन्हेगारांची त्यात झालेली घुसखोरी, त्यातून बिल्डरांना धमक्या, त्या मिटवणारी मांडवली क्वीन हे सारे उल्लेख येतात. तोपर्यंत गुन्हेगारांची बॉलीवूडमध्ये थेट गुंतवणूक झाली नव्हती आणि सर्व कापड गिरण्या व्यवस्थित स्रू होत्या. कामगारांचा संप स्रू झाला 1982 साली आणि त्यातून तेथील गुन्हेगारीला वेगळे स्वरूप आले. पण हा सारा इतिहास ‘मुंबई गँगवॉर’ या पुस्तकात नाही. त्या काळात मुंबईच्या हॉटेलमध्ये चालणारे कॅबेरे आणि ताडदेवच्या एसी मार्केटमध्ये डान्स स्कूलच्या नावाखाली चालणारा शरीर विक्रयाचा धंदा असे सर्व आहे.
लेखकाने म्हटले आहे त्यानुसार हा या पुस्तकाचा पहिला भाग आहे. त्यांना आणखी दोन भाग लिहायचे आहेत. त्यात धार्मिक दंगली, बॉम्बस्फोट, गँगचे धार्मिक स्वरूप, त्यातून निर्माण झालेले वैर, पोलिसांची वाढलेली एन्काऊंटर्स, एन्काऊंटर्समधील राजकारण हेही येऊ शकेल. तसे त्याने नमूद केले नसले तरी ते अपेक्षित आहे. अर्थात कादंबरीचा शेवट धक्कादायक वाटतो. कदाचित पुढील भाग यातील शेवटापेक्षा अधिक धक्का देणारे असतील. . या कादंबरीतील घटना आणि पात्रे आपल्याला त्यांच्यामागे सहजपणे धावायला लावतात. हे लेखकाचे कौशल्य मानायला हवे.
मुंबई गँगवॉर
लेखक ः अजय ताम्हणे n पृष्ठे ः 212
किंमत ः 295 रुपये n प्रकाशक ः रोहन प्रकाशन




























































